"चड्डीतील दोस्त" राजकारणात एकमेकांचे "कट्टर दुश्मन" का झाले..?



     राज्यातील राजकारणाच्या "सारीपाटा" वरील अकोट हे गाव तसे दिसायला खूप चांगले आहे,परंतु येथील राजकारणी मात्र नेमके कसे आहेत.? हे आजपर्यंतही कुणीच सांगू शकले नाही.ह्या गावाला महाभारत काळापासून इतिहास आहे जो इतर गावांना नाही.   

    संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अकोट शहर हे राजकारणाच्या बाबतीत अगदी "बिन भरवशा"चे आहे हे गेल्या अनेक वर्षांत याठिकाणी वास्तव्य करून असलेल्या आणि बाहेर बसून राजकारणाच्या "सोंगट्या" टाकणाऱ्या राजकारणातील मुरब्बी लोकांना चांगलेच माहिती आहे. सोबत राहून "विश्वासघात" करण्याची ह्या मतदार संघाची खासियत आहे.जी अनेक दिग्गजांनी आजमावलेली आहे.

    आजच्या घडीला अकोट मतदार संघात राजकारणातील दोन एकेकाळच्या "जिगरी दोस्तां"च्या राजकीय "दुष्मनी"चा विषय एकूणच चर्चेचा विषय झालेला आहे. जन्मापासून एकाच गावात राहून लहानाचे मोठे झाले,पुढे शाळेतही सोबतच गेले.इतकेच काय तर थोडे मोठे झाल्यावर एकाच संघटनेत प्रवेश केला.त्यानंतर  त्याच संघटनेचा राजकीय पक्ष झाल्यावर दोघांनीही "एकदिला"ने सोबतच काम केले. त्यांचा मित्र त्यावेळी विधानसभेच्या  निवडणुकीत पडला तरी मात्र विजय त्यांचाच झाला.कारण पक्षाचे "अध्वर्यू" असलेला नेता ह्याच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला.पुढे ह्याच पक्षात महत्वाची पदे देखील मिळाली.दरम्यान एकाची पत्नी जिल्हा परिषदेत सर्कल मधून निवडून येत सरळ सभापती देखील झाली तर दुसरा बाजार समितीवर आधी शासन नियुक्त "प्रशासक" तर नंतर झालेल्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आला.

     दरम्यानच्या काळात राज्यात सत्तापालट झाल्याने संघटनेच्या नेत्याचे मंत्रीपद गेले.आणि राजकारणातील निर्माण झालेले महत्व कमी व्हायला लागले.परंतु त्यावर दुसऱ्याने पर्याय म्हणून सत्ताधारी पक्षात प्रवेश करून आपले "अस्तित्व कायम" ठेवण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याला तशी काही गरजच पडली नाही. कारण त्याने आपले बस्तान व्यवस्थितरीत्या बसवून आपले होता त्याच पक्षात राहून आपले "राजकीय उपद्रव मूल्य" कायम ठेवले.

     इथपर्यंत सगळे काही ठीक होते,मात्र ह्या "एक जान दो जिस्म".. असलेल्या दोन जिगरी दोस्तांच्या मधात असे काय झाले किंवा घडले की,आज हे एकमेकांच्या राजकीय "उण्या"वर उतरले आहेत.? हाच ह्या गावातील लोकांना प्रश्न पडला आहे.एकमेकांसाठी जीव देण्याची व घेण्याचीही मानसिकता असलेल्या ह्या दोघांच्याही मध्ये असे काय घडले की त्यातील एकाला दुसऱ्याचे भविष्य "नासवून" त्याला राजकीय आयुष्यातून उठवायचे आहे.?ह्यामागे असा कोण "शकुनी" आहे की ह्या दोघांनाही "भांडत ठेवून" आपली राजकीय पोळी शेकण्याच्या प्रयत्नात आहे.? हा मात्र राजकारणी लोकांसाठी खूप महत्वाचा विषय आहे.हे कुणाच्याही बाबतीत घडू शकते.

    सध्या "गाजत नव्हे तर वाजत" असलेल्या अकोट बाजार समिती मधील "कथित" भ्रष्टाचाराची अर्थात त्यातील ह्याच दोन दोस्तांच्या जोडीतील एकाची तक्रार दुसऱ्या पक्षात गेलेल्या दुसऱ्या दोस्ताने केली आहे. वरकरणी जरी विचार केला तरी ही तक्रार त्याने स्वतः केली असेल असे विचार त्यांच्याबाबतीत "स्वप्नातही" येणे शक्य नाही.मग ह्यामागील "शकुनी" कोण आहे आणि त्याचा ह्यातून काय आणि कोणता राजकीय फायदा होणार आहे.? हा अकोला जिल्ह्याच्या राजकारणातील चांगल्या चांगल्या "धुरंदरांना" पडलेला गहन प्रश्न आहे.कारण हे दोन दोस्त एकमेकांशी भांडू शकतात,बोलणे टाळू शकतात, एकमेकांचे तोंडही त्यांनी गेल्या काही दिवसांत समोरासमोर पाहिले नसेल. परंतु ह्या पद्धतीने एक दुसऱ्याचे महत्प्रयासाने "कमावलेले राजकीय अस्तित्व" आणि भविष्य खराब करणार नाहीत आणि कुणाला करूही देणार नाहीत.कारण हे राजकीय वर्चस्व ह्या दोघांनीच "एकमेकांच्या मेहनतीने व सहकार्याने कमावलेले" आहे.कुणाच्या आशीर्वादाने वा "उपर्यांच्या सतरंज्या उचलून" त्यांनी मिळविलेले नाही.

      ह्या शहराची हीच एकच खासियत म्हणता येईल की,याठिकाणी कुणालाच कुणाचेही चांगले पाहवले जात नाही.जर कुणी कोणत्याही क्षेत्रात स्वतःच्या मेहनतीने पुढे जात असेल तर त्याच्या "मांडीत बोट नव्हे तर वेळप्रसंगी जीभ देखील घालून त्याचा सत्यानाश करण्यासाठी अनेक हितचिंतक टपून बसलेले असतात." हा या शहराचा इतिहास आहे.

    ह्या बाजार समितीत भ्रष्टाचार झाला की नाही.? झाला तर किती रुपयांचा झाला.? प्रत्यक्षात कुणी केला.? हे सर्व प्रश्न आजरोजी तरी सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी गौण आहेत.कारण ह्यामागे चालत असलेले राजकारण,पैसा कमावण्याची हाव,आणि मिळालेले "अल्पसे राजकीय भविष्य" उरलेल्या कालावधीत कायम कसे ठेवता अथवा पुढील पिढीची "पोटापाण्याची" सोय कशी करता येईल हाच ह्या आरोपांचा केंद्रबिंदू आहे आणि असावा अशी ह्या विषयाशी संबंधित लोकांना खात्री आहे.

    एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न ह्या आरोपांच्या प्रकारातून होत असल्याची शंका येते.परंतु आजच्या काळातील हे "शकुनी" हयात कदापीही यशस्वी होणार नाहीत.तर ह्या दोन "चड्डीपासून तर नेतेगिरीच्या पायजामा" पर्यंत दोस्त असलेल्या दोघांचेही राजकीय "अस्तित्व " उजळून निघेल याची खात्री आहे.भविष्याच्या पोटात काहीही दडलेले असेल मात्र "आत्मा कधीही दोन भागांत वेगळा होत नाही".हे शाश्वत सत्य आहे.

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या