पुणे जिल्ह्यातील मंचर ता.आंबेगाव येथील बाजारतळाच्या शेजारी असणाऱ्या ओढ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण झाल्यामुळे पुराचे पाणी पुलावर आणि बाजारात घुसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात (४ जुलै २०२५) वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर वृत्तांकन सुरू असतानाच पांडुरंग मोरडे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या इसमाने खुनी हल्ला केला आहे.
यातील हल्लेखोर पांडुरंग मोरडे खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगून नुकताच तुरुंगाबाहेर आला आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जबर मारहाण अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मंचर येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पांडुरंग मोरडे नावाच्या याच इसमाने या ओढ्यावर मोठी भिंत बांधून जवळपास ५०० ब्रास दगड, मुरूमाचा भराव टाकून गाळे बांधण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे ओढ्याचा प्रवाह रोखल्या जावून मंचर भाजी मंडई, ओढ्यावरील पूल आणि शहरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या अतिक्रमणाच्या संदर्भात मंचर नगरपंचायत आणि निघोटवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने मोरडे याला काम बंद करण्याचे आदेश देऊनही त्याने काम सुरूच ठेवले होते. या बाबत वृत्तांकन करीत असतानाच पांडुरंग मोरडेने स्नेहा बारवे यांच्यावर लाकडी दांडक्याने डोक्यावर, पाठीवर आणि कमरेवर वार केले. हा हल्ला इतका जोरदार होता की, पत्रकार स्नेहा बारवे पहिल्याच फटक्यात जमिनीवर कोसळल्या. यानंतर पांडुरंग मोरडेने त्यांच्यावर अनेक वार केले. या मारहाणीत स्नेहा बारवे बेशुद्ध पडल्या. यानंतर त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात पाठविले.
पत्रकार स्नेहा बारवे यांना मारहाण सुरू असताना तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी ही मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र पांडुरंग मोरडे याने बोलावलेल्या इतर गुंडांनी मारहाण प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्यांनाही जबर मारहाण केली. या मारहाणीत मध्यस्थांनाही दुखापत झाली असून,वासुदेव काळे यांनी याबाबत मंचर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पांडुरंग मोरडेने पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर खुनी हल्ला केल्याने मोरडेवर खुनाचा प्रयत्न आणि पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक पत्रकारांनी केली आहे.


0 टिप्पण्या