फरार मंडळ अधिकारी एसीबीच्या रडारवर,२४ तासांत गजाआड होण्याची शक्यता...



    अकोला तहसील कार्यालया अंतर्गत महसूल  मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असणारा महादेव उत्तमराव भगत हा दोन दिवसांपूर्वी अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यातून लाचेची रक्कम घेऊन गर्दीचा फायदा घेत निसटून पसार झाला होता. अधिकाऱ्यांनी त्याची सर्वत्र शोधा शोध केली मात्र तो अद्यापही कुठे आढळून आलेला नाही त्यामुळे एसीबीने निराश न होता जोमाने त्याचा माग काढण्यासाठी प्रयत्न केले असून तो त्यांच्या रडारवर आला आहे.

    २०,००० रुपयांची लाचेची रक्कम घेऊन पसार झालेला मंडळ अधिकारी दोन दिवसांपासून आई व पत्नीसह पुण्यात आढळून आला आहे,त्याठिकाणी मोशी परिसरात त्याने एक फ्लॅट घेतला असून काल त्या फ्लॅटचा निबंधक कार्यालयात खरेदी दस्त सुद्धा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर तो पत्नी व आईसह आळंदीला देखील जाऊन संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीपुढे डोके टेकवून आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.मात्र इतके सारे झाले तरी एसीबीच्या रेकॉर्डवर फरार असलेला आरोपी अद्याप तरी एसीबीच्या अधिकाऱ्यांना हुलकावणी देत मोकाट फिरत आहे.

    काल दुपारपासून पुण्यातून निघाल्यानंतर त्याने पत्नी व स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ केला असून त्याचा पुण्यातील मुलगा अधिकाऱ्यांना काहीच प्रतिसाद देत नसल्याची माहिती आहे.तर दुसरा नागपूर मध्ये शिकत असलेल्या मुलाचे लोकेशन व मोबाईल नंबर मिळू शकला नाही.तर वाशीम जिल्ह्यातील त्याच्या सासरकडेही तो गेला नसल्याची वा त्याच्या सध्याच्या लोकेशनची माहिती मिळू शकली नाही.

    एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कालच अकोला न्यायालयातून लाचेची रक्कम हस्तगत करण्यासाठी त्याच्या घराच्या झडतीचे आदेश प्राप्त केले आहेत,त्यावेळी रक्ताच्या नात्यातील कुणीतरी हजर असावे म्हणून बाळापूर तालुक्यातील त्याच्या सायखेड या गावातील चुलत भावाला बोलावण्यात आले असंल्याचे समजते.आज संध्याकाळ पर्यंत ही घरझडतीची कारवाई पूर्ण होण्याची शक्यता आहे.


  "माझे नाव महादेव भगत, मला पैसे पाहिजेत नगद",असे गब्बरसिंग स्टाईलमध्ये बोलणारा एसीबीचा फरार आरोपी महादेव भगत आज एसीबीच्या रडारवर "रेंजमध्ये" आलेला असून लवकरच म्हणजे २४ तासांत त्याची शिकार होण्याची शक्यता आहे.येत्या काही तासांतच त्याचे "प्रॉपर लोकेशन" प्राप्त होवून एसीबीच्या अधिकाऱ्यांचे हात त्याच्या मानगुटी पर्यंत पोहोचणार असण्याची परिस्थिती निर्माण झाली असून लवकरच त्याला एसीबीचा पाहुणचार मिळणार असल्याची खात्री अधिकारी व्यक्त करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या