अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बर्डीजवळ अप्पर वर्धा धरणाच्या बॅक वॉटर पात्रात जुनी सुरवाडी,भुताबर्डी या ठिकाणी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन गेल्या सात महिन्यांपासून सुरु आहे.याच ठिकाणी काल शुक्रवारी रात्री उपोषण मंडपात एका उपोषण कर्त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आल्याने संपूर्ण अमरावती जिल्हा हादरून गेला आहे.
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात राहणारे गोपाल दहीवडे हे उपोषण मंडपात गळफास घेवून आत्महत्या करण्याऱ्या आंदोलकांचे नाव असून हे आंदोलन गेल्या सात महिन्यांपासून सुरू होते.आंदोलक अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या मागण्या करिता सातत्याने आपले आंदोलन सुरुच ठेवून शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करीत होते.
शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यापैकी अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी व हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना २५ ते ३० लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासह देण्यात यावी, ज्यांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही अशा संपूर्ण शेतकऱ्यांना आजच्या बाजार भावानुसार अनुदान मिळावे या सर्व मागण्याची शासनाकडून पूर्तता ना झाल्यामुळे शासनाच्या व प्रशासनाच्या आडमुठेपणा मुळे
२५१ दिवसापासून हे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मोर्शी तहसील कार्यालयासमोर सुरूच होते.
त्यांच्या मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे अखेर गोपाल दहीवडे यांनी आत्महत्या केली असून आपल्या आत्महत्येला शासन व प्रशासन जवाबदार असल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे, सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती असून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच सुरुच ठेवावा असेही गोपाल दहिवडे यांनी अखेरची इच्छा म्हणून लिहुन ठेवले आहे.
घटनास्थळावर अमरावती पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.
कोणतेही आंदोलन हे पोलीस विभागाची परवानगी घेवून मगच सुरू करण्यात येते.आणि हे उपोषण वा आंदोलन सुरू असेपर्यंत त्यांच्या सुरक्षेसाठी आंदोलनस्थळी दोन पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आलेला असतो.तर मग सदरहू आंदोलक आत्महत्या करीत असताना हे पोलीस कुठे गेले होते ? त्यांनी या आंदोलकाला आत्महत्येपासून परावृत्त का केले नाही,हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.कर्तव्यावर असतांना घरी जाऊन झोपा काढणाऱ्या या पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आंदोलक करीत आहेत.
महसूल विभागातील तहसीलदार मोर्शी यांनी ह्या आंदोलकांच्या मागण्या व्यवस्थितरीत्या शासनाकडे वा संबंधित पाटबंधारे विभागाकडे पाठवून आंदोलकांना न्याय देण्याचा जराही प्रयत्न केला नाही आणि म्हणूनच हे आंदोलन थोडेथोडके नव्हे तर सात महिन्यांपासून सुरूच आहे.तर यातून निष्पन्न काय तर एका आंदोलकाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे.आणि याला आजरोजी तरी प्रथम दर्शनी पोलीस, महसूल व पाटबंधारे विभागाचे स्थानिक अधिकारीच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे,त्यामुळे त्यांच्यावर विनाविलंब आंदोलकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पुढे येत आहे.


0 टिप्पण्या