आज सोमवार दि.३०-१०-२०२३ पासून राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या "दक्षता सप्ताहाला" सुरुवात झाली असून त्यात भ्रष्टाचार व लाच मागणीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचार,प्रसार करून जनजागृती करण्यास एसीबीने ठिकठिकाणी सभा व मेळावे घेऊन सुरुवात केलेली असतांनाच या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी एका शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास तयारी दाखविली परंतु त्यास संशय आल्याने सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम घेण्यास नकार दिला. मात्र वाशीम एसीबीने त्यास "डिमांड" कारवाईत घेऊन अटक केली असून
सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बडा मासा पकडल्याने वाशिम शहरात खळबळ उडाली आहे.
वाशिम शहरातील उपअभियंता यांत्रिकी उच्चालक उभारणी व दुरुस्ती उपविभाग वाशिम येथील सहाय्यक अभियंता (वर्ग २) अजय विश्वनाथ कोल्हे ह्यांस १०,००० रुपये लाच मागणी प्रकरणी ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्याची कारवाई वाशिम शहर पोलीस स्टेशनला सुरू आहे.ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके व त्यांच्या पथकाची केली आहे.
अमरावती येथील ३३ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार अजय विश्वनाथ कोल्हे,वय ४५ वर्षे पद- सहायक अभियंता, (वर्ग -२) यांत्रिकी उच्चालक उभारणी व दुरुस्ती उपविभाग वाशिम जि.वाशिम याने १०,००० रु. लाचेची मागणी केली असल्याचे नमूद केले आहे.
या तक्रारीची दि.६/१०/२०२३ ला पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आल्याने दि.१०/१०/२०२३ व दि.३०/१०/२०२३ या दोन्ही दिवशी सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती. दि.६/१०/२०२३ रोजी पडताळणी कारवाई दरम्यान यातील तक्रारदार यांना त्यांचे फर्मचे मार्फत कार्यालयास पुरविण्यात आलेल्या शिपाई व चौकीदार यांचे माहे जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीतील बिल काढण्याकरिता १०,००० रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. दि.१०/१०/२०२३ व दि.३०/१०/२०२३ रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांस तक्रारदारावर संशय आल्याने त्यांने तक्रारदार यांचे कडून लाच रक्कम स्विकारली नाही.परंतु पडताळणी करवाईमध्ये त्याने लाच मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने आ.लो.से अजय विश्वनाथ कोल्हे याला ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई गजानन शेळके, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि.वाशिम यांच्या मार्गदर्शनात सापळा कार्यवाही पथकातील
पोहवा.नितीन टवलारकर,विनोद अवघळे, विनोद मार्कंडे,योगेश खोटे,रवींद्र घरत,चापोशि. नावेदशेख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


0 टिप्पण्या