तेल्हाऱ्याच्या लाचखोर तलाठी व त्याच्या सहकाऱ्याला पोलिस कोठडी...



     तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड (रूप) येथील भाग २ मधील लाचखोर तलाठी विनोद बापुराव आढे व त्याचा दलाल प्रमोद इंगळे ह्या दोघांना आज एसीबीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले असता, १०,००० रूपये लाच स्विकारल्याच्या प्रकरणी ह्या दोघांचीही पोलीस कोठडीमध्ये रवानगी न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आली आहे.

    आज दिनांक २४.०७.२०२५ रोजी अकोट येथील वि.अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दाखल अप.क्र.२०९/२०२५, कलम ७,७ (अ),१२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील लाचखोर आरोपी विनोद बापुराव आढे,तलाठी हिवरखेड व सह आरोपी प्रमोद गुलाबराव इंगळे खाजगी इसम राहणार हिवरखेड या आरोपींनी १०,००० रूपये लाचेची रक्कम प्लॉटची नोंद करून देण्यासाठी तकारदाराकडून स्विकारल्याच्या प्रकरणात दिनांक २५.०७.२०२५ पर्यंत पुढील तपास करण्याकरीता पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे.


     या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोलाचे पोलीस उपअधिक्षक मिलिंद बहाकर व तपास अधिकारी पो.नि.प्रविण वेरूळकर अकोला यांनी वरील दोन्ही आरोपींना दि. २३.०७.२०२५ रोजी अटक करून आज दि.२४.०७.२०२५ रोजी न्यायालयासमक्ष दोन्ही आरोपींना हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, फिर्यादीकडून आरोपींनी प्लॉटची नोंदणी करण्याकरीता लाचेची मागणी केल्यासंबंधीचे संभाषण या प्रकरणामध्ये आरोपींचा सहभाग असल्याचे दिसून येते. तसेच दि.२३.०७.२०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती हिवरखेड मधील तलाठी कार्यालय हिवरखेड येथे पंचासमक्ष आरोपी तलाठी यांनी फिर्यादीकडे मागणी केलेली लाच रक्कम १०,००० रूपये कार्यालया तील खाजगी ऑपरेटर प्रमोद इंगळे या आरोपीने पंचासमक्ष लाच स्वीकारतांना सापळ्यात अडकले. या आरोपींकडून गुन्ह्याबाबत महत्वाचे कागदपत्र जप्त करणे बाकी आहे. या आरोपींचे नैसर्गिक आवाजाचे नमुने घेवून प्रयोगशाळेमध्ये परीक्षणा करीता पाठवणे, साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविणे, यामध्ये आणखी इतर कोणाचा सहभाग आहे काय यासंबंधी आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये सविस्तर विचारपूस करून तपास करणे बाकी आहे. आरोपींनी केलेला अपराध हा भ्रष्टाचारासारखा गंभीर अपराध असुन हा अपराध समाजा विरूध्द देखील आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात यावी. सदरचा गुन्हा हा प्राथमिक तपासावर असून, त्यामुळे सखोल तपासाकरिता आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड कृपया मंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर वि.कोर्टाने वरील दोन्ही आरोपींची दिनांक २५.०७.२०२५ पर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्याचा आदेश पारित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या