अकोट न.पा.त बेंबरेंची बेबंदशाही, शहरांत मोकाट कुत्रे व डुकरांचा हैदोस...




    अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात माणसे राहतात की मुकी, बहिरी जनावरे..? आणि जर माणसे राहत असतील तर ते बोलत का नाहीत वा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते आवाज का उठवीत नाहीत हे समजायला आजरोजी तरी काहिच मार्ग नाही.अकोट शहरात चालायला धड रस्ते नाहीत, जागोजागी नाल्या तुंबून त्यातील घाण पाणी व कचरा रस्त्यांवर कित्येक दिवस पडून असतो. कायम आजारी लोकांचे शहर म्हणून अकोटची "इज्जत" केवळ जिल्ह्यातच नव्हेतर सर्वत्र "निलाम" होत आहे.


     आजच्या घडीला शहरातील "एका व्यक्तीच्या मागे एक मोकाट कुत्रे व एक डुक्कर" असे प्रमाण आहे.अकोट शहरांत शेकड्याने समाजसेवी संस्था आहेत,त्यापैकी एकाही संस्थेने वा तिच्या स्वयंघोषित अध्यक्षाने कुत्र्यांच्या आणि डुकरांच्या संख्येबाबत सर्व्हे केल्यास आम्ही याठिकाणी सांगितले त्याहीपेक्षा जास्तच संख्या निघेल हे "शतप्रतिशत" सत्य आहे.



    आजरोजी तरी संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्र राज्यात कुठेच अस्तित्वात नसलेला "आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू" हा आजार अकोट शहरांतील मोकाट फिरणाऱ्या  डुकरांमध्ये आढळून आला असून त्याबाबत पशुवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून आठ दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.परंतु अकोट शहरांतील नागरिकांना याही गोष्टीचा अभिमान असावा की जी गोष्ट उभ्या राज्यात नाही ती आमच्या शहरांत आहे.आणि म्हणूनच या शहरातील जनता अगदी शांतपणे जे दिसते ते उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.कुठेही याबाबत निवेदन,तक्रारीची वा आंदोलनाची बातमी किंवा चर्चा नाही. यावरूनच या शहरातील जनतेला कशाचेही काहीच घेणे देणे नसून मिळत आहे त्यात सुख मानून जीवन जगण्यातच समाधान वाटत आहे.



    हीच गोष्ट जर दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यातील एखाद्या शहरात घडली असती तर तेथील नागरिकांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना या मोकाट व खरुजले कुत्रे आणि  जगाच्या पाठीवर कुठेच नसलेला आजार अंगावर घेऊन शहरातील आधीच "उरावर" असलेल्या "गंदगीने" रोग प्रतिकारशक्ती गमावून बसलेल्या निष्पाप मुले व नागरिकांना आपल्या आजाराची लागण करीत फिरणाऱ्या डुकरांचा  कायमचा बंदोबस्त करण्यासाठी "सळो की पळो" करून सोडले असते.


    ज्या स्थानिक नगर पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोकाट कुत्रे व डुकरांचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे ते अधिकारी एक एक महिना नगर पालिकेतील आपल्या कार्यालयात सुद्धा फिरकून पाहत नाहीत,ही वास्तविकता असून अकोट शहरातील नागरिकांची शुद्ध फसवणूक आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या मुख्याधिकारी यांनी २४ तास याच शहरात मुख्यालयी हजर राहून या शहरातील जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडवाव्यात किमान प्रयत्न तरी करावेत हे अपेक्षित असतांना हे जबाबदार अधिकारी सरळसरळ मुख्यालयी न राहता तोंड लपवित आहेत, याला काय म्हणता येईल.? 


    याच अकोट शहराला कधीकाळी "आफतकोट" म्हणून दुसरे नाव होते,कारण या गावातील प्रत्येक व्यक्तीचे काही विशेषगुण होते,त्यामुळे कोणताही "ऐरा गैरा,नत्थू खैरा" या शहरांत "हिडगावण्याची" हिम्मत करीत नसे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अकोटच्या जनतेला आपल्यातील या "उपद्रवमूल्य" असलेल्या गुणांचा विसर पडला असून "कुणीही यावे आणि टपली मारून जावे" अशी परिस्थिती झाली आहे.आणि त्याचेच परिणाम आज ही जनता भोगत आहे,ही दुर्दैवाची बाब आहे.


    शहरातील नागरिकांकडून कोट्यावधी रुपये कर वसूल करूनही जर त्यांना किमान सुविधा देखील स्थानिक नगरपालिका पुरवू शकत नसेल तर हे अपयश कुणाचे आहे.? या शहरातील नागरिकांनी कुणावर अवलंबून राहावे.? शासनाने या शहरातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी याठिकानी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारावर करोडो रुपये खर्च होत असताना या अधिकाऱ्यांना बांधिलकी व बंधने कुणाची .? जनतेला वाऱ्यावर सोडून अधिकारी जर बेताल होत असतील तर त्यांना वठणीवर आणण्याची जबाबदारी कुणाची.? 


   शहरातील डुकरांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचे प्रयोग शाळेतील अहवालाने जाहीर झाले आहे, तरी सुद्धा शहरांत साफसफाईची कोणतीही मोहिम हाती घेण्यात आलेली नाही, कोणत्याही प्रकारची औषध फवारणी केल्या गेली नाही, डुकरांचा कोणताही कायमस्वरूपी बंदोबस्त करणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना गरजेचे वाटत नाही.नगर पालिकेतील आरोग्य विभाग करतोय तरी काय.? पावसाळा संपून हिवाळा सुरू झालेला आहे,वातावरण बदलामुळे लहान मोठ्यांना सर्दी तापाचे आजार होत आहेत, त्यासाठी शहरातील प्रत्येक दवाखान्यात गर्दी दिसून येते. मात्र यातील किती जणांना नेमका काय आजार झाला याची कोणीही कोणतीही तपासणी करण्याचे गांभीर्य दाखवीत नाही.अशातच ह्या प्राण्यांच्या आजारापासून स्वाइन फ्ल्यूचा आजार शहरातील लोकांमध्ये झाला तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.किमान या गोष्टीचेही गांभीर्य कुणी घ्यायला तयार नाही, ही शोकांतिका आहे.

( कुणाच्याही भावना दुखावू नये म्हणून याठिकाणी डुकरांचे इतर वा जास्त फोटो टाकले नाहीत.)


     अकोट नगर पालिकेत मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांची बेबंदशाही सुरू असून तिला आवर घालणे अकोट मतदार संघाचे कर्तव्यदक्ष व विकास महर्षी असलेल्या आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांना देखील कठीण होऊन बसले आहे. मुख्याधिकार्यांच्या "हम करे सो कायदा" या वृत्तीमुळे अकोट शहराचे अतोनात नुकसान होत आहे.अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा होत्या मात्र अजूनही त्यांनी आपल्यातील "अभिजात गुण" जिल्ह्यातील जनतेला दाखविले नसल्याने सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग होत आहे,हेही तितकेच खरे.

( लेखमाला-भाग: १ )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या