अकोल्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अकोल्यात आले तेव्हापासून एक एक नवीनच प्रकरणे पुढे येत आहेत,तर काही त्यांच्या येण्याच्या आधीपासूनची अतिशय गुंतागुंतीची प्रकरणे उलगडता उलगडता त्यांनाही या जिल्ह्याचा अभ्यास करायला वेळच मिळाला नाही.या आधीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कार्यकाळात त्यांच्या शिस्तप्रियतेच्या "अतिशय टोकाच्या" भूमिकेमुळे जिल्हा पोलीस दलातील जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा "श्वास गुदमरत" होता,त्यांना आपल्या मनातील "भावना" कुणाजवळ व्यक्त करताच येत नव्हत्या अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि नेमक्या ह्याच परिस्थितीने त्यांना परिस्थितीचे गांभीर्य पाहुन योग्य निर्णय घेऊन ठोस कारवाई करायची हिम्मत होत नव्हती ही "वास्तविकता" आहे.
गेल्या वर्षभरात अकोला जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्तच खुनाची प्रकरणे घडून आलीत मात्र त्यातील थोड्याच प्रकरणांचा उलगडा झालाय तर इतर काही तपासावरच आहेत.होत असलेल्या तपासावर कुणाचेच समाधान होत नाही अशी परिस्थिती आहे.
नवीन एस.पी. जिल्ह्यात येण्यापूर्वी महान येथील लहान "मुलाचे मिसिंग" प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात गाजत असतांनाच उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पेट्रोलिंगच्या वाहनावर छर्र्याच्या भरमार बंदुकीतून "फायर" करण्यात आला होता.जुने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जाता जाता ही दोन महत्वाची नव्हे तर पोलिसांच्या "इभ्रतीची धिंडवडे" काढणारी दोन प्रकरणे नवीन पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांना "वेलकम गिफ्ट" म्हणून दिली होती.
बच्चनसिंग यांनीही ही प्रकरणे चैलेंज म्हणून स्वीकारून त्याचा व्यवस्थित "छडा लावण्याचा विडा" उचलला आणि या प्रकरणाची जबाबदारी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली.ह्या जबाबदारी सोबतच अर्थातच अकोला जिल्हा पोलीस दलाची "इज्जत वाचविण्याची" जबाबदारी सुद्धा.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे देखील गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वीच अकोला जिल्ह्यात बदलून आलेले आहेत,परंतु या जिल्ह्यात त्यांनी काही वर्षे आधी काम केलेले असल्याने आणि त्यांना एलसीबी पीआय म्हणून काम करण्यासाठी "फ्री हॅन्ड" मिळाला असल्याने त्यांनी अगदी अल्पावधीतच अकोला जिल्ह्यात "जम बसवून" गुन्हेगार व "गुन्हेगारी काबूत" आणण्यात यश मिळविले.ही त्यांची जमेची बाजू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा असला तरी सुद्धा त्यांना जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस स्टेशनच्या तपासात हस्तक्षेप करता येत नाही.एसपी यांनी तसे काही आदेश एलसीबीला दिले तरच ते या तपासात आपली यंत्रणा उभी करून "पॅरलल" म्हणा वा सोबत तपास करून त्याचा उलगडा करतात,नव्हे तशी पद्धतच आहे.
अकोल्यात आल्यावर दोन मोठी प्रकरणे "चॅलेंज" म्हणून स्वीकारल्यावर त्यांनी ती विचारपूर्वक अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली,आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनीही ती जबाबदारी म्हणून स्वीकारत आपकी पूर्ण यंत्रणा त्याकामी लावली आणि आश्चर्य म्हणजे केवळ २४ तासांत महान,पिंजर येथील "मिस्सिंग" प्रकरणाचा छडा लावला,मात्र यात पोलीस आणि त्या बालकाच्या परिवाराचे दुर्दैव म्हणजे त्या बालकाचा मृतदेहच एलसीबीच्या हाती लागला.या बालकाच्या शोध व माहितीसाठी त्या परिवाराने दीड लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.मात्र १५ दिवस उलटून गेल्यावरही बालकाची कोणतीही माहिती मिळाली नाही तर एलसीबीच्या तपासात त्याचे प्रेतच हाती आले,विशेष म्हणजे या लहान बालकाचा जीव त्याच्याच चुलत भावाने घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
हा तपास यशस्वीरीत्या केल्यावर एसपी बच्चनसिंग यांनी उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग व्हॅन वर झालेल्या "फायर" प्रकरणाची
माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्याची "नामुष्की" पोलीस खात्यावर आली होती.तरीसुद्धा तपास इंचभरही पुढे सरकत नव्हता अखेरीस याही प्रकरणाची जबाबदारी सुद्धा एलसीबीच्या खांद्यावर देऊन परीक्षा घेण्याचे ठरविले.तपासाची सर्व सूत्रे हाती येताच पीआय एलसीबी यांनी सर्व कौंशल्य पणाला लावून तपास सुरू केला मात्र त्यात त्यांना यश येण्यासारखी परिस्थिती दृष्टीक्षेपात येतच नव्हती.तरीसुद्धा संपूर्ण टीमने रात्रीचा दिवस करीत प्रकरणाचा अंतिम टप्पा गाठलाच आणि संक्रांतीच्या आधीच या फायर प्रकरणातील पाचही आरोपींना अकोला एलसीबीने बेड्या ठोकून एसपी बचनसिंग यांच्या समोर उभे केलेच.
गेल्या कित्येक वर्षांत अकोला पोलीस दलाला कोणत्याही तपास कामासाठी जनतेला आवाहन करून गुन्ह्याची वा गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी मोठ्या रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले नव्हते,मात्र या दोन्ही प्रकरणांत ते ठेवावे लागले.पोलीस दल वा जिल्हा पोलीस प्रमुख इतके हताश कधीही झालेले पाहण्यात आलेले नव्हते.मात्र अशाही कठीण होवून बसलेल्या क्लिष्ट प्रकरणांचा तपास एलसीबीच्या पथकाने केला आणि अकोला पोलिसांचे "मनोधैर्य" कायम ठेवत जिल्हा पोलीसदलाची "मान उंचावली".
मात्र आता "बारी आहे" ती जिल्हा पोलिस दलाच्या प्रमुखांची,त्यांनीही आपले "मन मोठे" करून या शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी प्रसंगी जीवाची पर्वा न करता आपल्या परिवाराला वाऱ्यावर सोडून अत्यंत क्लिष्ट व जटिल प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड करण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली,त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करून "बक्षिसाची" रक्कम त्यांना जाहीररीत्या देण्याची.
जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी आता लवकरच म्हणजे चारच दिवसांवर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम असलेल्या शहरातील शास्त्री स्टेडियमवर होणाऱ्या शासकीय सार्वजनिक प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांत स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी व अधिकारी यांचा त्यांनी चोख कामगिरी बजावली त्याबद्दल प्रशस्तीपत्र व बक्षीसाची रक्कम देऊन त्यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात यावा.
पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करून या बाबीला मूर्तरूप दिले तर ही जिल्ह्यातील समस्त जनता व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट ठरेल यात तिळमात्रही शंका नाही.आणि शिस्तप्रिय व कठोर असलेल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा असा जाहीर सत्कार झाल्यास त्यांचे "मनोबल" उंचावून त्यांचे आपले कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारी याकडे लक्ष केंद्रित होईल हेही तितकेच खरे.
या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमांत जिल्हाधिकारी आपल्या अधिकारात समाजातील अन्य सर्वच घटकांना स्थान देऊन त्यांचा मान वाढवितात, हे स्तुत्यच आहे, मात्र एकदा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची देशाच्या ध्वजाला केवळ "मानवंदनाच" न घेता त्यांनाही थोडा "मान" देऊन जाहीर सत्कार करून त्यांचेही "जाहीर आभार" मानल्यास या जिल्ह्यातील गुन्हेगारी नष्ट जरी नाही झाली तरी त्या गुन्हेगारीला जास्तीत जास्त प्रमाणांत आळा घालण्याचे काम हेच पोलीस दल करेल ही "काळ्या दगडावरची पांढरी रेघ" आहे.त्यांना ही "मन आणि भावना" आहेत, वाट आहे ती फक्त एकदा तुम्ही त्यांनाही "मान देण्याची" व त्यांनाही आपल्यातील एक "महत्त्वपूर्ण घटक" समजण्याची.









0 टिप्पण्या