जालना शहरात दिवंगत पत्रकारांच्या नावे एकही स्तंभ नसून या पत्रकारांचे मोलाचे योगदान राहिलेले असून त्यासाठीच त्यांच्या ही नावे शहरात एखादा तरी स्तंभ असावा आणि तो जालना शहर महापालिकेकडे व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.
यासंदर्भात बागडी यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यात सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक, उद्योजक, माजी सैनिक आदींच्या नावाने शहरात अनेक रस्ते, चौक, कमान बांधण्यात आलेले आहेत. पण या सर्वांच्याच कामाची योग्य ती दखल घेऊन त्यांना प्रसिध्दी देणारे चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांच्या नावे कुठेही किंवा कोणत्याही चौकात किंवा रस्त्यावर एकही स्तंभ नाही. जालना शहराच्या मध्यभागी म्हणजेच टाऊन हॉल येथे पत्रकारांसाठी एक स्वतंत्र स्तंभ उभारण्यात यावा, जिल्ह्यात दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या नावे असा पत्रकार स्तंभ असेल तर तो ह्या पत्रकारांच्या कार्याची शहरातील नागरिकांना सतत आठवणी करून देईल.
शशिकांत पटवारी, उदय पटवारी, लक्ष्मण पायगव्हाणे, गणेश जळगांवकर, सतीष सुदामे, दिगंबर शिंदे, रमण गायकवाड, मनोहर बुजाडे, श्रीकृष्ण भारुका, शेख अलीम, अबुल हसन, राजेंद्र तिरुखे, लक्ष्मीनारायण पिपरिये, लक्ष्मी नारायण गौड, सुरेंद्र जैस्वाल, रतनलाल कुरिल, चंद्रकांत शहाणे, अनिल खंदारे यांच्यासारखे अनेक पत्रकार असे आहेत की, त्यांनी आपले संपूर्ण जीवन पत्रकारितेला वाहिले आहे. परंतू त्यांच्या नावाने शहरात एखादाही स्तंभ असू नये, ही खेदाची बाब म्हणावी लागेल.
म्हणूनच या सर्व दिवंगत पत्रकारांची आठवण म्हणून तरी जालना शहरात महानगर पालिकेने एखादा तरी स्तंभ उभारावा,अशी विनंती व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी प्रशासनाकडे केली आहे.




0 टिप्पण्या