रोहित पवारांवर गुन्हा दाखल,पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत वाद केल्याचे कारण...



     विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवन परिसरात गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आपापसांत भिडले. या राड्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस ठाणे दणाणून सोडले. 

   मात्र इतकेही करून नितीन देशमुख यांचा कुठेच पत्ता लागत नसल्याने यावेळी रोहित पवार यांचा पारा चांगलाच चढला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

   व्हायरल व्हिडीओबाबत रोहित पवार म्हणाले होते की,आम्ही चार तासांपासून नितीन देशमुख यांचा शोध घेत होतो. पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नव्हते. इकडून तिकडे फिरवत होते. आम्ही आधी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात   गेलो, तिथून आझाद मैदान पोलीस स्थानकात गेलो. तिथल्या एपीआयला हे सगळे काय चालले ते कळत नव्हते. ते उडवा उडवीची उत्तरे देत होते. हे लोक प्रतिनिधीसोबत असे वागत असतील तर गोर गरीबांसोबत कसे वागत असतील.?आमचे एवढेच मत आहे की, दोन आमदार, एक माजी मंत्री समोर असतानाही पोलीस नीट माहिती देत नव्हते. मग्रुरी दाखवत होते. लोक प्रतिनिधींसोबत असे वागत असतील, हातवारे करून बोलत असतील तर या लोकांनाही कुठेतरी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. कार्यकर्त्याचे टेन्शन होते आणि आवाज वाढला. याला दमदाटी म्हणत असाल तर कार्यकर्त्यासाठी, सामान्य लोकांसाठी पोलीस प्रशासन सहकार्य करत नसेल तर हा आवाज आणि ही स्टाईल शेवटपर्यंत ठेऊ, असेही ते म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या