मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल एक्सच्या अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील एक सराफा व्यावसायिक शैलेश वर्मा ह्याला पुणे सायबर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आधीचे द्विटर व आजचे एक्स या समाज माध्यमावर आलेला आक्षेपार्ह मजकूर रिट्विट केल्याच्या प्रकरणात घाटंजी येथील सराफा व्यावसायिक शैलेश नंदकिशोर वर्मा,वय ४७ यांस पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने दिनांक १५/७/२०२५ ला दुपारी अटक केली आहे.
या प्रकरणी पुणे सायबर पोलिस स्टेशनमध्ये वर्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अमृता फडणवीस यांच्याविषयीचा एक आक्षेपार्ह मजकूर वर्मा यांनी त्यांच्या द्विटर (आताचे एक्स) अकाउंटवरून रिट्विट केला होता.त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले असले तरी, त्या रिद्विटच्या आधारे पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
वर्मा यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.परंतु १७ मे रोजी न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मंगळवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी पुणे सायबर शाखेतील पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे हे एक पथक घेऊन घाटंजी येथे आले व त्यांनी स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून शैलेश वर्मा यांना घाटंजी पोलिस ठाण्यात बोलावून त्यांस ताब्यात घेण्यात आले आहे.


0 टिप्पण्या