अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा लगत असलेल्या मार्डी या गावातील आपल्या आश्रमात गेल्या पाच सहा महिन्यांपूर्वी "गरम तव्या"वर बसूनही xxगणाला चटके लागत नाहीत असे सांगून नव्हे तर प्रत्यक्ष दाखवून जनतेला मूर्ख बनविणाऱ्या मार्डी येथील गुरुदासबाबाच्या "गुरुलीला" पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या असून स्थानिक कुऱ्हा पोलिसात या भोंदूबाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजातील भोळ्याभाबड्या जनतेला अंधश्रद्धेच्या आहारी नेऊन त्यांच्या भावना व ईश्वर भक्तीचा फायदा उठवून त्याच भक्तांना "आयुष्यातून उठविण्याचे" जीवघेणे उद्योग हा नकली बाबा आपल्या "चेल्या चपाट्या"च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून करीत असल्याची माहिती आहे.यासाठी त्याने आपले स्वतंत्र नेटवर्कच उभे केले असून त्या माध्यमातून नवनवीन "बकरे भक्तां"च्या रुपात शोधून गोडीगुलाबीने बोलून आणि त्यांच्या समस्यांवर रामबाण इलाज असल्याचे सांगून त्यांना पद्धतशीरपणे फसविले जात आहे.
तिवसा तालुक्यातील मार्डी गावातील "गुरुदासबाबा" म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला भोंदूबाबा सुनील जानराव कावलकर याचा आश्रम असून त्याठिकाणी असेच सर्व उद्योग चालत असल्याचे सिद्ध झाले आहे.
मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेचे सतत काही महिने शारीरिक शोषण याच सुनील कावलकर उर्फ गुरुदासबाबाने केल्याची खळबळजनक घटना अगदी कालच समोर आली आहे. तिवसा तालुक्यात असलेल्या मार्डी येथील गुरुदासबाबाच्या आश्रमात मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी एक महिला आपल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून कौटुंबिक कलह,क्लेश थांबावा व आयुष्यात काहीतरी चांगले व्हावे या अपेक्षेने आली होती. हा बाबा दर पौर्णिमेला पूजापाठ करून "अंगारा धुपारा" देतो व आपली समस्या सोडवतो हेच तीला "दलालां" च्या माध्यमातून व्यवस्थितरीत्या पटवून सांगण्यात आले होते.
जबलपूर येथील ही महिला आपल्या अमरावतीच्या एका मैत्रिणीच्या मदतीने मार्डीच्या गुरुदासबाबाच्या आश्रमात आली होती. तीने आपले दुःख व समस्या सांगितल्यावर या भोंदूबाबाने तीला अंगारा व प्रसाद देऊन मी जबलपूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले आणि लगेच मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला असता तीला अगदी एकांतात बोलावून तिची भेट घेतली. तेव्हापासून त्या महिलेचे मार्डी येथे नियमितपणे येणे-जाणे सुरू झाले. गुरुदासबाबाने तीला सहा-सात महिने आश्रमातच रहावे लागेल असे सांगितले होते आणि यासाठी ती तयारही झाली होती. मात्र संधीसाधू गुरुदासबाबाने तीच्या "अगतिकतेचा" फायदा घेऊन तुझा पती सुधारला तर ठीक नाहीतर मीच तुझ्याही लग्न करेन असे सांगून खाण्यात अंगारामधून गुंगी येणारे औषध देऊन जवळपास तीन महिन्यापर्यंत तीच्यावर शारीरिक अत्याचार केला. दरम्यान सदरहू महिलेच्या लक्षात हा प्रकार आला असता तिने बाबाला याचा जाब विचारला असता बाबाने तिला त्याच्या फोनमधील तिच्यासोबतची अश्लील चित्रफीत दाखवून सामाजिक बदनामी करण्याची धमकी देऊन तोंड बंद ठेवण्यास सांगून मी तुझे काहीही करू शकतो असे सांगितले.त्यावर त्या महिलेने आता यापुढे आश्रमात राहणार नसल्याचे सांगीतल्याने गुरुदासबाबाने २ जानेवारी रोजी तिला नागपूरपर्यंत नेऊन सोडले. मे २०२३ पासून २ जानेवारी २०२४ जवळपास आठ महिने पर्यंत ती महिला या आश्रमात होती. दरम्यान तिचे कुटुंबात काहीच चांगले झाले नाही. उलट तिचेच आर्थिक व मानसिक फसवणुकी सोबतच शारीरिक शोषण सुद्धा झाल्याचे लक्षात येताच तिने गुरुदासबाबा विरुद्ध २५ जानेवारीला संबंधित कुऱ्हा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिल्यावरून कुऱ्हा पोलिस स्टेशनच्या ठाणेदार गीता तांगडे यांनी भोंदूबाबा गुरुदासबाबा उर्फ सुनील जानराव कावलकर (४७) यावर शारीरिक अत्याचार,धमकावणे व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्याची भनक लागताच आरोपी स्त्री लंपट गुरुदासबाबा हा फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या नकली गुरुदासबाबाच्या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पोलिस स्टेशनच्या ठाणेदार गीता तांगडे करीत आहेत.



0 टिप्पण्या