बुधवारी बुलढाणा एसीबीच्या जाळ्यात अडकलेला जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळेसह देवानंद खंडाळे नावाच्या एका खाजगी इसमाला दिनांक २३ जुलै २५ रोजी २५ हजार रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी बुलढाणा एसीबीने अटक केली होती. या प्रकारानंतर जिल्हाभर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान याप्रकरणी एसीबीने दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी असलेल्या ॲड.शर्वरी सावजी -तुपकर यांच्या युक्तीवादाने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे यांनी गजानन टेकाळे याच्यासह देवानंद खंडाळे नामक आरोपीला जामीन मंजूर केला.
एकाच दिवशी न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी फेटाळणे आणि त्याच दिवशी जामीन मंजूर होण्याचे हे आश्चर्य जनक प्रकरण आहे.ॲड.शर्वरी सावजी,तुपकर यांनी गजानन टेकाळेला सोडविण्यासाठी प्रभावी युक्तिवाद केला.
काल एसीबीने केलेल्या कारवाई नंतर पुढील तपासासाठी आज पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. गजानन टेकाळे यांच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड.शर्वरी सावजी - तुपकर यांनी युक्तिवाद केला. शर्वरी सावजी -तुपकर यांनी पोलीस कोठडीच्या मागणीसाठी एसीबीने केलेले सर्व आरोप फेटाळले.गजानन टेकाळे यांच्याकडे सापडली नाही किंबहुना त्यांनी स्विकारली नाही. एसीबीने ही कारवाई करण्यासाठी दोनदा पडताळणी कारवाई केली, त्यामुळे मुद्दामहुन आपल्या पक्षकारास अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. याशिवाय टेकाळे यांनी एसीबीकडे केलेल्या तात्काळ लेखी खुलाशामध्ये फिर्यादीच्या ज्वारीच्या बिलाचा व खरेदीचा पुरवठा विभागाशी कोणताही सबंध नाही, असे नमूद केले होते त्यामुळे गजानन टेकाळे यांचेकडे फिर्यादीचे कोणतेही काम प्रलंबित नसल्याने लाचेची मागणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तीवाद शर्वरी सावजी यांनी केला. या प्रकरणातील तक्रारदार हा शेतकरी नसून व्यापारी असल्याचेही ॲड.तुपकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.शिवाय तक्रारदार आणि आरोपी क्रमांक दोन असलेला खाजगी इसम हे एकाच गावचे असल्याचेही ॲड. तुपकर यांनी युक्तीवादात सांगितले, त्यामुळे लाच स्वीकारण्याचा आरोप असलेला आरोपी क्रमांक दोन खंडाळे आणि तक्रारदार यांचे काही वेगळे व्यवहार असू शकतात हा मुद्दा देखील ॲड. शर्वरी तुपकर यांनी प्रभावीपणे मांडला. त्यांनी काही जुने निकाल दाखवून केलेला युक्तिवाद ऐकून न्यायालयाने गजानन टेकाळे यांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळली. कुठल्याही अटी शर्ती विना, टेकाळे यांना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.



0 टिप्पण्या