मफलर वाल्या छगन भुजबळांनी अखेर कॅबिनेट मंत्रीपद मिळविलेच...



    शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणात व तिथून पुढे राजकारणात आलेल्या छगन भुजबळांना सत्तेत येताच मंत्रिपद मिळाले.नंतर मात्र शिवसेनेची सत्ता जाताच सत्तेविना त्यांचा "जीव कासावीस" व्हायला लागल्याने त्यांनी शिवसेनेचा त्याग करून सत्ताधारी पक्षात प्रवेश करून "लाल दिव्याची" गाडी मिळविलीच,ती आता आता काही दिवसपर्यंत कायम होती.
      मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आल्यावरही त्यांना त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी झालेला असतानाही मंत्रिपद मिळाले नव्हते त्यामुळे त्यांचा जीव कासावीस होत होता.बऱ्याचदा त्यांनी तसे प्रसार माध्यमांसमोर बोलूनही दाखविले होते."जहाँ नहीं चैना,वहा नही रहना" हे त्यांचेच वाक्य तुफान प्रसिद्धी मिळवून गेले होते.त्यावेळी ते अजित पवारांची साथ सोडणार असल्याच्याही चर्चांना चांगलाच "ऊत" आला होता.मात्र पवारांनी त्यांना काही "कानमंत्र" दिल्याने ते शांत झाले होते.

    सरपंच देशमुख प्रकरणांत वाल्मीक कराड याचे पाठीराखे म्हणून धनंजय मुंढे यांना आपल्या मंत्रिपदाचा मोठ्या नाराजीने राजीनामा द्यावा लागल्याने,छगन भुजबळ ह्यांच्या आशा चांगल्याच "पल्लवित" झाल्या होत्या.त्यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावर "विश्वास" ठेवून केवळ रिकाम्या झालेल्या मंत्रिपदावर "श्वास" रोखून ठेवला होता,हे सर्वश्रुतच आहे.

    अखेर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होऊन रिक्त असलेले मंत्रीपद आणखी किती दिवस रिक्त ठेवायचे म्हणून अजित पवार ह्यांना विचारणा झाली असता,हे मंत्रिपद केवळ "मंत्रीपद व लाल दिव्यासाठी" आसुसलेले छगन भुजबळ ह्यांना देण्यात यावे ह्यावर एकमत झाले.आणि आज अखेर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी त्यांचा "रुसवा" काढला,व छगन भुजबळ ह्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा शपथविधी राजभवनात पार पडला.

    उशिरा का होईना भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने ओबीसी समाज आणि समता परिषदेचे मोठ्या प्रमाणात नाराज असलेले कार्यकर्ते "जाम खुश" झाले आहेत. भुजबळ यांना धनंजय मुंढे यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मागील सरकारमध्ये देखील छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. 

   छगन भुजबळ यांनी आतापर्यंत नगरसेवक ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत बऱ्याच मंत्रिमंडळात  वेगवेगळ्या पक्षांमधून काम केले आहे.त्यांच्या आशा आकांक्षा खूप मोठ्या आहेत परंतु त्यांच्यावर यापूर्वी झालेल्या व होत असलेल्या आरोपांमुळे ते तूर्तास तरी शक्य वाटत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या