शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.गजानन पुंडकर यांना भरसभेत "गलिच्छ शिव्यांचा नजराणा"..!



   तो आला, त्याने गाडी उभी केली, तो ऐटीत चालत चालत सभास्थळी असलेल्या मंचावर गेला आणि तो त्यांच्या गळ्यात पुष्पमाला टाकणार असे वाटत असतानाच त्याने त्यांच्यावर "गुलाब फुलांच्या पाकळ्यां"चा वर्षाव करावा अशा पद्धतीने प्रचंड "अश्लील भाषेत शिव्यांचा वर्षाव" सुरू केला.कितीतरी वेळ मंचावर बसलेले आणि सभेला उपस्थित समोर असलेले श्रोते मात्र फक्त "आ वासून" पाहत राहिलेत. कुणीही "शिवीगाळ" करणाऱ्या व्यक्तीला अडविण्याचा प्रयत्न केला नाही ही मात्र प्रचंड आश्चर्याची बाब आहे.

    भर सभेत खालची मान वर न करता शिव्यांचा भडिमार सहन करणारी, ही व्यक्ति दुसरी तिसरी कुणी सामान्य व्यक्ती नव्हती तर ते होते विदर्भातील नामांकित श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन के.पुंडकर,आणि ही अश्लील शिवीगाळ करणारा त्यांच्याच संस्थेद्वारा चालविल्या जात असलेल्या हायस्कूल मधील शारीरिक शिक्षक असून अजय पंजाबराव हिंगणकर असे त्याचे नाव आहे.


   काल शनिवार दि.१२/७/२०२५ ला अकोट शहरातील दर्यापूर मार्गावर असलेल्या "श्रद्धासागर" ह्या ठिकाणी स्व.बी.टी.धांडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.त्याच कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.गजानन के.पुंडकर,तालुक्यातील ज्येष्ठ सहकार नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष रमेश हिंगणकर व इतरही काही नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते.दुपारी १२ वाजताच्या दरम्यान दर्यापूर तालुक्यातील भामोद येथील शिवाजी संस्थेच्या हायस्कूल वर शारीरिक शिक्षक असलेला अजय पंजाबराव हिंगणकर हा त्या ठिकाणी आला व त्याने त्याच्या करण्यात आलेल्या बदलीच्या कारणावरून संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर ह्यांना "अश्लील शिवीगाळ" केली. त्यावेळी त्या मंचावर उपस्थित असलेले रमेश हिंगणकर यांनी देखील त्यांच्या पुतण्याला "आवरण्याचा " प्रयत्न केला नाही असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

   ज्याठिकाणी हा सर्व प्रकार घडला त्या "श्रद्धासागर"ची निर्मितीच सदरहू शिवीगाळ करणाऱ्या शिक्षकाचे  "देवस्वरूप" वडील स्वर्गीय पंजाबराव हिंगणकर यांच्या प्रेरणेने व प्रयत्नाने झाली,हे विशेष.त्याच "पुण्यात्म्या"च्या ह्या पावन  "कर्मभूमी"त त्यांच्याच चिरंजीवाने आपल्या चुलत्याच्या उपस्थितीत अशा पद्धतीने "दिवे लावावेत" ही खरोखर शरमेची बाब आहे.ही दुर्दैवी घटना घडली त्यावेळी हा शिक्षक "मदिरे"च्या अंमलाखाली असल्याचे बोलल्या जात आहे,आणि त्यामुळेच त्याला कुणीही आवरण्याचा प्रयत्न केला नाही  असेही सांगितल्या जात आहे.

     झालेल्या प्रकाराबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर यांनी दुपारी अकोट शहर पोलिस स्टेशनला कालवाडी येथील रहिवाशी शिक्षक अजय पंजाबराव हिंगणकर विरुद्ध अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे समजते.

   श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षाला भर सभेत अश्लील शिवीगाळ केल्याबद्दल संस्थेचे संचालक मंडळ व शाळेचे व्यवस्थापन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.ॲड गजानन पुंडकर हे पोलिस पाटील संघटनेचे देखील राज्य स्तरावरील पदाधिकारी असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवर अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे हे किती तत्परता दाखवतात हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.

    

    





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या