नांदेड जिल्ह्यातील उमरी याठिकाणी तहसीलदार या पदावर कार्यरत असलेले प्रशांत थोरात यांची उणेपुरे दीड आठवडा कारकिर्द पूर्ण होत नाही तोच त्यांची येथून रेणापूर येथे बदली करण्यात आली.त्यानिमित्त तहसीलदार प्रशांत थोरात यांना उमरी येथील सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी निरोप समारंभ आयोजित करण्यात केला होता.ह्या प्रसंगी त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या आपल्या जिवलग मित्रासाठी तहसीलदारांच्या "डायस" वर कार्यकारी दंडाधिकारी अर्थात तहसीलदारांच्या खुर्चीत बसून गाणे म्हटले होते.त्यांच्या ह्या गाण्याचा तेथील बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील "शूट" केला होता,त्यानंतर त्यांचे हे मित्रासाठीचे गाणे "तेरे जैसा यार कहा" सोशल मीडियावर चांगलेच "व्हायरल" झाले आहे.त्यांच्या ह्या गाण्याचा व्हिडिओ कुणीतरी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना देखील पाठवून देत चांगल्याच "पिना खुपसण्या"चे काम केले.इतकेच नव्हे तर हाच व्हिडिओ "कुणातरी पठ्ठ्या"ने राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील तेवढ्याच तत्परतेने पाठवून दिला,आणि ह्याचा जो व्हायचा तोच परिणाम झाला.महसूल मंत्र्यांनी हा व्हिडिओ विभागीय आयुक्तांना पाठवीत तहसीलदार प्रशांत थोरात यांना तातडीने निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिलेत.
राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची स्वच्छ असलेली प्रतिमा मलीन झाली असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे.विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी,नांदेड यांनी या प्रकरणांत सादर केलेल्या अहवालाच्या आधारे तहसीलदार प्रशांत विश्वासराव थोरात यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
शासकीय अधिकाऱ्याने आपण धारण केलेल्या पदाची गरिमा आणि समय सूचकता बाळगत वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे. शासकीय पदाच्या जबाबदाऱ्या,घालून देण्यात आलेली मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. खासगी कार्यक्रमांत अशा प्रकारे गाणे म्हणण्यास कोणतीही मनाई नसली तरी शासकीय कर्तव्यावर असताना वागणूक ही नियमानुसारच असायला पाहिजे.शासन सेवेतील सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा व आपल्या पदाची प्रतिष्ठा जपावी, ही अपेक्षा आहे. असे विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
तहसीलदार प्रशांत थोरात,यांनी शासकीय कर्मचा-याला अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचे निदर्शनास आल्याने शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच त्यांची शासकीय कार्यालयात गाणे गाण्याची कृती ही अत्यंत बेजबाबदार व शासकीय अधिका-यास अशोभनीय असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्या अर्थी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ४(१) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून प्रशांत थोरात, तहसीलदार, रेणापूर,जि.लातूर यांना काढण्यात आलेल्या आदेशाच्या दिनांकापासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदार प्रशांत थोरात ह्यांनी ह्या उमरी तहसील कार्यालयातील निरोप समारंभात उपस्थित असलेल्या आपल्या जिवलग दोस्तासाठी "तेरे जैसा यार कहा", हे गाणे म्हटले होते.त्यांच्या ह्या गाण्याला उपस्थित सर्वांनीच अगदी भरभरून प्रतिसाद देत त्यांच्या आवाजात आवाज मिसळून टाळ्या वाजवत गाण्याला चांगलीच साथ दिली होती.त्यांच्या अधिकारी मित्राने तर विशेष साथ दिली आहे,हे त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत देखील अगदी स्पष्ट दिसत आहे.
प्रशांत थोरात यांनी आपल्या मित्राविषयी गाण्यातून जे प्रेम व भावना व्यक्त केल्यात त्या शब्दात मांडणे कठीण आहे.मात्र एका मित्राच्या "प्रेमातून उतराई" होण्यासाठी केलेल्या कृतीची परतफेड निलंबनाच्या रूपाने केवळ एकट्यालाच मिळाली ही दुर्दैवाची बाब आहे.याचाच अर्थ "दोस्त करतो तुमचाच अस्त" हे ह्या ठिकाणी शंभर टक्के लागू होते.त्यांचा ठरवून "गेम" तर करण्यात आला नाहीं ना..? अशी देखील शंका घ्यायला भरपूर जागा आहे.
तहसीलदार थोरात ह्यांचे करण्यात आलेले हे
निलंबन एका दृष्टीने व कायद्यानुसार योग्यच आहे असे मानले तरी मात्र ह्यात नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी आपला अहवाल देत असताना भेदभाव करीत तो दिला असल्याचे अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.कारण व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये कार्यालयातील बहुतेक सर्वच अधिकारी, कर्मचारी ह्या निरोप समारंभात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.जेव्हा तहसीलदार प्रशांत थोरात ह्यांनी गाणे म्हटले तेव्हा ह्या सर्व उपस्थितांनी त्यांना गाण्यात साथ दिली आहे.डायस वर बसलेले महिला व पुरुष अधिकारी हेही त्यांच्या ह्या कथित गुन्ह्यात सारखेच दोषी आहेत.मग त्यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई का नाही.? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो आहे.
तहसीलदार प्रशांत थोरात यांची जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल मंत्र्यांसोबत काही "दुश्मनी" आहे की काय अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे.कारवाई करीत असताना ती सगळ्यांवर सारखीच का नाही.? प्रशांत थोरात यांचे निलंबन करीत असताना, निदान उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना साधी "शो काज" तरी द्यायला पाहिजे होती ना.? पुरोगामी महाराष्ट्रात हे चाललेय तरी काय..?

2 टिप्पण्या
शासकीय खुर्चीत बसून गाणे म्हणणे ही निश्चितच आक्षेपार्ह कृती आहे. मात्र अनवधानाने एक वेळ झालेली चूक म्हणून समज देऊन विषय संपवणं योग्य ठरेल. या प्रकरणाला बरीचशी प्रसिद्धी मिळालेली असल्यामुळे इतर शासकीय अधिकारी सुद्धा त्यातून बोध घेतीलच. रूक्ष शासकीय कारभारात तहसीलदार साहेब अद्यापही गाणं म्हणण्या इतकं मन मोकळे ठेवतात ही तशी चांगलीच गोष्ट आहे.
उत्तर द्याहटवाजय हिंद,त्यांना निलंबन करण्याइतपत एवढा मोठा क्राईम नाही. त्यांना समज सुद्धा देऊ शकत होते. त्यांनी माफी सुद्धा मागितली असती नकळत झाले अनावधानाने झाले पुढे जाऊन असे काही होईल याची त्यांना भनक सुद्धा लागली नसेल. म्हणून डायरेक्ट निलंबन. मंत्री साहेबांनी आयुक्त साहेबांनी याच्याबद्दल फेरविचार करायला पाहिजे. जय हिंद 🙏
उत्तर द्याहटवा