आजरोजी रेती,मुरुम व गीट्टी या घर बांधकामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाला सोन्यापेक्षाही जास्त भाव आला असून शासन मालकीच्या असणाऱ्या ह्या साहित्याची सर्रास चोरी करून विकण्याचा गोरख धंदा गावोगावी सुरू आहे.कमी वेळेत कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता जास्तीत जास्त पैसे कमावून देणारा हा "चोरीचा धंदा" महसूल विभागातील काही "लालची व चोट्या" लोकांना हाताशी धरून अगदी बिनबोभाटपणे केल्या जात आहे.
महसूल विभागातील काही तलाठी एसडीओ,तहसीलदार यांना "मागच्या पुढच्या खिशात" ठेवून साझ्यातील नदी,नाल्यातून निघणारी रेती व गौण खनिज आपल्याच "सात बाऱ्या"तील "बाप दादां"चा माल असल्याप्रमाणे पैशांसाठी हपापलेल्या तस्करांना "चिरीमिरी" नव्हे तर "लवंग,इलायची, सुपारी" घेऊन खुलेआम त्यांना घेऊन जायला परवानगी देत आहेत.
गेल्याच आठवड्यात अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई केली याचा राग मनात ठेवून ही कारवाई करणाऱ्या नायब तहसीलदारास अर्वाच्य व जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.ह्या प्रकरणी पातूर तहसील कार्यालयात कार्यरत गौण खनिज "तस्करांचा आका" तलाठी अमित सबनीस याच्याविरुद्ध पातूर पोलिस स्टेशनला अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल केला गेला आहे.
गुरुवार दि.५ जून २०२५ रोजी सायंकाळी पातूर तहसील कार्यालया समोर असलेल्या कॅन्टीनमध्ये घडली.या प्रकरामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून, "कुंपणच शेत खात असेल, तर संरक्षण कुणाकडे मागायचे..?" असा संतप्त सवाल कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
फिर्यादी बळीराम तुळशीराम चव्हाण (वय ५३ वर्षे ), नायब तहसीलदार पातूर,यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी ५ जून रोजी पिंपरडोळी येथे "विना रॉयल्टी" अवैधरित्या मुरुम वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर छापा टाकून ती वाहने पोलिस स्टेशन चान्नी येथे जमा केली. या कारवाईची माहिती पत्रकारांना देत असताना तहसील कार्यालया समोरील कॅन्टीनमध्ये तलाठी अमित सबनीस यांने त्यांना अत्यंत अश्लील, अपमानजनक आणि जातीवाचक शब्दांत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.नायब तहसीलदार चव्हाण यांची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ विविध कलमान्वये तलाठी अमित सबनीस विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुराव्यादाखल व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोबत देण्यात आल्या असून त्यात अगदी स्पष्टपणे केलेली शिवीगाळ ऐकायला येत आहे.तसेच हा तलाठी "बेडर" व कुणाच्या तरी "वरदहस्ताने मस्ती"त आलेला आहे हे ह्या क्लिप वरून दिसून येत आहे.
घटनेनंतर ७ जून शनिवार रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून घटनेनंतर पोलिस कारवाईच्या भीतीने फरार झालेल्या तलाठी अमित सबनीसचा कसून शोध घेतल्या जात आहे.पोलिसांत एफआयआर दाखल झाल्याचे कळताच त्याने आपला मोबाइल फोन बंद केला असून,"नॉट रिचेबल" झाला आहे.पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके काही ठिकाणी रवाना केली असून अटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल,असा विश्वास तपास अधिकारी एसडीपीओ गजानन पडघन यांनी व्यक्त केला आहे.
नायब तहसीलदार बी.टी.चव्हाण हे महसूल विभागातील एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात.गेल्या महिनाभरात त्यांच्याबाबत घडलेला हा दुसरा प्रकार आहे.त्यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सतत फिल्डवर राहून शासनाचा महसूल बुडवून नुकसान करणाऱ्या माफियांशी दोन हात करणाऱ्या अधिकाऱ्याला खऱ्या अर्थाने पोलिस संरक्षणाची गरज आहे.( भाग १.)





0 टिप्पण्या