जिथे "न्यायदेवता"च सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्य महिला मुलींचे काय..?



    अकोला जिल्ह्यातील "गायी" आणि "गोवंश" आज संपूर्णपणे सुरक्षित आहेत,मग त्या घराच्या गोठ्यातील असो की रस्त्यावर मोकाट "हुंदडणाऱ्या".परंतु याच जिल्ह्यातील प्रचंड असा विरोधाभास आहे की येथे कोणतीही "बाई" असो की तिचा "वंश" सुरक्षित नाही.इथे तर साक्षात न्यायालयात बसून "न्यायदान" करणारी "न्यायदेवता" ही सुरक्षित नाही.तिलाही ह्या पिसाट वृत्तीच्या  छेडखानीचा त्रास असह्य होतोय म्हणून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची अत्यंत वाईट वेळ आज आली आहे.मग इतर "अबलां"चे काय.?


     या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून "स्त्री वंशा" वर होणाऱ्या अत्याचारात केवळ प्रचंड नव्हे तर अति प्रचंड अशी वाढ झाली असून आज या जिल्ह्यातील कोणत्याही वर्तमानपत्राचे कोणतेही पान उघडल्यास केवळ महिलाच नव्हे तर लहान लहान निरागस आणि निष्पाप, कोवळ्या मुला मुलींवर "लैंगिक अत्याचार" झाल्याच्या घटना वाचून समाजमन अगदी सुन्न होऊन जाते.पाच सहा वर्षे वयाची अजाण मुलेमुलीही ह्या लिंगपिसाटांच्या कचाट्यातून सुटत नाहीत,हे पाहून या कुणातरी "स्त्रीच्याच पोटी" जन्म घेतलेल्या "हैवानी प्रवृत्ती"च्या नराधमांच्या बाबतीत मनात अगदी क्रूर विचार येत असल्याचे बरेच लोकं बोलून दाखवतात, परंतु याही ठिकाणी कायदा आडवा येतो ही त्यांची खरी अडचण आहे.

     इतक्यातच ह्या "लिंगपिसाटां"चे अशा पद्धतीने एवढे भयानक पीक कसे काय उत्पन्न झाले हे समजण्यास काहीच मार्ग नाही.बरे ह्या लिंग पिसाटांची वरून दिसणारी वा भिंग काचाचा ही चष्मा लावून पाहील्यास आढळून येतील अशी कोणतीही लक्षणे देखील दिसत नाहीत.

    दुष्काळाच्या काळात अमेरिकेतून आयात करण्यात आलेल्या "मिलो" नावाच्या तिकडच्या डुकरांचे खाद्य असलेल्या ज्वारी सोबत "गाजर गवत व बेशरम" नावाचे ना धड "झाड ना वेल" असलेल्या प्रकारची वनस्पती देखील आल्या होत्या. त्यावर कितीही रासायनिक फवारे मारा अथवा उपटून,तोडून अथवा कापून टाका,ते पुन्हा तोडले तिथूनच नव्याने जन्म घेऊन वाढायला लागते.अगदी तसेच ह्या लिंगपिसाटांचे झाले आहे.हे नराधम राक्षस कितीही पकडले, कसेही झोडले,यांचे हातपाय जरी तोडले तरी "रक्तबीजा" सारखे आणखी चार पाच पुन्हा "पैदा" होतच आहेत.दररोज कुठे ना कुठे ह्या "सैतानी प्रवृत्तीच्या नामर्द" लोकांचे "बाया पोरींचे लचके" तोडणे सुरूच असते.


     पावसाळ्याच्या दिवसांत अचानकपणे काही आजार हवेतून पसरतात.काही रोगांचे जंतू हवेतून पसरल्याने त्याचा इतरांना देखील संसर्ग होतो.परंतु काही ठराविक औषधे घेतली की हा आजार बरा होतो.मात्र ह्या लिंगपिसाटांच्या बाबतीत असे कोणतेच कारण नाही.हा संसर्गाने होणारा आजार तर अजिबात नाही.परंतु जर हा "मानसिक आजार" आहे असे काही डॉक्टर्स म्हणतात,मग हा कोणता का असे ना जर आजार आहे तर यावर काही इलाज अथवा उपचार का नाहीत.? हा सगळ्यांनाच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.


    जिल्ह्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळी "ऑपरेशन" सुरू करण्यात आली आहेत, मात्र महिला व कोवळ्या जीवांवर होणाऱ्या ह्या "लैंगिक अत्याचारां"च्या विरुद्ध एखादे ऑपरेशन सुरू करण्याची वा "मिशन राबविण्या"ची गरज पोलिस विभागाला का वाटत नसावी.? आणि खरेतर पोलिस विभागालाच ही गरज का पडावी.? समाजातील मोठमोठे नेते,सामाजिक कार्यकर्ते,आमदार, खासदार,विविध क्षेत्रातील मोठमोठे पुरस्कार विजेते ह्यांना याबाबतीत काहीच करावेसे का वाटत नाही.? मग तुमच्या ध्यान,धारणा विपश्यना ह्या काय फक्त पैसे कमावण्याचे धंदेच आहेत काय.? समाज हितासाठी काहीतरी योगदान देण्याची तुमची जबाबदारी नाही काय.? टँकरने भरभरून ज्ञान वाटणारे  "Motivational" स्पीकर्स ह्याबाबतीत काहीच का बोलत नाहीत.? "समाजाची मानसिकता बदलण्याचा ठेका" घेतल्यासारखे बोलणाऱ्या ह्या लोकांची ह्या बाबतीत काहीच जबाबदारी नाही काय.?


     आज समाजातील बऱ्याच लोकांचे असेही काही "गैरसमज" आहेत की कोणत्याही गोष्टीला उत्तेजन दिले की त्यातूनच "प्रतिक्रिया" म्हणून काही गुन्हे घडतात.जसे की स्त्रिया व मुलींनी तोकडे कपडे घातले वा नको तेव्हढे शरीराचे प्रदर्शन मांडले की छेडखानीचे प्रकार घडणारच. बरोबर आहे त्यांचेही, ते त्यांच्याच  असलेल्या मानसिकतेनुसारच विचार करणार. परंतु आता प्रश्न येतो की लहान पाच सहा वर्षे वय असलेली निरागस मुले व मुली शरीराचे कोणते प्रदर्शन मांडतात.? ते कोणते उत्तेजक हावभाव करतात.? जर याचे उत्तर नाही असेच असेल तर मग त्यांच्यावर ही लैंगिक अत्याचार का होतात.? याचे उत्तर कोण देणार आहे.त्या लहान लहान निरागस मुलांनाच तुम्ही दोष देणार आहात काय.? ज्या मुली महिलांवर अत्याचार होतात त्यांनाच तुम्ही दोष देणार काय.? त्या स्वतःवर अत्याचार का करवून घेण्यासाठी शरीराचे प्रदर्शन मांडतात काय.?

    "आजकाल लोकांची नैतिकता संपत चालली,त्यांच्यावर चांगले संस्कारच होत नाहीत,मुलांकडे आई वडिलांचे लक्षच नाही", अशाच पद्धतीची आणखी काही दहावीस कारणे कोणताही शहाणा सांगू शकेल,यात दुमत नाही.

      असे जर आहे तर मग "रक्षा बंधना"च्या भाऊ बहिणीच्या सणाला "राखीच्या व्यवसायात" अब्जावधी रुपयांची उलाढाल होण्याचे कारण काय.? विविध धर्मियांत साजरे केले जाणारे सार्वत्रिक सन,जयंती व उत्सव ह्यामध्ये वाढत जाणाऱ्या गर्दी व सहभागाचे कारण काय.? धार्मिक उन्माद वाढण्याचे कारण काय.? विविध प्रार्थनास्थळे, बुवा, बाबांच्या कीर्तन, प्रवचन व सत्संग याठिकाणी सर्वच वयोगटातील पुरुषांची गर्दी वाढण्याचे कारण काय.? हे मौलाना, महाराज,बुवा आणि बाबा त्या त्या धर्मातील संस्कार देण्याचे काम करतात की लैंगिक अत्याचार करण्याचे.? कोट्यावधी रुपये खर्च करून हे कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात येते,ते संस्कार देण्यासाठी की वाईट मार्गाला लावण्यासाठी.? अर्थात सन्मार्गाला लावण्या साठीच.तरी हे प्रकार का घडतात.? कोणताही धर्म महिला व अल्पवयीन मुलामुलींवर अत्याचार करा म्हणून सांगत नाही.

      आजकाल कोणीही कुणालाही वाईट मार्गाला लावत नाही,कुणाकडे तेव्हढा वेळही नाही.संस्कार हे आईवडील आणि गुरुजनांकडून सगळ्यांवर सारखेच होत असतात. त्यात कुठेही कमी जास्त असे नसते. वरून कुणी कितीही चांगला आणि सज्जन दिसत असला तरी त्याच्या "अंतर्मनात" काय चालले आहे हे कुणीच ओळखू शकत नाही.व्यक्तीचा स्वभाव कितीही चांगला असला तरी त्याचा "नेमका भाव" काय आणि कसा आहे हे ओळखता येणे शक्यच नाही,आणि त्यातूनच आज जे घडू नये ते प्रकार घडत आहेत."क्षणिक सुखाच्या मोहापायी" केवळ तरुणच नव्हे तर वयाने वार्धक्याकडे झुकलेले "म्हातारे" देखील  "आयुष्याचे मातेरे" करून घेत आहेत.


    या जिल्ह्यातीलच नव्हे तर इतरत्रही होत असलेले हे प्रकार थांबविण्या साठी समाजातील त्या त्या क्षेत्रातील व्यासंगी,सृजनशील व्यक्तिमत्वाच्या लोकांनी समाजाच्या हितासाठी तरी पुढे येऊन केवळ तरुण पिढीच नव्हे तर सर्वच वयोगटातील लोकांना ह्याच "आयुष्याच्या दुश्मन" ठरलेल्या "क्षणिक सुखाच्या मोहा"पासून मुक्ती मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन "प्रबोधन" करण्याची गरज आहे.


    "समाज" नावाच्या समूहात जीवन जगत असताना "नैतिकता" प्रत्येकच व्यक्तीत काठोकाठ भरलेली आहे, त्यांच्यावरही भरपूर "संस्कार" झालेले आहेत.त्यांना फक्त "क्षणिक सुखाच्या मोहा"पासून स्वतःला कसे दूर ठेवता येईल याची "जाणीव" करून देणे ही आज रोजी महत्त्वाची गरज आहे.
    प्रत्येकच ठिकाणी पोलिस आणि कायदा काम नाही करू शकत. पोलिस अशाप्रकारचे गुन्हे घडण्याचे थांबवू शकत नाहीत,आणि ते शक्यही नाही.अशाप्रकारचे गुन्हे घडण्यापूर्वी जो हा गुन्हा करतो त्यालाही काहीच कल्पना नसते की आपल्या हातून असे काही घडेल. पोलिसांचे काम ह्याबाबतीत तरी गुन्हा घडल्यावरच सुरू होते.ज्याच्या बाबतीत हा गुन्हा घडतो ती व्यक्ती आणि जो हा गुन्हा करतो ती व्यक्ती,ह्या दोघांनाच ह्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते.एकाच्या मनावर झालेले "आघात" मरेपर्यंत ती व्यक्ती विसरू शकत नाही,तर  दुसऱ्याला कायदेशीर शिक्षेपेक्षाही "सामाजिक बहिष्कारा"ची भयानक अशी व क्षणिक मोहापायी केलेल्या "चुकीच्या पद्धतापा"ची अशी "तिहेरी शिक्षा" आयुष्यभर भोगावी लागते. अर्थात काही "भावनाशून्य" लोकांचा मात्र याला "अपवाद" असू शकतो.
    
    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या