गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्याच्या अकोट शहरातील नागरिक "संडास व उलट्यां"चा त्रासाने बेजार झाले असून आज रोजी ह्या शहरांत सगळ्याच डॉक्टरांचे दवाखाने "हाऊस फुल्ल" असून ५ ते ७ हजार सलाईन रुग्णांना दररोज लावण्यात येत असून ही अतिशय चिंतेची बाब आहे.
दोन दिवसांपासून पावसाने जरी उघडीप दिली असली तरी वातावरण उष्ण व थंड असे संमिश्र स्वरूपाचे आहे.नुकत्याच झालेल्या पावसाने नदीनाल्यांना पूर येऊन गेले असून हे पाणी मोठ्या धरणांमध्ये साठविले गेले आहे. अकोट शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा हा वाण धरणाच्या "जलपरी"वरच अवलंबून असल्याने ह्या नवीन पाण्याने तालुक्यात "जलजन्य" आजाराचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणांत वाढले आहे.
अकोट शहरांमधील वाण धरणाचे पाणी साठविण्यासाठी उभारण्यात आलेल्या "जलकुंभां"ची गेल्या वर्षभरातही कोणत्याही स्वरूपाची साफसफाई करण्यात आलेली नाही,तर झालेल्या पावसामुळे दूषित झालेल्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी "क्लोरिन गॅस" व पावडरचा वापर अत्यल्प प्रमाणांत अथवा केल्याच जात नसल्याने शहर व तालुक्यात पाण्यापासून होणाऱ्या आजारांच्या रुग्णांच्या प्रमाणांत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
अकोट शहरात असलेल्या जवळपास सर्वच्या दवाखान्यात रुग्णांची तोबा गर्दी वाढली असून एकेका दवाखान्यात दरदिवशी ५००/७०० सलाईन ह्या रुग्णांना लावण्यात येत आहे.जवळपास सर्वच हॉस्पिटल व क्लिनिक मध्ये पोटाच्या विकाराच्या म्हणा वा संडास, उलटी व जुलाबाच्या रुग्णावर उपचार करतांना डॉक्टर मंडळी जागेअभावी रुग्णांना बसायला व झोपण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने खाली जमिनीवर झोपून सलाईन वा इतर तत्सम उपचार रुग्णांना घ्यावे लागत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील नागरिक "संडास व उलट्यां"च्या त्रासाने वैतागले असले तरी स्थानिक नगर पालिका प्रशासन मात्र अजूनही झोपेतच आहे वा "झोपेचे सोंग" घेत असल्याचे "निर्लज्जपणा"चे चित्र आहे.तर ग्रामीण भागात याहूनही वाईट चित्र असून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागच "सलाईन"वर असल्याचे जागोजागी म्हणा किंवा गावोगावी अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.
अकोट नगर पालिकेतील मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे हे स्वतःच्या नावापुढे डॉक्टर लावतात परंतु ते माणसांचे डॉक्टर आहेत की कुत्रे,मांजर व डुकरांचे हे समजण्यास काहीच मार्ग नाही कारण ते जरी अकोट नगर पालिकेच्या क्षेत्रातील लोकांच्या हितासाठी २४ तास बांधिल असले तरी ते ह्या शहरांत अजिबात राहत नसून अकोला ह्या जिल्ह्याच्या ठिकाणावरून आठवड्यातून एक दोन दिवस,फक्त काही कामे असली तरच येतात.अन्यथा त्यांच्या मोबाईलमध्ये दिसत असलेल्या सी.सी.टी.व्हि. च्या माध्यमातून नगरपालिकेच्या कामाचा गाडा "हाकलतच" आहेत. सांगण्याचा अर्थ इतकाच की जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आरोग्य विभागाप्रमाणेच अकोट नगर पालिकेच्या आरोग्य विभागालाही सर्वसामान्य नागरिकांच्या "आरोग्य व जीवित्वा"शी काहीही देणे घेणे नाही.
मान्सूनपूर्व नाले सफाई व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा काही भागात केल्याच न गेल्याने खोलगट भागात नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी साचलेले असून त्यावर शहरांत रोगराईचा प्रसार करणारे मच्छर व जीवघेणे जंतू यांची "पैदास" वाढली असल्याने आता शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत.नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने यावर औषध फवारणी अथवा साफ सफाईचा कोणताही उपाय न केल्याने आज रोजी विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले असल्याचे चित्र शहरातील दवाखान्यांवर सहजच एक नजर टाकली तरी उघड्या डोळ्यांनी सहज दिसून येईल.
कोट्यावधी रुपये हेच डॉक्टर बेंबरे शहरांत आरसीसी कन्स्ट्रक्शन व रस्ते बांधकामांवर "वारेमाप" पद्धतीने खर्च करीत असताना नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या निर्माण झालेल्या ह्या समस्येवर २/३ लाख रुपये खर्च का करीत नाही हा फार मोठा प्रश्न ह्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
अकोट शहरांत जागोजागी शहरातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईप लाइन फुटलेल्या असताना युद्धपातळीवर त्यांची दुरुस्ती का केल्या जात नाही.? ह्याच पाईप लाईंनमधून नाल्यांमधील साचलेले आणि वाहणारे घाण पाणी नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या "आरोग्याचा खेळ खंडोबा" करीत आहे तरी हे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी काय करतात हे एक न समजणारे कोडेच आहे.
एकूणच काय तर अकोट तालुक्या तील सर्वसामान्य,निष्पाप लोकांच्या आरोग्याशी "खेळ खेळणाऱ्या" संबंधित यंत्रणांना काहीच देणे घेणे नसले तरी ह्या यंत्रणांचा "कान पकडून" त्यांना कामाला लावणारे लोकप्रतिनिधी देखील "मूग गिळून" गप्प बसलेले असल्याने स्वतःचा व आपल्या परिवारातील लोकांचा जीव वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावत "खिशाला खार" लावणे येथील "भगवान भरोसे" जनतेला गरजेचे झाले आहे.











0 टिप्पण्या