राज्याच्या पिंपरी-चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या सोमनाथ झेंडे यांना ऑनलाइन गेममधून तब्बल दीड करोड रुपयांचे बक्षीस मिळालं आहे. मात्र पोलीस उपनिरीक्षक असलेल्या झेंडे यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा एवढ्या मोठी रक्कम जिंकल्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण पुण्यातील भाजपाच्या अमोल थोरात नावाच्या सरचिटणीस असलेल्या व्यक्तीने त्याचे पोट दुखल्याने झेंडे यांची गृहमंत्री यांच्याकडे तक्रार दिल्याने आता त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून स्वप्ना गोरे ह्या पोलीस उपायुक्त त्यांची चौकशी करीत आहेत.पोलीस अधिकाऱ्याने एवढ्या मोठ्या रक्कमेचे बक्षीस जिंकल्यामुळे आता त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.हेच पैसे जर त्याने लाच म्हणून घेतले असते तर मात्र त्याची चौकशी झाली असती की नाही हा संशोधनाचा विषय आहे.पुणे पोलीस दलातील अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची जर कुणी तक्रार केली असती वा केलेली असेल तर त्यासाठी इतके आकांडतांडव झाले नसते हेही तितकेच खरे.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे सरकारी कर्मचारी असून त्यांना अशा प्रकारे ऑनलाईन गेम खेळण्याची परवानगी घेतली होती काय तसेच त्यांनी ड्युटीवर असतांना हा गेम खेळले की वरिष्ठांकडून सुट्टी काढून खेळण्याची परवानगी घेतली होती का ? याबाबत आता चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांनी ऑनड्युटी गणवेशामध्ये एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमुळे ते चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी कुठे चोरी केली नाही की कुणाकडून लाच घेतली नाही,अथवा कामात कोणताही कामचुकारपणा केला नाही तरी सुद्धा त्यांनी आपली असलेली "अक्कल" वापरून केंद्र व राज्य सरकारने परवानगी म्हणा वा लायसन्स दिलेला "ऑनलाईन" जुगार खेळून दीड कोटी रुपये जिंकले तर त्याची सुद्धा तक्रार होते.आणि केवळ सत्ता व पैसा यासाठी संपूर्ण "नीतिमत्ता आणि प्रामाणिकता" गहाण ठेवून सरकार बनविणारे मंत्री या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देतात हीच मुळात विचार करण्यासारखी बाब आहे.चौकशी केली जाणारच असेल तर ती नेमकी कशासाठी व कोणत्या विषयावर हेही ठरवावे लागेल ना.? की उठसुठ कुणाही सोम्या गोम्याने सरकारकडे तक्रार करावी आणि त्यांनी त्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी असे तर असू शकत नाही.
झेंडे यांच्यावर कारवाई होणार की नाही याचा निर्णय पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांचा शासनाला अहवाल गेल्यावरच निश्चित होणार आहे. भाजपचे सरचिटणीस यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस उपनिरीक्षकाने ऑनलाइन गेम खेळून जुगाराचे उदात्तीकरण केल्याची तक्रार दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानेच पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचा दावा भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी केला आहे.
चला एकदाचे थोरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेत हे मान्य जरी केले तरीदेखील मुद्दा हा येतो की गेल्या महिन्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर हा देशाचा सर्वोच्च बहुमान "भारतरत्न" हा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केल्यावरही त्या पुरस्काराचा कुठलाही मानसन्मान न ठेवता आज पैसे कमावण्यासाठी ऑनलाईन जुगाराची जाहिरात करून या देशातील करोडो लोकांना हा जुगार खेळण्यासाठी "प्रोत्साहित" करित आहे. आणि महत्वाचे म्हणजे त्याबद्दल कुणा सोम्या गोम्याने नव्हे तर या राज्यातील विधानसभेचे सन्माननीय सदस्य तथा माजी मंत्री असलेल्या एका आमदाराने ही तक्रार चक्क त्या तेंडूलकरच्या घरावर मोर्चा काढून राज्याच्या गृहमंत्र्यांना दिलेली आहे.मग त्या तक्रारींवर गेल्या एक महिन्याच्या काळात देखील कोणतीही कारवाई गृहमंत्र्यांनी वा महाराष्ट्र पोलिसांनी केलेली नाही.या राज्यात व्यक्ती पाहून न्याय केव्हापासून दिल्या जायला लागला आहे.?
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारींवर चौकशी आणि विरोधी पक्षातील आमदारांच्या तक्रारीला केराची टोपली.हा कुठला न्याय आहे.?
जुगाराचे परवाने सरकारने द्यायचे,त्याची जाहिरात करणाऱ्यांना सरकारने सर्वोच्च पुरस्कार द्यायचे आणि फक्त तो जुगार खेळून एखादा पोलीस पैसे जिंकला की त्याची चौकशी सरकारने करायची असे तर "मोगलाईत" देखील झाले नसेल.
सोमनाथ झेंडे यांनी मात्र त्यांना बक्षीस मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की,ऑनलाईन गेमिंग म्हणजे नुकसान होण्याची शक्यता असते,त्यामुळे या गेमपासून आपण सावधदेखील राहिले पाहिजे.हे असे आवाहन त्यांनी मुंबईतक ह्या चॅनेलच्या माध्यमातून केलेले आहे.आता झेंडे यांचेविषयी नेमका काय अहवाल सरकारकडे पाठविल्या जातो आणि त्यांच्याविषयी काय भूमिका घेतल्या जाणार याची उत्सुकता केवळ पोलीस दलातीलच नव्हे तर राज्यातील सगळ्यांनाच लागली आहे.






0 टिप्पण्या