उच्च न्यायालयातील न्या.नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदलीसाठी शिफारस...



   मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर
खंडपीठातील प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून शिफारस करण्यात आली आहे. न्या.नितीन सांबरे मागील दीड वर्षांपासून नागपूर खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांची नेमणूक नागपूर खंडपीठात करण्यात आली होती. न्या.अतुल चांदुरकर यांच्या जागी आलेल्या न्या. नितीन सांबरे यांनी नागपूर तसेच विदर्भातील प्रश्नांबाबत अनेक महत्वपूर्ण निकाल दिले आहेत. त्यांनी वेळोवेळी शासन, प्रशासन यांची कानउघाडणी देखील केली असून  सामान्य नागरिकांच्या हितास्तव अंबाझरीमधील पूरग्रस्तांचा मुद्दा, सिमेंट रस्त्यांचा प्रश्न, महा मार्गांची दुरावस्था यासह विदर्भातील अनेक रखडलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना व शासनाला धारेवर धरले आहे.

   न्या.नितीन सांबरे हे मूळचे नागपूरचे असून त्यांचा जन्म १९ डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी सोमलवार हायस्कूल आणि शिवाजी सायन्स कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केले असून १९९२ मध्ये नागपूर येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ मधून कायद्याची पदवी प्राप्त केलेली आहे.शालेय जीवनापासून खेळाडू असल्याने त्यांनी अनेक  राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. १९९१ मध्ये नागपूर येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली तर २५ ऑगस्ट १९९२ रोजी त्यांची वकील म्हणून नोंदणी झाली.

   तत्कालीन ज्येष्ठ वकील शरद ए.बोबडे (माजी सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय) यांच्याकडून त्यांनी वकिलीचे धडे घेऊन वकिली व्यवसायाला सुरुवात केली. नितीन सांबरे हे २००४-०७ पर्यंत नागपूर येथील हायकोर्ट बार असोसिएशनचे सचिव होते. १ सप्टेंबर २००७
रोजी त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली.त्यांनी आपल्या वकिलीच्या कारकीर्दीत  नागपूर सुधार प्रन्यासाचे वकील, वन विभाग आणि अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विशेष वकील होते.भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड,इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड इत्यादी सार्वजनिक उपक्रमांचे ते स्थायी वकील होते.विविध महानगरपालिका आणि नगर परिषदा यासारख्या वैधानिक संस्थांच्या पॅनल वरील वकील म्हणूनही त्यांनी काम केले.टाटा सन्स,गोदरेज इत्यादी कंपन्यांचे प्रतिनिधित्व देखील केले. ६ जानेवारी २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची पदोन्नती झाली. नोव्हेंबर २०२३ पासून ते नागपूर खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.


   सर्वोच्च न्यायालयाने एकूण २१ न्यायमूर्तीच्या बदलीसाठी शिफारस केली आहे. यात मुंबई उच्च न्यायालयातून केवळ न्या.नितीन सांबरे यांचे नाव आहे. राजस्थान उच्च न्यायालयात कार्यरत न्या.चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली होईल. न्या. नितीन सांबरे यांच्या कार्यकाळात नागपूरसह विदर्भातील अनेक रखडलेल्या कामांना गती प्राप्त झाली होती.नागपूरचे रहिवासी असलेल्या न्या.सांबरे यांनी शहराविषयी असलेल्या विशेष आस्थेने नागपूरच्या कामाकडे व्यक्तिगतरित्या लक्ष दिले आणि प्रशासनाकडून कामे करवून घेतली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या