मार्च महिन्यात घडलेल्या लखन अंभोरे याच्या "सामूहिक हत्याकांड" प्रकरणाने अकोट शहर संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारीच्या क्षेत्रात चांगलेच "गाजले" होते. ह्या हत्याकांडात अकोट पोलिसांनी तब्बल १६ आरोपी निष्पन्न केले असून त्यातील जवळपास १३ आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात पाठविले आहे. तर उर्वरित ३ आरोपी अद्यापी फरार आहेत.
दरम्यानच्या काळात गेल्याच महिन्यात दि.२४/०४/२०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ह्या हत्याकांडातील फरार असलेल्या आरोपी रेखा मुरली अंभोरे ह्या महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला असल्याने त्यावेळी समोर आलेल्या काही घटनांनी अकोट शहर पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अकोट येथील काही "पांढरपेशा लोकांच्या भरवशावर अवैध सावकारी" करणाऱ्या लखन अंभोरे,वय ३२, रा. राजेंद्र नगर, झिंगाभोई पुरा, याच्यावर दि.०९/०३/२०२६ रोजी भरदिवसा जमावाने काठ्या, लोखंडी पाइप, दगड व विटांनी हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन अंभोरेंचा दुसऱ्या दिवशी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात १६ जणांवर खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकूण १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आजरोजी हे सर्व आरोपी कारागृहात आहेत.
सोमवार दि.९/३/२०२६ ला दुपारी चार वाजताच्या दरम्यान लखन दुचाकीने (एमएच ३०, बीवाय ९२६८) आपल्या घराकडे जात असताना दबा धरून बसलेल्या काही जणांनी राजेंद्र नगरच्या जवळच त्याला गाठले व त्याच्यावर दगड-विटा व लोखंडी पाइपने हल्ला चढवला. यात लखन घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाच त्याला मारहाण झाल्याचे समजताच त्याची पत्नी दुर्गा अंभोरे, यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या दुसऱ्या पत्नीला व पुतणीलासुद्धा आरोपींनी मारहाण केली.ह्या अनपेक्षित हल्ल्याने लखन अंभोरेची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला अकोला येथे हलवले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी अकोट शहर पोलिस ठाण्यात लखन अंभोरेची पत्नी दुर्गा लखन अंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राम अंभोरे, अनिल शिवरकर, गजानन अंभोरे, छोटुदास शिवरकर, मुरली अंभोरे व पंकज शिवरकर यासह एकूण १६ आरोपींच्या विरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.यापैकी १३ आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात पाठविण्यात आले आहे तर तीन आरोपी अद्यापी फरार आहेत.
रेखा मुरली अंभोरे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला असता त्यांच्या वतीने त्यांच्या वकिल पायल कावरे यांनी असा युक्तिवाद केला की, अर्जदाराला या गुन्ह्यात खोट्या आरोपांखाली गोवण्यात आले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या कुटुंबियांसह त्याच परिसरात राहत आहे आणि घटनेच्या दिवशी, भांडणाचा आवाज ऐकून ती घराबाहेर आली आणि तिने लखनला जमावाने घेरलेले पाहिले. त्या जमावात तिचा पतीसुद्धा उपस्थित होता.वकिलांनी पुढे असाही युक्तिवाद केला की, ती केवळ घटनेची एक साक्षीदार होती आणि एफआयआरचे अवलोकन केल्यास असे दिसून येईल की,सदरहू घटनेत तिचा कोणताही सहभाग नव्हता. त्यानंतर त्यांनी न्यायालयाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्याकडे वेधले आणि असा युक्तिवाद केला की जेव्हा कलम ३४ किंवा १४९ नुसार भारतीय दंड संहितेतील तरतुदी लागू केल्या जातात, तेव्हा न्यायालयाने या प्रकरणांचा विचार अत्यंत सावधगिरीने आणि दक्षतेने करणे आवश्यक आहे, कारण अशा प्रकरणांमध्ये अनेकदा अनावश्यक व्यक्तींना गोवले जाण्याचे प्रकार घडतात, ही एक सर्वश्रुत आणि चिंतेची बाब आहे. म्हणूनच, करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप लक्षात घेऊन, आपल्या अशीलाला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा,अशी विनंती अर्जदाराच्या वकिलांनी केली आहे.
सहाय्यक सरकारी वकील ए.एम.घोगरे यांनी या अर्जाला विरोध करून नोंदविण्यात आलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यांनी म्हटले की, अर्जदार घटनास्थळी उपस्थित होती, मात्र ती केवळ एक प्रेक्षक होती की तिने प्रत्यक्ष घटनेत सहभाग घेतला होता, ही बाब खटल्याच्या सुनावणीदरम्यान पुराव्यासह समोर आणली जाऊ शकते.
अर्जदाराचा पतीही त्या जमावात उपस्थित होता, केवळ याच कारणामुळे अर्जदाराचे नावही एफआयआर मध्ये आरोपी म्हणून समाविष्ट केले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्जदार ही तीन मुलांची आई असलेली एक महिला आहे,तसेच आरोपी "कृष" आणि इतर १३ आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
दोन्ही पक्षांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यावर नागपूर खंडपीठात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी म्हटले की, अर्जदाराची कोणतीही विशिष्ट भूमिका निश्चित करण्यात आलेली नाही आणि वरकरणी पाहता ती केवळ एक प्रेक्षक असल्याचे दिसून येते, ही वस्तुस्थिती विचारात घेता,सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन,अर्जदाराला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येऊन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
१) अकोट शहर पोलीस ठाणे, जिल्हा अकोला येथे नोंदविण्यात आलेल्या गुन्हा क्र. ३०२/२०२६, दि.१०.३.२०२६ अन्वये, भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ४९, १०३(१), १०९(१), ११५(२), ११८(१), १८९(२), १९०(२), १९१(३) आणि ३५२ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांच्या संदर्भात अटक झाल्यास, अर्जदार श्रीमती रेखा मुरली अंभोरे यांना २५,०००/- रुपये (अक्षरी: पंचवीस हजार रुपये मात्र) रकमेचा स्वतःचा जामीनबंध (P.R. Bond) आणि तितक्याच रकमेचा एक सक्षम जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामिनावर मुक्त करण्यात यावे.
२) तपास अधिकारी जेव्हा जेव्हा निर्देश देतील, तेव्हा तेव्हा अर्जदाराने संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहावे.
३) अर्जदाराने अभियोग पक्षाच्या पुराव्यांशी छेडछाड करू नये किंवा अभियोग पक्षाच्या साक्षीदारांना धमकावू नये आणि तपासात सहकार्य करावे.
४) अर्जदाराने न्यायालयाच्या पूर्वपरवानगी शिवाय देश सोडून जाऊ नये.
या प्रकरणांत अर्जदार रेखा मुरली अंभोरे यांच्या वतीने ऍड.पायल कावरे यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाची बाजू ऍड. ए.एम.घोगरे यांनी मांडली.
या हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरूच असून अजून न्यायालयात "चार्जशीट" दाखल होण्यास बराच अवधी आहे, मात्र पोलिसांनी केलेल्या "ढिसाळ" तपासामुळे प्रकरणाची साक्षात "ट्रायल" सुरू होईपर्यंत सर्वच आरोपी जामिनावर "बाहेर" आल्यास त्यात नवल वाटण्यासारखे काहीच असणार नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी नागपूर शहरात घडलेल्या अक्कू यादव प्रकरणांत ज्याप्रमाणे दीडशेच्या वर असलेले आरोपी जसे निर्दोष मुक्त झालेत, तसेच याही प्रकरणांत होण्याची शक्यता काहीजण व्यक्त करीत आहेत.
या प्रकरणातील आरोपींची न्यायालयात बाजू मांडून त्यांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांना देखील त्यांच्या "फी"मधून "हिस्सा" मागण्याची हिंमत काही "चेंडू दांडू" खेळणाऱ्या लोकांनी केली असल्याचे कानावर आले आहे.
तर या हत्याकांडाच्या निमित्ताने शहरातील बऱ्याच लोकांनी आपले "उखळ पांढरे" करून घेतले असल्याची चर्चा असून यातील काही खरे आरोपी बाहेरच असून ही घटना पाहण्यास "जमलेल्या" लोकांचीच "जत्रा" करण्यात आल्याची देखील चर्चा आहे, खरे खोटे मात्र संबंधित आरोपी, हे मध्यस्थ आणि पोलिसांनाच माहीत.! आमचे मात्र "कानावर हात" आहेत.ऐकीव गोष्टींवर कितपत "विश्वास" ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हेही तितकेच खरे..!






0 टिप्पण्या