अकोट तहसील कार्यालयाचा स्लॅब कोसळला,अधिकाऱ्यांची बेपर्वाई...



    अकोट शहराचे वैभव असलेल्या पुरातन इंग्रजकालीन "कचेरी" वरील तहसील कार्यालयाच्या नवीनच बांधकाम असलेल्या खोलीवरील स्लॅब शनिवारी कोसळला असून त्याखाली कुणाचा दबून जीव तर गेला नाही ना ? हे पाहण्याचे साधे मानवीय सौजन्यही दोन दिवसांपासून अकोटच्या महसूल विभागातील एकाही जबाबदार अधिकाऱ्याने दाखविले नाही ही अत्यंत चीड आणणारी खेदजनक बाब आहे.


    अकोट तहसील कार्यालयाच्या इंग्रजकालीन जुन्या इमारतीला लागूनच संजय गांधी योजना विभागाच्या बाजूलाच गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी नवीनच खोलीचे बांधकाम करण्यात आले आहे.याच खोलीच्या बाजूला कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.आजरोजी या स्वच्छतागृहाचा वापर हा फक्त कार्यालयीन महिला करीत असून  गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या संबंधात शासनाने दिलेल्या आदेशानुसार अनेक कर्मचारी व महिला तहसील कार्यालयात नोंदी तपासण्याची कामे करीत असल्याने महिला कर्मचारी वर्गाचा या स्वच्छता गृहाचा वापर वाढला आहे. तसेच त्यालगतच्या खोलीत काही जुने कार्यालयीन रेकॉर्ड व निवडणूक विभागाशी संबंधित जुने कागदपत्रें व लोखंडी पेट्या ठेवलेल्या असतात.



    दिवाळीच्या सुट्या संपल्यावर काल जेव्हा कार्यालय उघडल्यावर कर्मचारी तहसील कार्यालयात आले तेव्हा या खोलीवरील स्लॅब त्यांना कोसळलेल्या अवस्थेत दिसला त्याचवेळी हा प्रकार इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.मात्र कालपासूनही कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने हा स्लॅबचा मलबा उचलून या ढिगाऱ्याखाली कुणी दबून काही जीवितहानी तर झालेली नाही ना ? हे पाहण्याचेही साधे सौजन्यही दाखविले नाही.ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.


    अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण,नायब तहसीलदार आत्राम, स्वतःला अप्पर तहसीलदार म्हणवून घेणारे परिविक्षाधीन तहसीलदार विजय सवडे इतकेच काय तर अकोट उपविभागाचे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट बळवंत अरखराव यांनी कोणतीही मानवियता दाखवीत हा स्लॅबचा मलबा हटविण्यासाठी सा.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून वा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क करून हा मलबा हटविण्याचे सौजन्य म्हणा वा आपले कर्तव्य पूर्ण केले नाही.


      हा मजबूत स्लॅब कसा कोसळला व यात काही घातपात अथवा हा कार्यालयात चोरी करण्याचा किंवा काही महत्त्वाचे रेकॉर्ड गायब करण्याच्या प्रयत्नात तर हा दुर्दैवी प्रकार घडला नाही ना ? वा या स्लॅबखाली कुणी दबलेल्या अवस्थेत तर नाही ना ? हे देखील विचारात घेऊन हा मलबा तातडीने उचलणे आवश्यक होते.मात्र स्वतःला "एक्सिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट" म्हणवून घेणाऱ्या एकाही जबाबदार अधिकाऱ्याने दोन दिवसांपासून हा मलबा उचलून बाजूला करून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले नाही ही खेदाची बाब आहे.


    इतकेच काय तर "पंचनामा" करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळ अधिकारी किंवा तलाठ्याने देखील याठिकानचा "पंचनामा" करण्याचे आपले कर्तव्य बजावले नाही.त्यामुळे नेमके काय घडले व शासकीय साहित्याचे काय नुकसान झाले वा या मलब्याखाली दबून कुणी आपला जीव तर गमावला नाही? हे दोन दिवस झाले तरी समजू शकले नाही.


     समजा उद्या किंवा कधीतरी हा मलबा उचलल्या गेल्यावर त्याखाली दबून कुणी आपला जीव गमावला असेल तर त्यासाठी कुणाला जबाबदार धरण्यात येईल हा फार मोठा प्रश्नच आहे.आता हा मलबा उचलण्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनीच स्वतः पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवून हा मलबा उचलन्याची आपली जबाबदारी पार पाडावी व या दुर्दैवी प्रकाराची चौकशी करून आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना "माणुसकीचे" प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी अशा भावना अकोट शहरातील जनसामान्य व्यक्त करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या