गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच अशोक खरात प्रकरणांत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा "राजीनामा" घेतल्यामुळे रिक्त असलेल्या पदावर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असलेल्या "मीरा बोरवणकर" ह्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोट्यवधी जनतेच्या मनातील मागणी लावून धरली होती.
आज त्यांच्या ह्या मागणीचा आणि राज्यातील कोट्यवधी जनतेच्या मनात मानाचे स्थान असलेल्या मीरा बोरवणकर ह्यांची महिला अध्यक्षपदी निवड करून राज्यातील असंख्य महिलांच्या "वाळवंट झालेल्या आयुष्यात हिरवळ" आणण्याचा निर्णय ह्या राज्यातील सत्ताधारी पक्षाने घेतल्यामुळे त्यांच्या ह्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर नियुक्तीने राज्यातील कोट्यवधी महिलांच्या मनात एक "आशेचा किरण" आणि "प्रचंड विश्वास" निर्माण झाला असून ह्या राज्यातील महिला ह्या खरेच शासनकर्त्यांच्या "लाडक्या बहिणी" आहेत हे आज सिद्ध झाले आहे.
आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे पुरुषप्रधान पोलिस दलात "लेडी सुपरकॉप" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे.
नाशिकच्या अशोक खरात नामक "वादग्रस्त भोंदू बाबा" प्रकरणामुळे नुकतेच रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता नव्हे तो जबरदस्तीने घेण्यात आला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार यावर चर्चा सुरू असतानाच आज अखेर निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या निवडीने त्या सर्व चर्चांना "पूर्णविराम" मिळाला आहे.
प्रशासकीय आणि पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता राज्यातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार आहे,ह्यात तिळमात्रही शंका नाही.
मीरा बोरवणकर या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. १९८१ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या बोरवणकर यांनी महाराष्ट्र कॅडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळविला होता. त्यांच्या पोलीस दलातील कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता.
पोलीस दलातील अत्यंत जबाबदारीची विविध उच्च पदे भूषविल्यानंतर आता त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महिलांचे हक्क,त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत त्यांच्या निवडीमुळे मोठी सकारात्मक भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या नियुक्तीचे केवळ महिलावर्गच नव्हे तर समाजाच्या सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.





0 टिप्पण्या