मोती तलाव गणपती विसर्जन कुंड काम पुर्ण करण्याअगोदरच गुत्तेदाराला १९ कोटी रु. दिले, कुंडाच्या अर्धवट व निकृष्ठ कामाची चौकशी करण्याची बागडी यांची मागणी...



   फार मोठा गाजावाजा करीत,जालना शहरात मोतीबाग गणपती विसर्जन कुंडाचे काम करण्यात आले. या कामात कंत्राटदाराला काम करण्याअगोदर १९ कोटी रुपयांचा निधी देखील देण्यात आला. यासाठी तत्कालिन मनपाच्या अधिकाऱ्यांसह लेखाधिकारी, बांधकाम अभियंता यांनी संगणमत करून, मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात नुकत्याच प्रभार घेतलेल्या  आयुक्त श्रीमती शर्मा यांनी लक्ष घालून, अर्धवट विसर्जन कुंडाची चौकशी करून, संबंधीत कंत्राटदारासह त्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

   जालना शहरातील मोती तलाव येथील गणपती विसर्जन कुंडाच्या नावाखाली १९ कोटी रुपयांची देयके काढण्यात आलेली आहे.परंतु प्रत्यक्षात केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, वापरण्यात आलेले साहित्यही अत्यंत कमी दर्जाचे आहे. सदर कुंडाचा उपयोग वर्षातून केवळ दोन वेळाच (गणपती विसर्जन व नवरात्र विसर्जन) केला जातो, तरीही इतक्या मोठ्या निधीचा वापर करूनही हा कुंड प्रत्यक्ष वापरासाठी अयोग्य ठरत आहे. कुंडामध्ये पाणी साठत नाही व उलट तलावाचे पाणी आत येते, यावरून कामाची निकृष्टता स्पष्ट होते.सदर कामामध्ये मंजूर अंदाजपत्रकाचे पालन करण्यात आलेले नसून, संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त बिल तयार करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे. तसेच लेखा विभागाने कोणतीही प्रत्यक्ष पाहणी किंवा तपासणी न करता बिल मंजूर करून या गैरव्यवहारात सहभाग घेतला आहे.म्हणून या प्रकरणात संबंधित अभियंते व लेखा विभाग यांना थेट जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीस तक्रार नोंदविण्यात यावी.तसेच या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र (बाह्य) यंत्रणा मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.


  मोती तलाव गणपती विसर्जन कुंडाच्या कामाची बाह्य यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित अभियंते व लेखा विभागातील अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा   नोंदविण्यात यावा, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी,सदर कामाची तांत्रिक तपासणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. जर वरील मागण्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारून उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे, त्यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आपण या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी,अशी मागणीही बागडी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या