भोंदू गुरुदास बाबा वन्यप्राणी कातडे तस्करी प्रकरणी होता जेलात...



  अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी पासून फक्त ४ किलोमीटर अंतरावरील कारला या गावात अंधश्रद्धेचे दुकान चालवून भोळ्या भाबळ्या नागरिकांना आपल्या मायाजालात ओढून त्यांची लुबाडणूक करणारा आणि आता कालपरवा एका विवाहित  महिलेला सर्वस्व लुबाडून फरार असलेला भोंदू व स्त्रीलंपट गुरुदास बाबा याच मार्डीच्या जंगलात हरिणाचे कातड्याची तस्करी केल्याप्रकरणी सण २००१ ते २००२ च्या दरम्यान सहा महिन्यांसाठी कारागृहात शिक्षा देखील भोगून आल्याची माहिती असून या नकली बाबाचे एक एक कारनामे उघडकीस येत आहेत.

     कामधंदे करून पोट भरणे जीवावर येत असल्याने आणि मुळातच अपराधी प्रवृत्तीचा असलेल्या सुनील कवलकार उर्फ गुरुदास बाबाने सण २००० ते २००२ च्या दरम्यान मार्डी गावातच लोकांना लुबाडण्याची आपली दुकानदारी सुरू केली होती.गावातील बहुतांशी लोकांना आपल्याला सिद्धी प्राप्त झाल्याचे सांगून सुरुवातीला आपले प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न केलेत.ज्या ज्या लोकांनी या बाबाला यासाठी विरोध केला त्यांना या नकली बाबाने सर्वच प्रकारे त्रास देऊन पाहिला.याच सुमारास गावतीलच एका हिंदीभाषिक महिलेने गुरुदास बाबाच्या अंधश्रद्धा जोपासनेला कोणताही प्रतिसाद न दिल्याने या महिलेच्या घरावर लिंबू मिरची फेकण्यात येत होते.या नकली बाबाने त्या महिलेला अतोनात त्रास दिला होता.

      शेवटी वैतागून या महिलेने तेव्हा कुऱ्हा पोलीस स्टेशनला या बाबाच्या विरुद्ध तक्रार दिली होती.त्यावेळी नुकतेच अमरावती जिल्हा ग्रामीनचे पोलीस अधीक्षक राहिलेले अविनाश बारगळ हे डीवायएसपी म्हणून कार्यरत होते, त्यांनीच त्याकाळी या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या होत्या.याही प्रकरणांत शिक्षा भोगून बाहेर आल्यावर सुनील कवलकार उर्फ गुरुदास बाबाने आपला मार्डी गावातील आश्रम गावापासून पुढे ४ किमी.अंतरावर जंगल भागातील कारला या गावाजवळ उभा करून आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.

    कारला येथील गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला हा गुरुदास बाबाच्या ऐय्याशीचा आश्रम नामक अड्डा हा महाराष्ट्र शासनाच्या ई क्लास जमिनीवर उभा करण्यात आलेला असून त्याला ह्या आश्रमासाठी ही जागा आठ ते नऊ वर्षेपूर्वी अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिली असल्याची सुत्रांची माहिती आहे, आणि म्हणूनच या नकली बाबावर वारंवार गुन्हेगारी कृत्ये केल्याबद्दल गुन्हे दाखल होऊन शिक्षा झालेली असतानाही हा आश्रम कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महसूल विभाग कोणतीही पावले उचलण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या