अकोला जिल्ह्याच्या खारपान पट्ट्यातील पूर्णा नदीच्या सुपीक खोऱ्यात दहिहांडा हे ग्रामीण भागातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेले पोलीस स्टेशन असून देखील या भागाकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष असते.त्यामुळे जवळपास सर्वच अवैध धंदे या भागात दिवसाढवळ्या अगदी बिनबोभाटपणे सुरू असल्याचे पहावयास मिळतात आणि याच धंद्यांच्या वर्चस्वाच्या लढाईतून दहिहांडा पोलीस स्टेशनला आजपर्यंत एकही ठाणेदार आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही हा इतिहास आणि वास्तविकता आहे.
पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या गावांमधून रात्रंदिवस अवैधरित्या रेती उपसा करून त्याची तस्करी सुरू असते आणि या उद्योगात या भागातील अनेक नामवंत रथी, महारथी गुंतलेले असल्याने पोलीस सहसा त्यांच्यावर हात टाकत नाहीत.पूर्णेच्या या रेतीला आजरोजी सोन्याचा भाव असल्याने कितीही "भाव खाणारा भाऊ" असला तरी त्याला हे रेती तस्कर आपल्या "तालावर डोलायला" लावतात आणि सगळे कसे बिनधास्त व बिनबोभाटपणे चालते.
याच जोडीला चोहोट्टा बाजार परिसरात शेकडो विटांचे भट्टे बाराही महिने सुरू असतात आणि त्यावर शेकड्याने मजूर,कामगारवर्ग कामाला असल्याने आठवड्याला करोडो रुपयांची उलाढाल होऊन हा पैसा याच परिसरात फिरत राहतो.या दोन्ही व्यवसायातून स्थानिक आणि बाहेरच्या मजुरांच्या हातात सतत पैसे खुळखुळत असल्याने त्यातून "शौकपाणी" करण्यासाठी पैशांची कमी नसल्याने दारूच्या धंद्याला सुगीचे दिवस या भागात आलेले पाहायला मिळतात.खारपान पट्ट्यातील या भागातील अनेक गावांत एकदा प्यायला पाणी मिळणार नाही मात्र देशी दारू मात्र वाट्टेल तेव्हढी मिळते.दहीहांडा पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात काही मोजक्याच चार गावात शासनमान्य अर्थात लायसन्स होल्डर देशी दारूची दुकाने आहेत मात्र आजही चोहोट्यातील मामेभाऊ,आतेभाऊ यांच्या नेटवर्किंगमुळे प्रत्येक खेड्यात रात्रंदिवस लागेल तेव्हढी दारू मिळते.भल्या पहाटे चौकी आणि चौकात कुणी येण्याआधीच "नांगरलेली वावरे" म्हणा वा काट्याकुट्यांची पर्वा न करता देशी "दारूचे पेठेच्या पेठे" घेऊन सुसाट वेगाने दुचाकी घेऊन धावणारे "रनर" प्रचंड मेहनत घेऊन लोकांना बसल्या जागी दारूची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. आणि ह्या अवैध दारूविक्रीला स्थानिक पोलिसांचेही "डोळेझाक" करून थोड्याफार प्रमाणांत सहकार्य आहेच हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
या भागात दारूच्या महापुरा सोबतच "वरलीचेही वारे" जोरात वाहत असल्याचे चित्र आहे.कोणतेही श्रम न करता झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवीत मेहनत करून थोडे जास्त पैसे कमावणाऱ्या मजुरवर्गाच्या खिशातून अलगद ते पैसे काढून घेण्यासाठी गावोगावी "वरली मटक्याची दुकानदारी" दहीहांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्वत्र पहावयास मिळते.
दहीहांडा, कुटासा, वरूर जऊळका,चोहोट्टा बाजार,टाकळी सह आणखीही काही मोठ्या गावांमध्ये जागोजागी वरली मटक्याची दुकाने अगदी राजरोसपणे सुरू असून त्यांच्यावर कुणाचाच अंकुश नसल्याचे चित्र आहे.चोहोट्टा हे या परिसरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती व रोजच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या वस्तू मिळण्यासाठीचे एकमेव ठिकाण आणि अकोट व अकोला या शहराला जोडणारे रस्त्यावरील गाव असल्याने दिवसभर गजबजलेले असते.
याच चोहोट्टा गावात चक्क पोलीस चौकीच्या मागेच हे वरली मटक्याचे धंदे खुल्लेआम जणू काही पोलीस संरक्षणात सुरू असल्याने याठिकाणी लोकं घोळक्याने उभी असलेली नेहमीच दिसून येतात,केवळ याचठिकानी नाही तर गावात अनेक गल्ली बोळात सर्रासपणे वरली मटक्याची दुकानदारी पोलिसांच्या आशीर्वादाने बिनबोभाटपणे सुरू आहे.यातून सर्वसामान्य व मजूर वर्गाला लुबाडण्यात येत असून त्यांच्या हक्काच्या व मेहनतीच्या कमाईवर प्रत्यक्षात "डाका टाकून" लुटल्या जात आहे.
दहीहंडा पोलिसांच्या हफ्तेखोरीने या परिसरात दारू व वरली मटक्याचे अवैध धंदे फोफावले असून सर्वसामान्य व गोरगरीबांची कुटुंबव्यवस्था उघड्यावर येत आहे.नाही म्हणायला पोलीस रेकॉर्डवर दाखविण्यासाठी वरली मटक्यावर कारवाई दाखवतात,परन्तु तेही फक्त दाखविण्यापूरतेच असते.
दहीहंडा पोलीस स्टेशन मधील कुणीतरी सनी हा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर "सुपरव्हीजनचे" काम करतो लोकं त्याला सरळ भाषेत "वसुली"चे काम म्हणतात तो भाग वेगळा. कुणाला कुठे धंदा लावायची परवानगी द्यायची,कुणी किती माणसे ठेवायची हेसुद्धा हा "सुपरव्हायझर"च ठरवतो,त्यामुळे या संनीसोबत कुणीच "वाकड्या"त जात नाही,तर सर्वच त्याला सदैव खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात अशी अकख्या बाजारात चर्चा आहे.हा सनी,योगेशभाऊ वाघमारे यांचा खासमखास "आतल्या गाठी"चा माणूस असल्याने सर्वच धंदेवाले त्याची योग्य बडदास्त ठेवतात,त्यामुळे आणि चोहोट्टा चौकीतील "गुरू गजानना"च्या सहकार्याने सगळे कसे अगदी व्यवस्थित सुरू असल्याचे चित्र आहे.
हे सर्व चित्र सामान्य जनतेला दिसते मात्र पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना का दिसत नाही हा फार मोठा प्रश्नच आहे.अकोट सब डिव्हिजनमध्ये महिनाभराआधीच आयपीएस असलेले अनमोल मित्तल हे परिविक्षाधीन डीवायएसपी म्हणून आलेले आहेत.त्यांचा हा अवधी सहा महिन्यांचा आहे,त्या अवधीत त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना "ना सिर" ना "हातपाय" हलवता फक्त तोंडाने जरी सांगितले तरी हे धंदे क्षणात बंद होऊ शकतात,त्यासाठी "आजूबाजू"चे कोणतेच "खर्च" करावे लागत नाहीत.शिवाय साहेबांचा प्रशिक्षण कालावधी यशस्वी होईल तो वेगळाच.आरसीपीच्या "पाच पोरांना" सोबत घेऊन केवळ तीन ते चार तासांत संपूर्ण दहीहंडा परिसर धुतल्या जाऊ शकतो,मात्र त्यासाठी अशी मानसिकता असण्याची गरज आहे.








0 टिप्पण्या