राज्यातील सर्वसामान्य जनतेला वाढती महागाई व बेरीजगारीमुळे जीवन जगणे मुश्कील झालेले असतांनाच गेल्या वर्षभरापासून राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी लोकप्रतिनिधींना गौहाट्टीला नेऊन "खोके" दिल्याच्या बातम्यांमुळे व आजही त्याबाबत खुल्लेआम होत असलेल्या चर्चांमुळे राज्यातील कोट्यावधीच्या संख्येतील सरकारी रेशनच्या दुकानातून मिळणाऱ्या गहू,तांदुळावर जीवन जगणारी सर्वसामान्य जनता पुरती हवालदिल झालेली असतांनाच आज एका सरकारी अधिकाऱ्याला आजपर्यंतच्या राज्याच्या इतिहासातील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल "एका खोक्याची" लाच घेत असतांना रंगेहाथ पकडण्यात आले असल्याने आज त्या गोरगरीब,सर्वसामान्य "भुकेकंगाल" लोकांना जीवन जगणेही "निरर्थक" वाटत आहे.
आजच्या घडीला राज्यात हे सर्व चाललंय तरी काय ? हाच प्रश्न राज्यातील जनतेला पडला असून "ज्याच्या हातात सत्तेची दोरी तोच
करी शिरजोरी" अशीच अवस्था झाली असल्याने व त्या जनतेला कुणीच वाली उरला नसल्याने "तोंड दाबून,बुक्क्यांचा मार" खात हलाखीचे जीवन जगावे लागते आहे. मात्र निर्ढावलेले राजकारणी आणि सरावलेले सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या लाचखोरी व बेबंदशाहीमुळे पुरोगामी महाराष्ट्राची अख्ख्या देशांत बदनामी होत असल्याने चक्क अधोगती कडे वाटचाल सुरू आहे.
भ्रष्टाचार हा भारतीय लोकशाहीला लागलेला "कलंक" आहे,परंतु तो काही आता इतक्यातच लागलेला नाही.तर तो पूर्वापार चालत आलेला आहे.याआधीही अधिकारी,कर्मचारी लाच घ्यायचे,मात्र सगळीकडे लागेबांधे असल्याने ते उघडकीस येत नव्हते,आणि त्यामुळेच कुणी "दुश्मनी" घेऊन तक्रार द्यायला पुढे येत नव्हते.परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.एसीबीने राज्यातील आपल्या प्रत्येक युनिटच्या माध्यमातून समाजात जनजागृती व कायद्याचा प्रसार करून सर्व सामान्यांच्या मनातील कायद्याची भीती व धाक दूर करण्यात यश मिळविले आहे.
राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापणाच मुळात सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठीच झालेली आहे.मोठमोठी पैशांवाली लोकं यांना एसीबीची कधीच गरज भासत नाही कारण भ्रष्टाचाराची सुरुवातच त्यांच्यापासून झालेली आहे.सर्वसंबंधीत अधिकारी,कर्मचारी यांना दोन पैसे देऊन आपली कामे लवकरात लवकर काढून घेण्याचीच त्यांची मानसिकता असते.पैसे दिले की न होणारी "खोटी" कामे देखील करवून घेतल्या जातात हे ह्या "बड्या धेंडांना" चांगल्या पद्धतीने माहीत आहे.आजपर्यंत असेच सगळे "'तेरी भी चूप,मेरी भी चूप" अशा पद्धतीने सुरू होते,मात्र आता गेल्या दोन तीन वर्षांत एसीबीच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडून आल्याने सर्वसामान्य जनता हे केंद्रबिंदू ठेवून कामकाज करण्यात येत असल्याने महिन्यातून होणाऱ्या चार पाच कारवायांच्या संख्येत "न भूतो न भविष्यती" असा बदल होऊन आता ह्याच कारवाया दरदिवशी पाच सहाच्या वर पोहोचल्या आहेत.एखादे दिवशी सूर्य,चंद्र जनतेच्या नजरेस पडणार नाही,मात्र एसीबीची कारवाई होऊन एक दोन मोठ्या धेंडांना पोलीस कोठडीत पाठविल्याच्या बातम्या नक्कीच वाचायला मिळतात. हे सर्व रात्रंदिवस अत्यंत प्रमानिकपणे काम करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे.
राज्यात याआधीही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत होताच मात्र तेव्हा अशा आणि इतक्या व्यापक स्वरूपाच्या कारवाया होत नव्हत्या.त्याकाळात पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे केवळ नाईलाज म्हणून एसीबी या "साईड ब्रांचला" येत होते,मात्र आता सिव्हिल पोलीस मधील अधिकारी आणि कर्मचारी यांची मानसिकता बदलली असून काहीतरी आगळेवेगळे आणि मनासारखे करायला मिळते आणि सिव्हिल साईडला असलेला वरिष्ट अधिकाऱ्यांचा निरर्थक वचक म्हणा वा जाच या विभागात नसल्याने मनःशांती,मुलांचे उच्च शिक्षण आणि पारिवारिक समस्यांचे समाधान शोधण्यासाठी म्हणून एसीबीला किमान दोन वर्षे तरी काम करण्याची मानसिकता ठेवून येत असल्याने ज्या विभागात बोलावल्यानेही कुणीच जात नव्हते त्या विभागाकडे पुढील दोन वर्षांची "वेटिंग लिस्ट" आजच तयार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला "शाप" आहे की काय देव जाणे,पण कुणीच पूर्णवेळ महासंचालक मिळालेला नाही हे या विभागाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.केवळ दीक्षित नावाचे एक सद्गृहस्थ या विभागाला लाभले व त्यांनी मिळालेल्या "संधीचं सोनं" करीत महाराष्ट्र एसीबीला १९८८ च्या काळात बांधलेल्या "जोखडा" तून मुक्त करून "फिल्डवर" काम करणाऱ्या अधिकारी वर्गाला "फ्रिहॅन्ड" देत जुन्या कायद्यातही काही बदल केल्याने राज्य एसीबीत जिवंतपणा येऊन कामातही सुसूत्रता आली.आणि केवळ हजार पाचशेच्या लाच मागणीच्या कारवाईत केवळ बाबू,चपराशी वा शिपाईच न अडकता "क्लास १/२" चे करोडो रुपये घेणारे अधिकारी सुद्धा अडकायला लागलेत. आज अहमदनगरच्या एमआयडीसी च्या अभियंत्याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेत असतांना रंगेहाथ पकडले ही घटना त्याचाच परिपाक आहे.
आजरोजी महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पूर्णवेळ डीजीपी नाहीत तरीसुद्धा अतिरिक्त महासंचालक म्हणून काम पाहणारे निकेत कौशिक व निदान पोलीस शिपाई म्हणून तरी पोलीस दलात भरती होऊन समाजाची सेवा करण्याची मनीषा बाळगून असलेले लाखो बेरोजगार युवकांचे श्रद्धास्थान असलेले मराठमोळे विश्वास नांगरे पाटील हे दोघेही आपल्या खांद्यावर "एसीबीचा डोलारा" यशस्वीपणे पेलत आहेत. एसीबीतील अधिकारी यांच्याकडून दरमहा त्यांच्या विभागातील कारवायांचा आढावा घेऊन पुनश्च नवीन नवीन जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावर देत असतांनाच ते अधिकारी सुद्धा हसत हसत त्यापूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील एसीबीच्या कारवायांचा वेग वाढला असून त्याचे दृश्य परिणाम जनतेला दिसत आहेत.
लाचखोर हा कितीही मोठा अन कुणाशीही संबंधित असला तरी त्याला एसीबीच्या कोठडीची हवा आणि भत्ता दिल्याशिवाय सोडल्या जात नाही.मात्र ह्यासाठी त्यांना हवे असलेले वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण पाठबळ मिळत असल्यानेच हे सर्व शक्य होत आहे.प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या कारवायांमध्ये न्यायालयांमध्ये योग्यरितीने पाठपुरावा करून आरोपींना जेलची हवा खाण्यासाठी पाठविल्या जात असतांनाच जिल्हाभरातील भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विश्वासू लोकांकडून "जंत्री" जमा करण्याचेही काम हे अधिकारी करीत आहेत.आणि त्यांच्या या कामाला त्रस्त झालेले नागरिक सुद्धा सहकार्य करीत असल्याने पाहिजे तसे "रिझल्ट" मिळत आहेत.
नाशिक आणि अहमदनगर हे दोन्ही जिल्हे राज्यातील सर्वांत श्रीमंत जिल्हे असल्याने त्या भागात भ्रष्टाचारही त्याच प्रमाणात होत असतो आणि त्याच विभागातील कारवायांची संख्या देखील मोठी आहे.त्यातच अधिकारी वर्गातील समन्वयाने देखील कारवायांची संख्या मोठी आहे, हे विसरून चालणार नाही.
राज्यातील गेल्या वर्षभरात झालेल्या कारवायांमध्ये अहमदनगरचे एमआयडीसी पोलीस ठाणे हे सतत प्रसिद्धी झोतात असून एसीबीने सर्वात जास्त लाचखोरीचे गुन्हे याच पोलीस ठाण्यात नोंदविले आहेत.
आजच्या घटनेत तब्बल१ कोटी रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सहाय्यक अभियंता किशोर गायकवाड (३२ वर्षे ) आणि तत्कालीन उपविभागीय अभियंता आणि सध्या धुळे येथे कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता गणेश वाघ हे दोघेही एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. एसीबीने ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत केली आहे.आज सकाळीच प्रसार माध्यमांनी ही घटना उघडकीस आणल्याने संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या घटनेतील तक्रारदार छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदार यांच्या कम्पणीला एमआयडीसीतील पाईपलाईन बदलण्याचे काम देण्यात आले होते,१००० एम.एम. व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे मंजूर निविदेनुसार ३१ कोटी ५७ लाख ११ हजार ९९५ रूपय रक्कमेचे ५ टक्के प्रमाणे अनामत रक्कम१ कोटी ५७ लाख ८५ हजार ९९५ रूपये तसेच सदर कामाचे सुरूवातीची सुरक्षा ठेव रक्कम ९४ लाख ७१ हजार ५०० रूपये झालेल्या कामाचे अंतिम देयक १४ लाख ४१ हजार ७४९ रूपये असे एकुण २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपये कंत्राटदार यांना मिळावे म्हणुन सदर बिलावर तत्कालीन उपविभागीय अभियंता आणि सध्याचे धुळे येथे कार्यरत कार्यकारी अभियंता गणेश वाघ याचे मागील तारखेत रेकॉर्ड तयार करून त्यावर त्याच्या सह्या घेवून सदर देयक त्याच्याकडे पाठविण्याचा मोबदल्यात सहाय्यक अभियंता किशोर गायकवाड याने स्वतःसाठी तसेच गणेश वाघ करिता तक्रारदार यांचे सदर कामाचे बिलाचे व यापुर्वी अदा केलेली काही बिलांची बक्षीस म्हणून १ कोटी रूपयांची दि.२०/१०/२०२३ रोजी मागणी केली होती.
मात्र तक्रारदाराला इतकी मोठी रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दिली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आल्याने व त्यानंतर आयोजित सापळा कारवाईत पंचांसमक्ष १ कोटी रूपये लाच म्हणून स्विकारल्यावर गायकवाड ह्याला रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील दुसरा लाचखोर गणेश वाघ हा फरार झाला आहे.
फरार
राज्यातील प्रथमच इतक्या मोठ्या रकमेची ही कारवाई एसीबीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील,नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर अधीक्षक माधव रेड्डी,उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलिस नाईक प्रभाकर गवळी,संदीप हांगडे,किरण धुळे आणि सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.






0 टिप्पण्या