आदिवासीच्या घराला आग लागून सर्वच झाले खाक,परंतु अकोटच्या महसूल विभागाला नाही आली जाग...




   अकोट तालुक्यातील सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड ते शहानुर या नरनाळा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मलकापूर (गोंड ) या छोट्याशा आदिवासी गावातील एका घराला आज अंदाजे साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागून घर व दुकान खाक झाले आहे.


   मलकापूर गोंड येथील राजू बापू सुरगाये या आदिवासी व्यक्तीचे लहानसे किराणा दुकान आहे.या दुकाणाला सायंकाळी आग लागून त्या आगीने त्याचे संपूर्ण घरच कवेत घेऊन काही मिनिटातच त्या गरीब आदिवासीच्या "संसाराची राखरांगोळी" झाली आहे.या आगीत घरात असलेला जवळपास पाच क्विंटल कापूस व इतर शेतमाल, परिवारातील सदस्यांचे कपडेलत्ते व खाण्यापिण्याचे जीवनोपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे.



    एकूण ४ सदस्य असलेल्या राजू सुरगाये याचे या आगीत अंदाजे बारा ते तेरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राप्त माहितीवरून कळत आहे.ऐन दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी लागलेल्या या आगीत आदिवासी कुटुंब काहीच शिल्लक न उरल्याने उघड्यावर आल्याने संपूर्ण आदिवासी गावावर शोककळा पसरली आहे.



    मलकापूर गावात आग लागल्याची माहिती मिळताच पोपटखेड येथील बचाव व मदत पथकाचे पांडूरंग तायडे यांनी तातडीने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती देऊन घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह मदतीला धावले तर अकोट येथील शिवसेनेचे संघटक,संकटसमयी कुणाच्याही मदतीला काळ वेळ न पाहता धावून जाणारे पत्रकार रोशन पर्वतकर हे प्रत्यक्षतः अकोट नगर पालिकेचे अग्निशामक घेऊनच घटनास्थळी पोहोचले व अग्निशमन जवानांच्या खांद्याला खांदा लावून लागलेली आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

    अकोट शहरापासून केवळ १५ किमी अंतरावर आलेल्या या आदिवासी गावात आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे अधिकारी काळे हे आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले तर ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सुद्धा धावतपळत घटनास्थळी जाऊन आग विझविण्याचे कामात जीवाची पर्वा न करता सहकार्य करीत असताना सर्व गावकऱ्यांना दिसून आलेत मात्र ज्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यात आधी पोहोचून मदतकार्य करणे अपेक्षित असतांना महसूल विभागाचे तहसीलदार,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी व तलाठी हे तर सोडा साधा कोतवाल सुद्धा आदिवासी व्यक्तीच्या सर्वस्वाची राखरांगोळी होईपर्यंत हजर झाले नाहीत ही प्रचंड "शोकांतिका" आहे.

( तलाठी यांनी घरी बसून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेला हाच तो अहवाल.)
    
   या भागात कुणी धवणे नामक महिला तलाठी असून त्या घटनास्थळी हजर नव्हत्या तरी त्यांनी घरी बसूनच या आगीने झालेल्या नुकसानीचा "अहवाल" आपल्या वरिष्ठांना पाठविला असून तो अकोट शहरातील सोशल मीडियावर फिरत आहे.तर अकोलखेड या महसूल मंडळात निंबोलकर हे मंडळ अधिकारी असल्याची माहिती सांगण्यात येत असून काही लोकांच्या सांगण्यावरून अशीही माहिती मिळत आहे की त्यांची जरी याठिकाणी नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांना अजुनही ज्यांच्याकडे या मंडळाचा प्रभार होता त्यांनी अद्यापही कोणताच प्रभार दिला नाही.यात कितपत वास्तविकता आहे याबद्दल मात्र अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण आणि हे दोन मंडळ अधिकारीच सांगू शकतील.


   निंबोलकर हे खामगावला राहून अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोलखेड या मंडळाचा कारभार पाहत असतील तर यासाठी अकोटच्या महसूल विभागातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना यावर्षीचा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार देऊन नक्कीच गौरव व्हायला पाहिजे.कारण आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कामे करून घेणारे इतके "प्रामाणिक" अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाहीत.


    नेमका प्रभार कुणाकडे आहे हे अजूनही कुणालाच नेमके माहिती नसणे यातच सगळे काही आले आहे. जर का नवीन आलेल्या व्यक्तीला प्रभार देण्यात आला नाही तर तो का देण्यात आलेला नाही ? आणि जर हा प्रभार त्या व्यक्तीला दिल्या गेला असेल तर ती व्यक्ती गेल्या दीड महिन्यांपासूनही या मंडळात कुणालाच का दिसली नाही ? आणि आज इतकी मोठी दुर्दैवी घटना घडूनही ही व्यक्ती घटनास्थळी पोहोचू शकत नसेल तर शासनाने असे "भ्रष्टाचारी बैल" पोसण्याचे कारण तरी काय ? गेल्या सात महिन्यांपासून एसीबीच्या कारवाईत अडकलेल्या निंबोलकर या मंडळ अधिकाऱ्याचा पगार हा अकोलखेड या मंडळातून निघत आहे,गेल्या दीड महिन्यांपूर्वी या मंडळ अधिकाऱ्याला याच मंडळात नियमित नेमणूक दिलेली आहे.त्याने जर प्रभार घेतला नाही तर का नाही घेतला ? आणि जर का प्रभार घेतला असेल तर तो मुख्यालयी हजर का राहत नाही ? याचा जाब त्याला अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण व उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव हे विचारतील की नाही हेही एक प्रश्नच आहे.


     मात्र त्यांच्या मंडळात आग लागून एका आदिवासी व्यक्तीने आपले सर्वस्व गमावले व तो आणि त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे तरी सुद्धा अकोटच्या महसूल विभागातील हा "धांगडधिंगा" काही थांबायचे नाव घेत नाही ही महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी शोकांतिका आहे.अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तरी अकोट तालुक्याकडे विशेष लक्ष देऊन सर्वसामान्य लोकांना भेडसावत आलेल्या समस्या दूर कराव्यात अशा अकोटच्या सर्वसामान्य जनतेच्या वाजवी अपेक्षा आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या