गेल्या अनेक महिन्यांपासून अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या महत्त्वाच्या पदाला कुणीच वाली नसल्याने ते रिक्तच होते. अकोल्यातील जिल्हा भूसंपादन अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी आपल्या पदाची जबाबदारी सांभाळून अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु एक दीड महिन्याआधी त्यांचीही वाशीमला निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याने पुन्हा अकोल्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद पोरके झाले होते.माचेवाड नावाचे उपजिल्हाधिकारी हे गेल्या काही दिवसांपासून या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार सांभाळत होते.
याआधी अमरावती येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामदास सिद्धभट्टी यांची शासनाने विशेष बाब म्हणून बदली करीत त्यांना अकोल्याला अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केल्याने प्रशासकीय कामकाज गतिमान होण्याची आशा व्यक्त केल्या जात आहे.सिद्धभट्टी यांनी यापूर्वी अकोला जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेले असून गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान त्यांनी अकोट येथे उपविभागीय अधिकारी म्हणून देखील उल्लेखनीय कार्य केले आहे.



0 टिप्पण्या