राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि निवडणूक चिन्ह घड्याळ कुणाचे ? याचा फैसला आज निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. अजित पवार गटाला अक्खा राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ मिळाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा जबर हादरा दिला गेल्याचे समजण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांत झालेल्या १० पेक्षा अधिक सुनावण्या झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह बहाल केले आहे. शिवसेनेत उभी फूट पडून निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले होते.अगदी त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यात आले आहे.काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी शरद पवार यांना आता पक्षाचे नवीन नाव आणि नवीन चिन्हाचा पर्याय स्वीकारून निवडणूक आयोगाला सुचवावे लागणार आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा केला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे जाऊन आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूका तोंडावर असताना राष्ट्रवादी पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी जबर धक्का दिला गेल्याचे समजल्या जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे.
भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मतभेद झाले होते त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध झुगारून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीत दोन परस्पर विरोधी गट पडले होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ४१ आमदार अजित पवारांसोबत तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. आयोगासमोर तब्बल १० वेळा झालेल्या सुनावणीनंतर आज निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचे सांगत पक्षाचे चिन्हही व उभा पक्षच त्यांना देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी पक्षात उभी आडवी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता.मागील सहा महिने यावर निवडणूकO आयोगात सुनावणी सुरूच होती.या सुनावण्यांसाठी स्वत: शरद पवार हे निवडणूक आयोगात हजर राहायचे तर अजित पवार यांच्या गटाच्या वतीने सुनील तटकरे आणि इतरही महत्त्वाचे नेते सुनावण्यांसाठी हजर असायचे. अखेर सहा महिन्यांच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
शरद पवार गटाला ३ पर्यायी चिन्हे पाठवण्यासाठी ७ फेब्रुवारी २०२४ ला दुपारी ३ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानण्यात येतो. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या नव्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिली आहे.
बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचे अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सांगण्यात आले होते. महाराष्ट्रातील ४१ आमदार आणि नागालँडमधील ७ आमदारांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा आहे. तसेच लोकसभेतील २ खासदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे तर एका खासदाराने दोन्ही गटाला शपथपत्र दिलेले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील ५ आमदारांनी दोन्ही गटाकडून शपथपत्रे दिलेली आहेत. हेच सगळे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा शेवटचा पर्याय शिल्लक राहिलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पक्षचिन्ह आणि निशाणी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून आनंद साजरा करण्यात येत आहे.





0 टिप्पण्या