सहसा स्मशान भूमीच्या कामात कोणताही अधिकारी वा कर्मचारी सहजासहजी "भ्रष्टाचार अथवा लाचखोरी" करीत नाही आणि असाच अलिखित नियम या "कलियुगात" सगळेच पाळतात. कारण त्यांनाही कधीतरी या ठिकाणी "यायचेच असते",हे त्यांनाही चांगलेच ठाऊक असते. मात्र यवतमाळ जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या एका उपअभियंत्याला स्मशान भूमीच्या कामात देखील कमिशन घ्यायची "लाज वाटली नाही",आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.एसीबीने त्याला पोलिस कोठडीत "भूत" दाखविलाच.
गेल्या काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने एका गावातील स्मशान भूमीच्या दुरुस्ती व सुशोभिकरणा साठी ग्राम पंचायतीला निधी मंजूर करून सरपंचाच्या माध्यमातून हे काम करवून घेतले होते. सरपंचांनी केलेल्या कामाच्या देयकाची रक्कम देण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करून सदरहू काम पूर्ण आणि व्यवस्थित केल्याच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम उप अभियंत्याने त्यांना दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याप्रकरणी तक्रारदार सरपंच यांनी आपल्या गावातील स्मशानभूमी सुशोभिकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर त्याचे देयक काढण्या साठी उप अभियंत्याची भेट घेतली होती. मात्र त्याने एकूण १० लाखांच्या मंजूर रकमेच्या २ टक्के रक्कम म्हणजेच २० हजार रुपयांची लाच मागितली होती.मात्र लाचेची रक्कम द्यावयाची नसल्याने तक्रारदाराने १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी लाचेच्या मागणीची सत्यता पडताळणी केली असता त्या दरम्यान तडजोडीनंतर १० हजार रुपयांवर सहमती झाली. त्यानुसार १६ जुलै रोजी आर्णी येथील शासकीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम उप अभियंत्याच्या सूचनेनुसार चालक सागर भारती याने पंचांसमक्ष स्वीकारताच दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या उपअभियंत्याचे नाव संतोष भगवानराव क्षिरसागर,वय ५३ वर्षे असून, तो जिल्हा परिषद, यवतमाळच्या बांधकाम उपविभाग, आर्णी येथे कार्यरत आहे. त्याच्यासह त्याचा खाजगी चालक सागर शंकर भारती,वय २७ वर्षे यालाही लाच घेताना अटक करण्यात आली आहे.




0 टिप्पण्या