सत्ययुगातील दशरथपुत्र रामाने आपल्या पित्याने सावत्र आईला दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी वाट्याला आलेले साम्राज्य व राजपाट सोडून वनवास पत्करला परंतु पित्याचे शब्द खाली पडू दिले नाहीत.इतकेच नव्हे तर राजा दशरथाने आपल्या पत्नीला दिलेल्या वचनासाठी प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठविण्याचा अत्यंत कठोर निर्णय घेतला.
परंतु ह्या कलियुगात जन्माला आलेल्या दशरथ नावाच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाने साक्षात एकवचनी रामाच्या नावाने असलेल्या गावात व त्याच रामाच्या पित्याचे नाव धारण करून देखील खाकी वर्दी अंगावर घालताना घेतलेल्या शपथेचे पालन न करता लाचखोरीचा गुन्हा केल्याने त्याला पोलिसी कारवाईला बळी पडून फरार व्हावे लागले आहे.
दहा हजार रुपयांच्या लाच मागणीच्या गुन्ह्यात नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलिस स्टेशनच्या सहा.पोलिस उपनिरीक्षक दशरथ खंडेराव जांभळीकर व त्याच्या अमजद पठाण नामक साथीदारावर रामतीर्थ पोलिस स्टेशनला लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.२२/११/२०२५ रोजी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार दि.२१/११/२०२५ रोजी तक्रारदार हे पत्ते खेळत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक जांभळीकर यांना मिळून आल्याने त्यांच्यावर पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक जांभळीकर यांनी सदर गुन्ह्यामध्ये पीसीआर न घेता, तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपये लाचेची मागणी केली होती. तसेच खासगी इसम अमजद पठाण याने तक्रारदार यांना फोनवर सांगितले की, मला तीस हजार रुपये दिले असते, तर तुमचे सर्व गुन्हे मी अंगावर घेतले असते, मी जांभळीकर साहेबांना सांगतो तक्रारदार येत आहेत त्यांना पैसे देऊन टाका ,असे म्हणून लाच देण्यास प्रोत्साहन दिले.
नांदेड एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सदरहू तक्रारीची सत्यता पडताळणी केली असता दि.२२/११/२०२५ रोजी पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे तक्रारदारावर दाखल असलेल्या जुगाराच्या गुन्ह्यामध्ये पीसीआर न घेता, तपासात मदत करण्यासाठी लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक जांभळीकर याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष १०,००० रूपये लाचेची स्वतः मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दिल्याचे, तसेच खाजगी इसम अमजद पठाण यांनी तक्रारदार यांना फोनवर जांभळीकर यांना लाच देण्याकरीता प्रोत्साहन दिल्याचे लाच मागणी पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले आहे.
त्यावरून दि.२३/११/२०२५ व दि.२४/११/२०२५ रोजी लाचखोरांवर सापळा कारवाई करण्यासाठी तक्रारदाराला पंचांसमक्ष पाठविन्यात आले. परंतु तक्रारदार यांचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकृती केली नाही.
परंतु पडताळणी दरम्यान लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने दोन्ही लाचखोरांच्या विरुद्ध पो.स्टे रामतीर्थ,जि.नांदेड येथे महाराष्ट्र भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७, ७-अ, व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही आरोपी फरार झाले असून एसीबीचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत
सदरची कारवाई प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक,एसीबी,नांदेड यांच्या मार्गदर्शनात साईप्रकाश नरसिंगराव चन्ना, पोलीस निरीक्षक यांनी केली असून पुढील तपास श्रीमती अनिता दिनकर, पोलीस निरीक्षक, एसीबी नांदेड ह्या करीत आहेत.

0 टिप्पण्या