मराठी आयएफएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा,वनमंत्र्यांनी दिले आश्वासन...



       वन विभागातील मराठी आयएफएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून  वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणाची दखल घेत तत्काळ नियुक्त्या करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात मराठी अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत.

     शासनाने २४ जूनला वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या यादीत २३ मराठी अधिकाऱ्यांना बढती मिळाल्यानंतरही त्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. उलटपक्षी, बदल्यांसाठी पात्र नसलेल्या काही अधिकाऱ्यांना मात्र त्यांच्या इच्छेनुसार महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले गेले आहे. त्यामुळे मराठी अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

     याची दखल घेत महाराष्ट्र राज्य राजपत्रित वन अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींनी पुण्यात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांना या होत असलेल्या अन्यायासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आठ दिवसांत सर्व नियुक्त्या करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते.

     त्यांच्या या आश्वासनानंतर विभागीय पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे थांबलेल्या नियुक्त्या लवकरच पूर्ण होतील,अशी आशा अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या