धारणी उप जिल्हा रुग्णालयाचे वै.अधिक्षक डॉ.जावरकरचीआरोग्य मंत्र्यांकडे तक्रार, तात्काळ बदली करण्याची मागणी...



   धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दयाराम बाबुलाल जावरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून त्याच पदावर ठिय्या मांडून बसलेले आहेत. त्यांनी धारणीत स्वत:चे खाजगी हॉस्पीटल उघडले असून ते शासकीय रूग्णालयातील रूग्णांना त्यांच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी बोलावत असल्याची तक्रार युवा स्वाभीमान पक्षाचे धारणी तालुका अध्यक्ष दुर्योधन जावरकर यांनी थेट राज्याच्या आरोग्य सचिवाकडे तक्रार केली होती. 


    डॉ.जावरकर यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजविल्याने आता मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी थेट डॉ.जावरकर विरोधात राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे तक्रार करून तात्काळ त्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच डॉ.जावरकर, एमएस पदावरून पायदउतार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
   
   आ.केवलराम काळे यांच्या तक्रारी नुसार,डॉ. जावरकर मागील दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असून, त्यांच्यावर रुग्णसेवेत अकार्यक्षमता, गैरव्यवहार, आणि अनियमिततेच्या वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे, अत्यावश्यक सेवांमध्ये दुर्लक्ष आणि जबाबदारी टाळण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचेही आमदार काळे यांनी निदर्शनास आणले आहे.

   धारणी उपजिल्हा रुग्णालय हे आदिवासी बहुल मेळघाट भागातील एकमेव मोठे आरोग्य केंद्र आहे. येथील जनतेचा विश्वास शासकीय वैद्यकीय सेवांवर आहे. मात्र डॉ.जावरकर यांच्या निष्काळजी व अनियमित कामकाजामुळे रुग्णांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे आमदार काळेंनी तक्रारीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेता डॉ. जावरकर यांची तातडीने इतरत्र बदली करून त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आ.काळेंनी  आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
   
   धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक (एमएस) डॉ.जावरकर यांच्याविरोधात मनमानी कारभार, हलगर्जीपणा आणि रुग्णसेवेत गंभीर दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून युवा स्वाभिमान पक्षाचे धारणी तालुका अध्यक्ष दुर्योधन जावकर यांनी उपसंचालक (आरोग्य सेवा,अमरावती विभाग), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीची आणि त्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी डॉ. जावरकर यांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. आता मेळघाटचे आमदार केवलराम काळेंनी डॉ.जावरकरांची थेट आरोग्यमंत्र्याकडे तक्रार केल्याने लवकरच डॉ.जावरकर यांचा एमएस पदावरून पाय उतार होईल,अशी चिन्हे दिसू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या