समाजातील दुर्लक्षित घटक व गोरगरिबांच्या पैशांत असा कोणता गुण आहे की,तो पैशांनी श्रीमंत असलेल्यांना तो त्यांच्याकडून हिसकावून घ्यावासा वाटतो,आणि त्याच गरिबांच्या तोंडाच्या अन्नात असा कोणता घटक आहे की, पोट भरलेले असल्यावरही साता जन्माचे उपाशी असल्यासारखे अधाशीपणे गरिबांच्या अन्नात हात मारतात हे अजूनही कुणालाच न सुटलेले कोडे आहे.
राज्य सरकार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब व असहाय्य लोकांसाठी दरमहा अल्प किंमतीत व काहींना अगदी फुकट धान्याचा पुरवठा करून राज्यातील कोणताही नागरिक उपाशीपोटी राहणार नाही याची काळजी घेत असते.मात्र गोरगरिबांसाठी केल्या जात असलेल्या या धान्याच्या पुरवठ्यात ह्याच विभागात काम करणारे अधिकारी व वितरण प्रणालीतील धान्य दुकानदार हे सात पिढ्यांपासून उपाशी असल्यासारखे अधाशीपणे तुटून पडत असून ह्या होत असलेल्या पुरवठ्यातील केवळ ३० ते ३५ टक्केच वाटा ह्या गरिबांच्या घरापर्यंत पोहोचत आहे.
वितरण अधिकारी ते रेशनिंग दुकानदार यांची गेल्या कित्येक वर्षांपासून एक साखळीच तयार झालेली असून त्या माध्यमातून ह्या गरीबांना मिळणारे धान्य खुल्या बाजारात विकून ते भेसळ करून विकत कोट्यावधी रुपयांचा खुलेआम भ्रष्टाचार केल्या जात आहे.यासाठी शासनाने वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी अशासकीय समित्या नेमून नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न देखील करून पाहिले आहेत मात्र परिणाम अगदी शून्यच आलेला आहे.कारण या समित्यांवरील लोकांनी देखील ह्या साखळीत सामील होत गरिबांच्या धान्यावर हात मारणे सुरू केल्याने आता "चौकीदारच चोर" असेल तर त्याची तक्रार कुणाकडे करणार.? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही ठिकाणी ह्या साखळीतील रेशनिंग दुकानदारांनी "समझोत्या"ची रक्कम वेळेवर दिली नाही अथवा "चोरावर मोर" व्हायचा प्रयत्न केल्यास त्यांच्या पुढील धान्य पुरवठ्यावर परिणाम होतो.पर्यायाने त्यांचे परवाने देखील निलंबित करण्याचे प्रकार काही नव्हे तर बऱ्याच ठिकाणी होत असतात.अगदी असाच प्रकार गेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात झाला होता.आणि त्यातूनच निरीक्षण अधिकारी असलेल्या महिलेला "धडा" शिकविण्याच्या नादात एसीबीच्या ट्रॅप मध्ये अडकवून चांगलीच "अद्दल" घडविण्यात आली होती.त्या वृत्ताची शाई सुकलेली नसतानाच काल नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या महिला पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याला "लाचखोरी"त पकडून देण्यात आले आहे.
श्रीमती सुमन संभाजी कऱ्हाळे, वय ४४ वर्षे, पद निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार , तहसील कार्यालय हदगाव ता. हदगाव जि.नांदेड व गोविंद आप्पाराव जाधव, कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर, नेमणूक तहसील कार्यालय,पुरवठा विभाग, हदगाव ता. हदगाव जिल्हा नांदेड अशी नांदेड एसीबीने लाचखोरीत अटक केलेल्या दोन्ही लाचखोरांची नावे आहेत.
दि.२०/११/२०२५ रोजी तक्रारदार यांनी नांदेड एसीबीच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर होऊन तक्रार दिली कि, तक्रारदार यांचे स्वतःचे नावावर रेशन धान्य वितरण दुकान आहे. तक्रारदार यांना मागील ४ महिन्यात जो धान्य पुरवठा झाला होता त्याचे वाटपाचे कमिशन म्हणून ५७,००० रुपये मिळाले होते. माहे नोव्हेंबर २०२५ चे रेशन त्यांना मंजूर झाले असून पुरवठा निरीक्षक यांनी ते "इ पॉज" या मशीनवर अपलोड केले नाही. त्यामुळे त्यांना पुढील रेशन वाटप करता येणार नव्हते.
तसेच नवीन २७ लाभार्थी यांची नावे ऑनलाईन करण्यासाठी दि.१८/११/२०२५ रोजी तक्रारदार यांनी पुरवठा निरीक्षक सुमन कऱ्हाळे यांची तहसील कार्यालय हदगाव येथे जाऊन भेट घेतली. तिथे त्यांनी कार्यालयातील कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांना बोलावून त्यांचे समक्ष तक्रारदार यांना माहे नोव्हेंबर २०२५ चे रेशन इ पॉज मशीनवर अपलोड करण्यासाठी व २७ नवीन लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन करण्यासाठी कमिशन पोटी शासनाकडून मिळालेले ५७ हजार रुपयांचे २० टक्के रक्कम लाच म्हणून मागितली व गोविंद जाधव यांनी देखील तीच मागणी केली.अशा प्रकारची तक्रार दिली आहे.
नांदेड एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी दि.२२/११/२०२५ रोजी पंचांसमक्ष केली असता पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांनी तडजोडीअंती कमिशनचे १०% प्रमाणे रुपये ५७०० रुपयांची लाच मागणी करून कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्याकडे ती रक्कम देण्यास सांगितले.
त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे कालच शनिवार दि.२२/११/२०२५ रोजी पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांनी तक्रारदार यांचे कडून ५७०० रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवून कंत्राटी संगणक डेट एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्याकडे देण्यास सांगितली. त्याच वेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा कारवाई करीत कंत्राटी गोविंद जाधव यांनी तक्रारदार यांचे कडून स्वतःसाठी व पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांच्यासाठी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता त्याला रंगेहाथ ताब्यात घेवून स्वीकारलेली लाचेची रक्कम हस्तगत करण्यात येवून त्याला व लाचखोर पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांना जागीच अटक करण्यात आली.दोन्ही लाचखोरांच्या घेण्यात आलेल्या अंगझडती दरम्यान त्यांचे मोबाईल व मतदान ओळखपत्र ताब्यात घेण्यात आले आहे. लाचखोर महिला अधिकाऱ्याच्या घराची घरझडती सुद्धा घेण्यात आली असून त्याठिकाणी काय सापडले हे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सध्यातरी उघड केलेले नाही.
दोन्ही लाचखोरांच्या विरुद्ध पो.स्टे.हदगाव, ता. हदगाव,जि.नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७-अ,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील अधिकारी महिलेला ताब्यात घेण्यात आले असून कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव याला वैद्यकीय कारणास्तव नोटीस वर सोडण्यात आले आहे.
सदरहू कारवाई प्रशांत पवार,पोलीस उपअधीक्षक,नांदेड यांच्या मार्गदर्शनात
सापळा अधिकारी श्रीमती प्रिती रमेश जाधव,पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी
श्रीमती अर्चना करपुडे,पोलीस निरीक्षक, एसीबी नांदेड यांनी केली आहे.

0 टिप्पण्या