अकोट नगर पालिकेत कुत्र्यांचे साम्राज्य...



    अकोला जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणारी आर्थिक,भौगोलिक दृष्ट्या सर्वच बाबतीत संपन्न आणि "श्रीमंत" अशी अकोटची नगर पालिका असून आज रोजी मात्र १०० वर्षांच्याही वर "वैभवशाली इतिहास" भोगलेली अकोट शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याची संस्था शहरातील "मोकाट कुत्र्यांच्या" ताब्यात असून या ठिकाणी त्यांचेच "साम्राज्य" असल्याचे दिसून येत असल्याने या वैभवशाली शहरातील नागरिकांची अवस्था ह्या कुत्र्यांनी अत्यंत "केविलवाणी" अशी करून टाकलेली आहे.ह्या मोकाट कुत्र्यांच्या भीतीने दिवसाही लोकं नगर पालिका कार्यालयात जायला भीत आहेत,आणि ही "वस्तूस्थिती" आहे.


     अकोट नगर पालिकेत गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या सर्वच पक्षांनी आपआपल्या परीने सत्ता उपभोगली असून त्या त्या काळातील सत्ताधाऱ्यांनी आपल्या कारकिर्दीत या संस्थेच्या इमारतीत बदल केले असून गेल्या काही वर्षात तिचे "रूपच" बदलून टाकले आहे.जुनी इमारत पाडून आज त्याठिकाणी तीन मजली टोलेजंग अशी प्रशस्त व देखणी इमारत उभी करण्यात आली असली तरी तिचे वरचे दोन मजले "रिकामेच" असून अजूनही ह्या नगर पालिकेतील अत्यंत महत्वाचे असलेले "जन्म मृत्यू नोंद", अत्यंत महत्वाचा असलेला "कर विभाग" व कर्मचाऱ्यांचा लेख जोखा असलेला "लेखा विभाग" आणि शहवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणारा "आरोग्य विभाग" अजूनही जुन्याच टिन टपरांच्या "जंगाटलेल्या" आणि पावसाळ्यात "धो धो गळणाऱ्या" खोल्यांमध्येच आहे.ही अकोटकरांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. 


















    दोन अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या दोन मजल्यांसाठी अकोट नगर पालिकेतील प्रशासक व मुख्याधिकारी यांनी गेल्या वर्षभरात  फर्निचर साठी तब्बल दोन कोटी रुपयांचे "टेंडर" अनेकवेळा काढले आहे परंतु अजूनही त्यांना पाहिजे तसा कुणीच कंत्राटदार मिळत नसल्याने ही वारंवार टेंडर काढण्याची प्रक्रिया नित्यनेमाने सुरूच आहे.



      अकोट नगर पालिकेच्या आवारात गेल्या काही दिवसांत जवळपास "पाऊण कोटी" रुपये खर्च करून "गट्टू" बसविण्यात आले असून ते "गट्टू" आणि अकोट अकोला रस्ता "क्वालिटी"च्या बाबतीत एकमेकांशी "स्पर्धा" करतात की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.बरे एव्हढे सगळे विलोभनीय स्वरूप नगर पालिकेच्या इमारतीला देण्यात येत असले तरी या परिसराला लाखो रुपये खर्चून  घेतलेल्या आवार भिंतीला दोन ठिकाणी गेट लावण्यासाठी जागा सोडण्यात आली आहे, परंतु गेल्या दीड ते दोन वर्षांपासूनही त्याठिकाणी गेट न लावण्यात आल्याने अकोट नगर पालिकेची अवस्था मात्र, "सब सोने का मगर, xx ड पितल की", अशी झाली आहे. 


   यातच आणखी भर म्हणजे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी या परिसरात अकोट शहरातील नागरिकांच्या मनात "देशप्रेमाची भावना" जागृत करण्यासाठी भारतीय सैन्यदलातील जुना झालेला "रणगाडा" दररोज नागरिकांच्या नजरेस पडावा यासाठी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडून मागितला होता.त्यासाठी नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशातून एक फार मोठा "चबुतरा" लाखो रुपये खर्च करून बांधून घेतला आहे,मात्र आता हा रणगाडा  मिळू न शकल्याने तो चबुतरा तसाच रिकामा असून त्याचे काय करावे किंवा आता नगर पालिका प्रशासन त्याठिकाणी आणखी कोणते नवीन "धस्कट" उभे करते याचीच वाट नागरिक पहात आहेत.


   अकोट नगर पालिकेचे मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे हेच  (लोकनियुक्त नगर सेवक नसल्याने) याठिकाणी प्रशासक सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांच्या अखत्यारीत असलेल्या आणि सर्वस्वी तेच जबाबदार असलेल्या कामाची तक्रार अकोल्याला नगर पालिका प्रशासन अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचेकडे केली तरी त्याठिकानीही तेच "प्रभारी प्रशासन अधिकारी" असल्याने त्यांच्याच विषयीच्या तक्रारींवर तेच काय निर्णय घेणार व कोणता न्याय देणार हाच फार मोठा प्रश्न आहे.




  एकंदरीत अकोटच्या नागरिकांना ह्या नगर पालिकेतील "कुत्र्यांशीवाय" कुणीच वाली उरलेला नाही,कमीत कमी हे मोकाट कुत्रे नगर पालिकेतील नागरिकांच्या महत्वपूर्ण असलेल्या रेकॉर्ड वा कागदपत्रांची "रखवाली" तरी इमानेइतबारे करीत आहेत.दोन डझनाच्या वर कुत्रे ह्या इमारतीत चोवीस तास पहारा देत असल्याने कुणा "चोट्ट्याची" या परिसरात रात्रीबेरात्रीच काय तर दिवसाही पाय ठेवायचीही हिम्मत होत नाही, हेही तितकेच खरे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या