अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर पंचायत समिती अंतर्गत ग्रा.पं.दातवी येथील ग्रामसेविका कु.माधुरी कल्याणसिंग दाबेकर, यांनी ग्राम पंचायत निधीतील २५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सादर करण्यात आलेला अंतीम खाते चौकशी अहवाल व त्यांचा वैयक्तिक खुलासा प्राप्त झाल्यावर अपहाराचे आरोप सिद्ध झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी त्यांना सेवेतून बरखास्त केले आहे.
कु.माधुरी कल्याणसिंग दाबेकर, तत्का. ग्रामपंचायत अधिकारी, दातवी, पंचायत समिती, मुर्तिजापुर यांच्या विरुध्द २५ लाख रुपयांचा अपहार केल्याबाबतचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना निलंबित करीत अकोला जिल्हा परिषदेतील कृषि विकास अधिकारी तथा चौकशी अधिकारी, जिल्हा परिषद,अकोला यांनी विभागीय चौकशी केली असता त्या बाबत प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल सादर करण्यात आला असुन माधुरी दाबेकर यांचेवर ठेवण्यात आलेले एकुण ०९ (नऊ) आरोपापैकी आरोप क्र.२ ते ६ व ८ हे अंशतः सिध्द व आरोप क्र.१,७ व ९ हे पूर्णतः सिध्द होत असल्याबाबत निष्कर्ष चौकशी अधिकाऱ्यांनी अहवालात दिलेला आहे.
कु.माधुरी कल्याणसिंग दाबेकर, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती, मुर्तिजापुर यांना शिक्षा प्रस्तावित करणे बाबत अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.त्यानुसार त्यांनी आपल्या बचावासाठी खुलासा सादर केला होता.परंतु प्राप्त खुलाश्याचे अवलोकन केले असता, त्यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यामुळे त्यांचा खुलासा अमान्य करण्यात येऊन त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे अंशतः व पुर्णतः सिध्द झाल्या मुळे महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ५ अन्वये असलेले अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ४ मधील तरतुदीनुसार सदर प्रकरणात शिक्षेचे अंतिम आदेश पारीत करीत अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्यवकार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम ह्यांनी दिनांक १४/७/२०२५ लाच कु.माधुरी दाबेकर यांना सेवेतून बरखास्त करण्याचे आदेश काढण्या आले आहेत.
अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम यांनी सदरहू ग्राम सेविकेवर सेवेतून बरखास्तीची कारवाई करीत असतानाच या ग्रामसेविकेकडून २५ लाख रुपये वसुल करण्याचे आदेश पारित करीत त्याची अपहार प्रकरणांत ग्राम विकास विभागाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे अंमलबजावणी करून कारवाई करण्याचे देखील ह्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.



0 टिप्पण्या