एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच अमरावती शहर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची उचलबांगडी करीत त्यांच्या जागी बृहन्मुंबईचे पोलिस उपआयुक्त राकेश ओला यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश आजच नागपुरातून निर्गमित करण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरनीवर आला होता.शहरांत दररोज होणारे खून,मारामाऱ्या,वाढत्या चोऱ्या आणि या सर्वांवर कडी म्हणजे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचेच झालेले खून यामुळे पोलिस दलाची कर्तव्यदक्षता चांगलीच उजेडात आली होती.
अमरावती शहरांत गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ विक्री आणि गुटख्याचा तेजीत चाललेला व्यापार ह्यामुळे देखील अमरावती पोलिस नेमके करतात तरी काय हा मुद्दा जोर धरायला लागला होता.
स्थानिक आमदारांनी ह्याबाबत आपल्याच सरकारला धारेवर धरत पोलिस प्रशासनाचे कान उघडण्यासाठी केलेले प्रयत्न हे देखील चांगलेच चर्चेत आले होते.आधीच्याच आयुक्तांचा कित्ता गिरवत नव्या आयुक्तांचा कारभार सुरू असल्याने पोलिस दलातीलच अनेक अधिकारी नाराज झाले होते.तर शहरांत कार्यरत असलेल्या दोन क्राइम ब्रांच बरखास्त करून एकाच ब्रँचवर त्यांनी संपूर्ण आयुक्तालयाचा कारभार सोपविल्याने देखील चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती.
येत्या काही दिवसांत अमरावती शहर महानगर पालिकेची निवडणूक होऊ घातली असून त्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आणि नेते व कार्यकर्त्यांची कोणतीही नाराजी नको म्हणून अरविंद चावरिया ह्यांना मध्येच नारळ देण्यात आला असल्याची शहरांत चर्चा आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने शिबिर कार्यालय, जुने हैदराबाद हाऊस, सिव्हिल लाईन्स,नागपूर येथून आजच त्यांच्या बदली संदर्भात व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले असून अमरावती शहर पोलिस आयुक्त ह्या पदावर राकेश ओला ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे,तर चावरिया ह्यांच्या पदथापनेबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.

0 टिप्पण्या