अकोला जिल्ह्यातील दहीहंडा हे जिल्ह्यातील सगळ्यात जास्त वादग्रस्त पोलिस ठाणे ठरले आहे.गेल्या काही वर्षांपासून कोणताही ठाणेदार ह्या पोलिस ठाण्यात तीन ते चार महिन्याच्या वर जात दिवस टिकूच शकला नाही.त्याच्या कारणांचा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधी विचारच केला नाही.
दहीहंडा हे जिल्ह्यातील आडवळणाचे आणि सर्वांत जास्त गावे व लोकसंख्या असलेले अकोट उपविभागातील पोलिस ठाणे आहे.पूर्णा नदीचा फार मोठा भाग ह्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो,तर जिल्ह्यातील नव्हे तर आजुबाजूच्या चार ते पाच जिल्ह्यांना विटा पुरविणारा सर्वांत मोठा विटांचा उद्योग ह्याच ठाण्याच्या हद्दीत आहे.त्यामुळे सर्वच प्रकारच्या अवैध धंद्याचे "माहेरघर" याठिकाणी आहे.
पूर्णा नदीतून निघणाऱ्या रेतीची तस्करी हा ह्या भागातील सगळ्यात मोठा अवैध व्यवसाय असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये तशीच आर्थिक सुबत्ता आली आहे,याच सुबत्तेतून महसूल व पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे "आर्थिक गणित" सुधारले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.तर हद्दीत असलेल्या चोहोटा बाजार परिसरातील ३५०/४०० वैध,अवैध वीट भट्टी कारखाने नियमित बाराही महिने चालत असल्याने आणि हे वीट भट्टी कारखाने म्हणजे "नोटा छापण्या"चे कारखाने असल्याने "कमाई" करण्यासाठी फारसे काहीच करावे लागत नाही.ह्या भट्ट्यांवर १० ते १५ हजार मजूर वर्षभर याठिकाणी कामावर असल्याने अवैध त्याभागात अवैध दारू विक्री,जंगली प्राण्यांची शिकार हे प्रकार सर्रास चालतच असतात.
पूर्णा नदीचे खोरे आणि खारपान पट्ट्याची जमीन असल्यामुळे शेतीत उत्पन्नही चांगले निघते.सोबतीला इतर कमाईचे धंदे असल्याने ह्या भागात चांगलीच आर्थिक सुबत्ता आहे.त्यामुळे संपूर्ण परिसरात अवैध दारू विक्री व सोबतीला आणखी श्रीमंत होण्याची स्वप्ने दाखविणारे वरली मटक्याचे धंदे करणारे स्वप्नांचे सौदागर गावागावात न सांगता आणि बोलावता पोहोचलेले आहेत.त्यातून अर्थातच पोलिसांना हफ्ता रुपी "मलिदा" मिळतोच.
आर्थिक सुबत्ता आणि त्यातूनच गावातच देशी दारू असल्याने भांडणतंटे आलेच,मग त्यातून एकमेकांविरुद्ध तक्रारी देखील आल्याचं.त्या तक्रारी आल्यावर पोलिसांची "रसवंती" सुरू झाल्यावर पार चोथा होईपर्यंत दोन्ही पार्ट्यांना चांगलेच "पीळल्या" जाते हे कुणा ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही.
दहीहंडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत सर्वच गावांत रेती तस्करी,अवैध दारू,वरलीमटका, गुटखा आणि गोवंशाचे मांसाची सर्रास खुलेआम विक्री होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून काही पोलिस कर्मचारी "फेव्हिकॉल" लावून ह्याच ठाण्यात चिटकून बसलेले आहेत.तर पार "आडवळणा"चे पोलिस ठाणे असल्याने कोणताही वरिष्ठ अधिकारी ह्या ठाण्यात किंवा परिसरात काय सुरू आहे.? किंवा काय परिस्थिती आहे हे पाहायला कधीच येत नसल्याने ह्या ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कसलीच आणि कुणाचीच "भीती" उरलेली नाही.ही सत्य परिस्थिती आहे.
आता आता काही सरळ मार्गी लोकांकडून पैशांच्या "मागणीचा अतिरेक" होत असल्याने आणि जिवंत रहायचे असेल तर समोरच्याला मारावेच लागेल या न्यायाने एसीबीकडे तक्रारी करायला लागले आहेत.ह्यातूनच गेल्या पाच महिन्यात ह्याच पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी होऊन "दोन एसीबीचे ट्रॅप" झाले असून त्यात रंगेहाथ कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे.
तर गेल्याच महिन्यात ह्याच कमाईच्या पैशाने "माजलेल्या" अधिकाऱ्याने चक्क दारू पिऊन दहीहंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रचंड शिवीगाळ करीत आणि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत चक्क देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा नातेवाईक आहे आणि त्यांना सांगून निलंबित करण्यासाठी सांगतो. असाही प्रकार घडलेला आहे.ह्या गोष्टीचा माध्यमांमधून मोठा गाजावाजा झाल्याने पोलिस अधीक्षक यांनी त्या पीएसआयला तत्काळ निलंबित केल्याने हे प्रकरण तेव्हा शांत झाले होते.
तर सध्या ह्याच ठाण्यात कार्यरत असलेल्या ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्या विरोधात तेल्हारा येथील एका व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याची देखील तक्रार चौकशीत आहे.एक वर्ष झाले तरी त्या चौकशीचे "भिजत घोंगडे" तसेच पडलेले आहे,ही आश्चर्याची बाब आहे.
चार ते पाच महिन्यांपूर्वी डीवायएसपी किरण भोंडवे ह्यांना प्रशिक्षण कालावधीत दहीहंडा पोलिस ठाण्यात देण्यात आले होते.तेव्हा तीन महिने ठाणेदार ठाकरे ह्यांना येथून हटविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता.तीन महिन्यात प्रशिक्षण कालावधीत किरण भोंडवे यांनी पोलिस ठाण्याची परिस्थिती पूर्वपदावर आणली होती.मात्र ते येथून जाताच पुन्हा ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांना याच ठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी "बसविल्या"ने परिस्थिती "जैसे थे" झाली असून काल झालेला "एसीबीचा ट्रॅप" हा त्याचाच परिणाम असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.
ज्या ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्या कारकिर्दीत दोन दोन एसीबीचे ट्रॅप झालेत,दारू पिऊन मस्त्या करणाऱ्या पीएसआयला स्वतः एसपी यांनी निलंबित केले तरी सुद्धा ह्या सर्व परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असलेल्या ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरेची उचलबांगडी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना काय अडचण आहे.? हे तेच जाणोत.
संपूर्ण जिल्ह्यात पोलिस अधीक्षक यांचे अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेले "ऑपरेशन प्रहार" जोमाने सुरू असले तरी ते दहीहंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत "ब्रेक" का झाले.? ह्याची कारण मीमांसा करण्याची, त्याच्या कारणांचा शोध घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.हे आतातरी नाकारून चालणार नाही.ठाणेदार ठाकरे ह्यांचे लाड आणखी किती दिवस पुरविणार.? हेही एकदा स्पष्ट व्हायलाच पाहिजे.


0 टिप्पण्या