अंगणवाडी मदतनीससाठी ३५ हजाराची लाच घेणाऱ्या कनिष्ठ सहायकाला एसीबीने रंगेहात पकडले...



   अमरावती विभागात गेल्या दोन ते तीन महिन्या पासून अंगणवाडी मदतनीस व सेविका यांच्या रिक्त असलेल्या जागांवर भरती प्रक्रिया सुरू झालेली असून काही भामटे व दलाल महिला व बालकल्याण विभागातील पैशांसाठी हपापलेल्या लाचखोर अधिकारी,कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपला उल्लू सरळ करण्याच्या प्रयत्नात असून यात सर्वसामान्य गोरगरीब व गरजू महिलांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास सर्वत्र सुरू आहेत.पैसे कमावण्या साठी हाताशी असलेल्या लोकांनां जमेल तसे वापरून घेऊन ही मंडळी खोऱ्याने रुपये कमावत असल्याचे चित्र आहे परन्तु आपले काम यावेळी नाही झाले तरी पुढच्या वेळी तरी साहेब नक्की करतील या आशेवर असलेले लुबाडणूक झालेले लोकं तक्रार देण्यासाठी मात्र पुढे येत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे.

    
   विदर्भात काही जिल्ह्यात आजरोजी कामावर असलेल्या मदतनीस व सेविका यांनाच अर्ज छाननी केल्यावर प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना पैसे देण्यास भाग पाडण्यासाठी विविध हाथकंडे आजमावून त्यांना प्रत्यक्षात वापरून घेण्यात आले आहे.

    काही जिल्ह्यात तर बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडली असून ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.मात्र वरिष्ठ अधिकारी त्यांनाही पाठीशी घालून आपला कार्यभाग उरकून घेण्याच्या नादात सर्वसामान्य, गोरगरीब,गरजू महिलांना लुबाडून त्यांना कर्जाच्या खाईत लोटत आहेत.

  वाशिम जिल्ह्यातील अशाच एका तक्रारदाराच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर नियुक्ती देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या मानोरा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज दि. ४ ऑक्टोबर रोजी मानोरा पंचायत समिती कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले आहे. मनोज जगन्नाथ भोजापूरे (५५) व संतोष आत्माराम वानखेडे (३७) रा. गिराट (ता.मानोरा) जि.वाशीम अशी या लाचखोर आरोपींची नावे आहेत.
 
  २६ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून नियुक्ती देण्यासाठी कार्यालयातील कनिष्ठ सहायक मनोज जगन्नाथ भोजापुरे याने ५० हजार रुपयाची लाच मागितली होती. यामध्ये एका खासगी इसमालादेखील सहभागी करून घेण्यात आलेआहे. मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने काल मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी पडताळणी कार्यवाही केली असता तडजोडी अंती ३५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी आरोपींनी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.यावरून आज ४ ऑक्टोबर रोजी मानोरा पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. मनोज भोजापूरे याने तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयाची लाच स्विकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले तर खासगी इसम संतोष वानखेडे हा फरार झाला आहे. याप्रकरणी मनोज भोजापूरे व संतोष वानखेडे या दोघांच्याविरूद्ध मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वाशीम एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुजित कांबळे,पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड व पोहवा  असिफ शेख,विनोद अवगळे, नितीन टवलारकार,योगेश खोटे, राहुल व्यवहारे,रवींद्र घरत, चालक नावेद शेख या पथकातील कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

( नेमकी हीच परिस्थिती अकोला जिल्ह्यातील एका कर्मचारयाचीही होणार असून त्याचा "जलाफा" कायमचा उतरणार हे ही तितकेच नक्की आहे.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या