अकोला जिल्ह्यातील "आफतकोट" या उपरोधिक नावाने कुप्रसिद्ध असलेल्या अकोट शहरातील रस्त्यांच्या "जीवघेण्या" दुर्दशेने सर्वसामान्य नागरिक अगदी जिवाच्या आकांताने त्रस्त झालेले असतांना आशिष महेंद्र तरडेजा या विधी स्नातक असलेल्या युवकाने थेट मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात कार्यरत असलेले अकोला जिल्ह्याचे पालक न्यायाधीश अनिल किलोर यांना तक्रार देऊन शहरातील लोकांना होत असलेल्या त्रासातून मुक्त करण्याची विनंती केली होती.
आशिष तरडेजा यांच्या या युवकाच्या तक्रारीची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विशेष बाब म्हणून दखल घेत "सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेत संबंधितांना नोटिसेस जरी करून जबाब मागितला आहे.यासाठी नागपूर हायकोर्टाने ऍड.काळवाघे यांची सहयोगी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
दि.१३/९/२०२३ रोजी सदरहू याचिका दाखल करून घेत दि.४/१०/२०२३ ला झालेल्या पहिल्या सुनावणीत राज्याचे मुख्य सचिव,बांधकाम विभाग मुंबई, कार्यकारी अभियंता,जागतिक बँक प्रकल्प,सा.बांधकाम विभाग अकोला,प्रशासनिक अधिकारी सा.बांधकाम विभाग,अकोट तथा अकोट नगर पालिकेचे मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांना आपले म्हणणे दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिलेला आहे.
नागपूर हायकोर्टाने घेतलेल्या या दखलेची आज अकोट शहरात सर्वत्र चर्चा होत असून आशिष महेंद्र तरडेजा या युवकाचे कौतुक करण्यात येत आहे.अकोट शहरातील रस्त्यांची आतातरी दुर्दशा दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.अकोट व अकोल्यातील आमदार व खासदारांनाही जुमानत नसलेले अधिकारी आता हायकोर्टाला कितपत ऐकतात हे मात्र येणारा कालच ठरवेल.




0 टिप्पण्या