जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सामुहीक अनुकंपाधारकांच्या यादीत जळगाव जिल्हा पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून ९ अनुकंपाधारक उमेदवारांना तलाठी व लिपिक टंकलेखक या वर्ग ३ पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याने उमेदवार व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा आनंद पाहण्यासारखा होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खालील सामुहीक अनुकंपा धारकांच्या यादीत शासकिय नोकरी करण्यासाठी पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयांने या उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार ‘क’ संवर्गातील १० जागांसाठी १५ उमेदवारांच्या कागदपत्रांची ४ ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली होती. या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणी नंतर ९ उमेदवारांना अंतिम नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती प्रक्रिया राबविणारे उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार पंकज लोखंडे,अवल्ल कारकून योगेश पाटील,वैशाली पाटील,प्राजक्ता वाघ, रियाज पटेल यांचे कौतुक करुन सदर अनुकंपा नियुक्तीबाबत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त केले.
पोलीस दलातील अनुकंपाधारक उमेदवार छाया चैत्राम झटके, दामिनी धर्मेंद्र महाजन, शितल राजेश राजपुत, सोनाली रमेश कोळी, रेणुका रमेश पाटील, शितल राजेंद्र अवस्थी यांना तलाठी या पदावर तर लिपिक,टंकलेखक पदावर रितेश विजय पवार,हर्षल ब्रिजलाल पाटील व मृणाल मधुकर मेहरूणकर यांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अनुकंपा यादीमध्ये पोलीस दलातील पात्र उमेदवारांचा समावेश करण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले असून जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या वर्ग ३ व ४ च्या पदांवर या यादीतील उमेदवारांना नोकरी देण्याचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.या शासन निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा पहिला मान जळगाव जिल्ह्याने मिळविला असून या दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या