दहीहंड्याच्या पोलिसांना समजते फक्त लाचखोरीची बात, पुन्हा एकदा एएसआय भागवत कांबळेने घेतली लाच,मग काय एसीबीने घातले आत..!



अकोला जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून प्रभार घेतला त्या दिवसा पासून एस.पी.अर्चित चांडक यांना गुन्हेगार व पोलिस दलातील अधिकारी,कर्मचारी "वेगवेगळ्या पद्धतीने" आणि आपल्या कारनाम्यानी "सलामी" देत आहेत.

अकोला पोलिस दलातील काही नव्हे तर बरेच कर्मचारी व अधिकारी हे "सुधारण्या"च्या लायकीचे राहिले नसल्याचे दररोज घडत असलेल्या घटनांवरून दिसून येत आहे.

   आज बुधवार दि.१६/७/२०२५ रोजी दुपारी २ ते २:३० वाजताच्या दरम्यान जिल्ह्यातील दहीहंडा पोलिस ठाण्यातील एका एएसआयने अकोल्याचे एस.पी.अर्चित चांडक, अतिरिक्त एस.पी. आणि अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांधीग्राम येथील कावड मिरवणुकीच्या मार्गाची व नदीवरील घाटाची पाहणी करून "पाठ फिरवता"च चक्क ५०,००० हजार रुपयांची लाच घेऊन "तगडी सलामी" दिली आहे.


दहीहंडा पोलिस स्टेशनला कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे याने एका प्रकरणांत आरोपीला तपासात सहकार्य करण्यासाठी १ लाखाची लाच मागितली होती.परंतु त्यात ५०,००० रुपयांत "मांडवली" होऊन ही रक्कम आज देण्याचे ठरले होते.

संबंधित तक्रारदाराला ही रक्कम द्यावयाची नसल्याने त्याने त्याची एसीबीच्या अकोला कार्यालयात तक्रार दिली असता त्या तक्रारीची सत्यता पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा कारवाई आयोजित करण्यात आली असता ह्या भागवत कांबळेची एस.पी.यांचा दौरा होता त्याच ठिकाणी ड्युटी लागली होती आणि त्याच ठिकाणी लाच स्वीकारण्याचे ठरले असल्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गांधीग्रामलाच "सापळा" लावला होता.


अकोल्यातील एस.पी.चांडक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी याठिकाणी आले होते मात्र एएसआय भागवत कांबळेला लाचेची रक्कम घ्यायची "अती घाई" झाली असल्याने त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अकोल्याकडे जायला पाठ फिरविताच म्हणजेच कांबळेने त्यांना "बाय बाय" करीत कासली फाट्यापर्यंत पोहोचू देताच त्याच ठिकाणी थांबून तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारतांच त्याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात एसीबीच्या पथकाला यश आले.


ह्यावरून अकोला जिल्ह्यातील सहा महिन्यात "दोन ट्रॅप" झालेल्या दहीहंडा पोलिस ठाण्यात काय आणि कसे चालले असेल.? याची चांगलीच प्रचिती येते.ही कारवाई अकोला एसीबीचे उप अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात पो.नी.प्रवीण वेरुळकर,पोलिस अंमलदार संदीप ताले,अभय बावस्कर व अस्लम शहा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या