पुण्यातील वऱ्हाडी लोकांसाठी एस.टी.महामंडळाची खास सुविधा...



    दिवाळीच्या दिवसांत खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यामध्ये भरमसाठ वाढ होते. रेल्वे आरक्षणासाठीही अनेकांना ताटकळत राहावे लागते. अशा परीस्थितीत एस.टी. महामंडळाची साथ केवळ अमरावतीच्या जिल्हावासीयांनाच नव्हे तर आजुबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना देखील मिळणार आहे.

    अमरावतीवरून पुणे येथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, नोकरदार व व्यवसायानिमित्त गेलेल्या नागरिकांसाठी महा मंडळाकडून "मिशन दिवाळी" राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दिवाळीपूर्वी व नंतर पुणे- अमरावती दरम्यान ७० बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

   एसटी महामंडळाकडून ऑपरेशन दिवाळी अंतर्गत पुणे शहरातील वाकडेवाडी परिसरात "कंटोनमेंट ग्राउंड" भाड्याने घेण्यात येणार असून त्या ठिकाणी ३० हून अधिक बसेस अमरावतीसाठी सज्ज राहणार आहेत. विशेष म्हणजे, प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती येथून पुणे येथे पर्यवेक्षकसुद्धा पाठविल्या जाणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी १४ ते २५ नोव्हेंबर दरम्यान अमरावती-पुणे अशा एकूण ४० बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

    १२ नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. त्यासाठी ७ ते १२ नोव्हेंबरपर्यंत पुणे येथून अमरावती जिल्ह्यात येणार्‍या प्रवाशांसाठी ३० विशेष बसेस धावणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन आरक्षण ७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये शिवशाहीचे १२९० रुपये, स्लीपर साधी १२८० रुपये, साधी बस ८६० रुपये, स्लीपर सिटर ११८० रुपये अशा स्वरुपाचे भाडे राहणार आहे. विशेष म्हणजे, महिलांना अर्धे तिकीट व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत लागू राहणार आहे. एस.टी. महा मंडळाच्या या निर्णयामुळे अमरावती व लगतच्या जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या