लाचखोरीत महिलाच वरचढ,कोण म्हणतेय महिला भ्रष्टाचारात मागे आहेत...
नोव्हेंबर ०९, २०२३
राज्यात आजघडीला नाशिक विभाग हा लाचखोरीच्या बाबतीत क्रमांक एक वर असून नाशिक विभाग वा जिल्ह्याचे हे गेल्या कित्येक वर्षांतील रेकॉर्ड अजून तरी कोणत्याच जिल्ह्याने तोडले नाही वा भविष्यात तशी शक्यताही नाही.
नाशिक जिल्ह्याच्या खालोखाल धुळे जिल्ह्यातील एसीबीच्या युनिटने सर्वांत जास्त कारवाया केल्या आहेत. आपल्या कार्यक्षेत्रा बाहेर जाऊनही कारवाया करण्याचे धुळे एसीबीने केलेले रेकॉर्डही कोणताच जिल्हा येत्या काही वर्षांत सुद्धा तोडण्याची शक्यता नाही.स्वतःच्या जिल्ह्यात कमी परन्तु इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातच जास्त कारवाया धुळे एसीबीने केल्या आहेत,याचाच अर्थ धुळे जिल्ह्यात भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी झाली असून धुळे युनिटवर असलेल्या विश्वासाने नागरिक त्याठिकाणी जाऊन आपल्या तक्रारी नोंदवितात असाच याचा अर्थ निघतो.
राज्यातील वाढत्या भ्रष्टाचारात महिलांचा वाढता सहभाग हा आजरोजी चिंतेचा विषय झालेला असून यावर एक उच्च स्तरीय समिती गठीत करून तातडीने काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
सर्वच विभागातील महिला ह्या एसीबीच्या कारवायांमध्ये फार मोठ्या संख्येने सापडत आहेत. याचाच अर्थ भ्रष्टाचार ही एक सामान्य गोष्ट झालेली असून आता लाच घेणे हा गुन्हा नाहीतर शिष्टाचाराचा एक भाग ठरतोय. पुरोगामी महाराष्ट्रासाठीही आणि या राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातील "डिसीझन मेकर" असलेल्या लोकांसाठी सुद्धा ही चिंतेची बाब आहे.
नाशिक विभागातील खान्देशातील "अत्यंत प्रामाणिक व कर्मफळावर विश्वास ठेवणाऱ्या" जळगाव जिल्ह्यात गेल्या काही काळापासून लाच खोरीचे प्रमाण वाढले असून काल परत एकदा जळगावात येऊन धुळे एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे.
जिल्हा कारागृहात एमसीआर मध्ये कैदी असलेल्या मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईकडून २ हजार रुपयांची लाच स्विकारतांना कारागृहातील हवालदार भिमा उखडू भिल, महिला पोलिस शिपाई पूजा सोपान सोनवणे व हेमलता गयबू पाटील या त्रिकुटाला धुळे येथील एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले आहे. या दीपावलीच्या तोंडावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार महिला ही पहूर येथील रहिवासी असून तिचा तरुण मुलगा हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या तक्रारदार महिलेकडून मुलाला भेटण्यासाठी या महिला पोलीस शिपायांकडून नेहमीच पैशांची मागणी केली जात होती. त्याशिवाय भेटूच दिले जात नव्हते. मंगळवारी सदरहू तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृह बाहेर आली असता त्यावेळी याठिकाणी कर्तव्यावर असलेले हवालदार भिमा भिल, महिला पोलिस शिपाई पूजा सोनवणे,हेमलता पाटील हे हजर होते. त्यावेळी मुलाला भेटण्यासाठी महिलेकडून दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदार महिलेची परिस्थिती हे लाच मागणीचे पैसे देण्यायोग्य नसल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने तक्रारीची पडताळणी करून त्यात सत्यता आढळून आल्याने बुधवारी दुपारच्या सुमारास सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले.
त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला कारागृह पोलिस पूजा सोनवणे,हेमलता पाटील यांनी हवालदार भीमा उखडूं भील याच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेकडून २ हजार रुपयांची लाच मागितली तर हेमलता पाटील यांना लाच स्विकारतांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी,राजन कदम,मुकेश अहिरे,रामदास बारेला,संतोष पावरा,मकरंद पाटील,प्रशांत बागुल,प्रवीण मोरे,प्रवीण पाटील,सुधीर मोरे यांनी यशस्वी केली.
0 टिप्पण्या