अकोटचा आठवडी बाजार, साक्षात मेल्यानंतरचा पापी लोकांचा नरक..?



      सुमारे सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट नगर पालिकेत, गडचिरोली जिल्ह्यातील नुकतेच मुख्याधिकारी म्हणून नोकरीवर लागलेल्या, कोणत्याही स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अनुभव नसलेल्या नरेंद्र बेंबरे नामक  एका अननुभवी व्यक्तीला नगर पंचायतीतून उचलून सरळ मुख्याधिकारी म्हणून आणून अकोटकरांच्या "उरावर" बसविण्यात आले आणि येथूनच अकोट शहरातील नागरिकांच्या नशिबाला "पनवती" लागली.

    अकोट शहरात सर्वच जाती धर्माचे लोक गेल्या कित्येक वर्षांपासून गुण्या गोविंदाने एकत्र राहत असून या शहराला एका ठिकाणी म्हणा वा एकाच माळेत गुंतवून ठेवण्याचे काम हे अकोट शहरातील नागरिकांच्या केवळ आरोग्यच नव्हे तर त्यांच्या सर्वच गरजांचा सार्वत्रिक विचार करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम अकोट नगर पालिका ही लोकनियुक्त स्थानिक स्वराज्य संस्था करते.याठिकाणी शहरातील अनेक मान्यवर लोकांना जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून या नगर पालिकेत पाठविले आणि त्या सन्माननीय प्रतिनिधींनी सुद्धा अगदी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडून शहरातील नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.


     मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाने राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त करून त्याठिकाणी शासनाचे अर्थात जनतेचे नोकर असलेल्या अधिकाऱ्यांनाच प्रशासक म्हणून बसविले आणि येथूनच नगर पालिका नामक स्वायत्त संस्थांचे, इतरत्र कुठे नसतील पण अकोट नगर पालिकेत मात्र  "धिंगाने" सुरू झाले. मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या संगनमताने शहरातील लाखो लोकांच्या भविष्याचे निर्णय घेतले जाऊ लागले.मात्र हे असे निर्णय घेत असताना नागरिकांचे त्या निर्णयात हित आहे की या अधिकाऱ्यांच्या "हितचिंतकांचे हित" याविषयी संभ्रम निर्माण व्हायला लागला.लोकनियुक्त नगर सेवक व नगराध्यक्ष यांनी सर्वांना विश्वासात घेऊन,नगर पालिकेची नीट बसविलेली घडी काही दिवसांतच पार विस्कटली असून त्याला शहरातील जनतेशी कोणतेही सोयर सुतक नसलेले हे शासनाचे बिगर अनुभवी, नागरिकांशी बोलतांना,वागतांना "सौजण्याचा पूर्णतः अभाव" असलेले नवखे अधिकारीच अगदी शंभर टक्के जबाबदार आहेत, हे आजरोजी तरी कुणालाही सांगण्याची गरज नाही.


      सुरुवातीला महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना शासनाने नगर पालिकेत प्रशासक म्हणून जबाबदारी दिली होती मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांची ही जबाबदारी काढून मुख्याधिकारी यांनाच प्रशासक करण्यात आल्याने त्यांची "लॉटरीच" लागली असून कोणताही निर्णय घेताना आता मुख्याधिकारी यांना कुणालाही विश्वासात घ्यायचे तर सोडाच साधे कानावर टाकायचीही गरज राहिलेली नाही.त्यामुळे नगर पालिकेत मुख्याधिकारी यांचा "एकछत्री अंमल" सुरू झाला असून "आखाडा त्यांचाच,त्यातील लाल मातीही त्यांचीच, पहेलवानही तेच वरून पंचही तेच आणि मग विजेते अकोट केसरीही तेच" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यावरूनच नगर पालिकेत आजरोजी काय चालत असेल आणि कसे चालत असेल याचा विचार केला तरी प्रचंड भयानक परिस्थिती नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही.


    अकोट नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून बसलेल्या नरेंद्र बेंबरे यांनी आपल्या हितचिंतक व काही पैशांच्या लोभी असलेल्या लोकांसाठी जनतेने जमा केलेल्या एक एक रुपया ( बाजार वसुलीच्या नावावर टोपलीत ठेवून सांबार, मेथीची गड्डी विकणाऱ्या म्हातारी कडूनही १० रुपये हिसकण्यात येतात.) म्हणा वा टॅक्स म्हणून जमा केलेल्या पैशांची "खुल्ली लूट" सुरू केली असून गरज नसलेल्या वा ज्या कामांचा आणि शहरातील नागरिकांचा कवडीचाही संबंध येत नाही अशा कामांना विकासकामे ठरवून ठेकेदारांसाठी नगर पालिकेचा खजिना उघडा करून देण्यात आला आहे.



     अकोटच्या आठवडी बाजाराची काय अवस्था आहे हे गुगल वर सर्च केले तरी दिसून येईल इतकी वाईट अवस्था आहे.शेणामुतात, "दुनियाभराची घाण" नव्हे तर साक्षात "नरकात" बसून येथील शेतकरी व आडते भाजीपाला विकायला बसतात आणि या गावातील गरजवंत निष्पाप नागरिक आपल्या कुटुंबाला लागणारा आठवडाभराचा भाजीपाला येथून घेऊन जातात. "मेल्यावर वाईट कर्म करणाऱ्याला नरकवासाची शिक्षा मिळते असे सांगितल्या जाते,तो नरक कुणी पाहिल्याचे माहीत नाही पण बहुधा तो अकोटच्या आठवडी बाजारापेक्षा वेगळा असेल असे कुणीच ठामपणे नाही सांगू शकणार, "ही आमची ग्यारंटी आहे.



    अकोटच्या या आठवडी बाजारात कुणीच आजपर्यंतही काहीच सोयीसुविधा दिल्या नसतील हे मान्य परंतु त्यांनी कमीतकमी याच अकोटकरांच्या जखमांवर मीठही चोळले नाही, हेही तितकेच खरे.


    मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांच्या कारकिर्दीत अकोट शहरातील हिवरखेड व पोपटखेड या रस्त्यावर कलदार चौकातील टी पॉईंट जवळ ग्रामीण पोलीस स्टेशन व तहसीलदार बंगल्याच्या बाजूला थोडे थोडके नव्हे तर तब्बल ६५ लाख रुपये खर्च करून त्या भागातील लोकांसाठी  नवीन "भाजीबाजार" बांधला आहे. आपल्या मर्जीतील ठेकेदाराला हे काम देऊन ते काम युद्धस्तरावर पूर्ण करून त्याचे बीलही काढण्यात आले असल्याचे समजते. आता याला तुम्ही काय म्हणणार ? ही जर नगर पालिकेची "लूट" नसेल तर या अधिकाऱ्यांना आमचा "सॅल्युट" आहे.


   अकोट नगर पालिका ही आजरोजी रावणाच्या सोन्याच्या लंके पेक्षा कमी नाही, जिल्हाधिकारी,राज्यशासन, वित्तआयोग,वेगवेगळ्या योजनांचे निधी व स्थानिक लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपये शहरातील नागरिकांच्या रस्ते,नाल्या, साफसफाई या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी देत असतात,मात्र अकोट नगर पालिकेतील "झारीतील हे शुक्राचार्य" त्या पैशांची मधातच पार वाट लावत असून नागरिकांना त्यांचे हक्क  मिळत नसल्याने सर्वसामान्य जनता आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना "तोंडाच्या तोफेसमोर" ठेवून आपल्या मनातील खदखद व्यक्त करीत असते,आणि ते साहजिकही आहे.कारण हे सर्व थांबविण्यासाठी त्यांचा यात कुठेच हस्तक्षेप दिसत नाही.



 लेखमाला -भाग: २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या