काल दि.७/६/२०२५ चा शनिवार हा अकोला जिल्ह्यातील नागरिकां साठी अक्षरशः "घातवार" ठरला आहे.काल अकोल्यातील तीन तरुण युवकांचा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
तेल्हारा तालुक्यातील वारी येथील हनुमान सागर धरणात दानापुर येथील जितेंद्र मनमोहन राठी,वय ३० वर्ष याचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे,तर दुसऱ्या घटनेत
बार्शीटाकळी तालुक्यातील बोरमळी-चेलगाव धरणात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. मृतकांची नावे योगेश आश्रुबा डाहाळे आणि कार्तिक कृष्णा डाहाळे असून दोघेही १८ वर्षांचे होते. हे दोघे मित्र चिखलगाव येथील रहिवासी आहेत
तेल्हारा तालुक्यातील वारीच्या धरण भिंतीजवळ मोटारसायकल आणी धरणाच्या पाण्यात चप्पल तरंगत असताना दिसुन आली, याच शंकेवरुन सकाळपासूनच बेपत्ता असलेला जितेंद्र राठी हा तरुण धरणात बुडाला असल्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक पातळीवर दोन टीम द्वारे शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.
मात्र तो नेमका कुठे बुडाल्याचे स्पॉट लोकेशन नसल्याने शोध घेणे शक्य झाले नाही. शेवटी रात्री शोध मोहीम घेण्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता बोलावण्यात आले होते.
त्याचवेळी दिपक सदाफळे हे त्यांचे टीमसह बार्शीटाकळीच्या बोरमळी धरणात बुडालेल्या दोन युवकांचा शोध घेत होते.मृतकांची नावे योगेश आश्रुबा डाहाळे आणि कार्तिक कृष्णा डाहाळे असून दोघेही सुमारे १८ वर्षांचे होते. हे दोघे मित्र चिखलगाव येथील रहिवासी असून उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळावा म्हणून ते धरण परिसरात गेले होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांनी पाण्यात उतरून थंडावा घेण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच महाग पडला. खोल आणि प्रवाही पाण्यात काही क्षणांत दोघेही बुडाले आणि बेपत्ता झाले.
ह्या दुर्दैवी घटनेनंतर आसपासच्या गावकऱ्यांनी दोघांचाही जीव वाचविण्या साठीचा आरडाओरडा व आवाज ऐकून तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. या गंभीर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजेश वझीरे यांनी जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागाचे साबळे ह्यांना ह्या घटनेची माहिती देवून दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधून शोधकार्य तातडीने सुरू केले.
पिंजरच्या शोध व बचाव पथकाचे दीपक सदाफळे व त्यांच्या टीमने ह्या दोन्ही युवकांचे शव पाण्यातून बाहेर काढून लगेच वारी येथील धरणाकडे धाव घेतली.
पथक प्रमुख दिपक सदाफळे सहकारी मयुर सळेदार,शेखर केवट,अंकुश सदाफळे,विष्णु केवट कीशोर तायडे,शिवम वानखडे,सार्थक वानखडे हे शोध व बचाव साहीत्यासह वारी हनुमान सागर घटनास्थळावर रात्री ८ वाजता पोहोचताच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले,हा युवक नेमका कुठे बुडाला हे स्पॉट लोकेशन माहीती नसल्याने अंदाजे दिशा ठरवून शोध कार्य पूर्णत्वास नेले.अखेरीस त्या युवकाचे पार्थिव शरीर पथकातील सदस्यांना दिसले व त्यांनी ते बाहेर काढले.
अकोला जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असलेले हे जलाशय आज रोजी तरी ह्या ठिकाणी कुणीही सुरक्षा रक्षक अथवा चौकीदार नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने साक्षात "मृत्यूचे सापळे" ठरले आहेत.जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी यासाठी हे विभाग अथवा शासनाकडे कधीही सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी कोणताही "पाठपुरावा" केला नाही, ही अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने एक "भीषण शोकांतिका" आहे.
जिल्हा प्रशासन महसूल विभागातील आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी लाखो रुपये खर्च करून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शेकडो नागरिकांना त्यांच्या "कामासाठी ताटकळत" ठेवून दोन दिवसांचे प्रशिक्षण देत असते.मात्र त्यांना दिलेल्या ह्या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील नागरिकांना "फुटक्या कवडी" इतकाही फायदा झालेला नाही,ही अत्यंत "लाजिरवाणी" बाब आहे.एक दिवसाची शासकीय खर्चाने होणारी सहल व फुकटात बोटिंगचाआनंद हे अधिकारी, कर्मचारी घेतात, हे "डोळे झाकूनही दिसणारे सत्य" आहे.
दीपक सदाफळे ह्यांच्या नेतृत्वातील पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकावर आज तरी अकोला जिल्हा प्रशासन व सर्वसामान्य नागरिक अवलंबून आहेत.आणि हीच "वास्तविकता" आहे.
दीपक सदाफळे ह्यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन आता जवळपास सर्वच तालुक्यात काही सेवाभावी युवकांनी एकत्र येऊन बचाव पथके तयार करून "जीवना मरणा"च्या परिस्थितीत तातडीची सेवा देणे सुरू केल्याने कित्येक नागरिकांचे प्राण वाचले आहेत.हे सत्य नाकारुन चालणार नाही.अकोट तालुक्यातील पांडुरंग तायडे यांच्या नेतृत्वातील एकलव्य बचाव पथक हे त्यातीलच एक आहे. पोपटखेडच्या धरणात बुडणाऱ्या आणि जीव देणाऱ्या कित्येकांचे प्राण ह्या पथकाने वाचविले आहेत.
ह्या बचाव पथकांनी केलेल्या मदत कार्याला शासन स्तरावर एक रुपयाचीही मदत दिल्या जात नाही.नाही म्हणायला त्यांना येण्या जाण्याचे भाडे आणि जेवणाची व्यवस्था तेव्हढी केल्या जाते.जीवावर उदार होऊन ही तातडीची सेवा देत असताना पथकातील एखाद्या सदस्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास ती त्या सदस्याची वैयक्तिक जबाबदारी असून शासन यंत्रणा मात्र हात झटकून बाजूला उभे राहून आपली "रिपोर्टर"ची भूमिका पार पाडते. हीच "सत्यता" आहे.




0 टिप्पण्या