एक खोका लाच प्रकरणातील फरार गणेश वाघ एसीबीच्या पिंजऱ्यात कैद...




   राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजलेल्या एक कोटीच्या लाच प्रकारणातील फरार असलेला आणि गेल्या दीड आठवड्यापासून एसीबीच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देणाऱ्या धुळे एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्याच्या मुसक्या आवळण्यात एसीबीला यश आले असून एसीबीच्या नाशिक पथकाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला मुंबईहुन धुळ्याकडे जात असताना रस्त्यातच त्याला अटक केली आहे.

    कंत्रातदाराचे अडीच कोटी रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी लागणाऱ्या स्वाक्षरीसाठी गणेश वाघने थोडी थोडकी नव्हे तर तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महा  मंडळाच्या अहमदनगर कार्यालया  अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील एक कंत्राटदाराने काम केले होते. गणेश वाघ हा त्यावेळी अहमद  नगरच्या कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत होता. त्यावेळी ठेकेदाराने पाईपलाईनचे काम केले होते.त्या कामाच्या बिलावर तसेच सुरक्षा ठेव व इतर काही घेणे असलेल्या रकमेच्या बिलांवर गणेश वाघ याची स्वाक्षरीची गरज होती. मात्र मध्यंतरीच्या काळात गणेश वाघ याची धुळे येथे पदोन्नतीवर बदली झाली होती. कंत्राटदाराला कामाच्या उर्वरित बिल मंजूरीसाठी गणेश वाघ याची बिलावर स्वाक्षरी गरजेची होती. या स्वाक्षरीसाठी गणेश वाघने १ कोटी रुपयांची लाच या कंत्रातदाराकडे मागितली होती. ही लाच नगर कार्यालयातील सहायक अभियंता असलेल्या अमित गायकवाड याच्याकडे देण्यास सांगितले होते.


     दरम्यान लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अमित गायकवाडला लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ अटक केली होती मात्र या प्रकरणामागे गणेश वाघ असल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले. परंतु एसीबीच्या सापळ्यात अमित गायकवाड सापडल्याचे माहीत झाल्यावर तीन नोव्हेंबरपासून गणेश वाघ गायब झाला होता. त्याने यातून सुटण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत परंतु त्यात त्याला यश आले नाही. काल दुपारी तब्बल १२ दिवसांपासून एसीबीला  गुंगारा देत असलेला "खोकेबाज" कार्यकारी अभियंता गणेश वाघ मुंबई ते धुळे या प्रवासा दरम्यान गुप्त सूचनेनुसार मागावर असलेल्या नाशिक एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात अडकलाच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या