सावंतवाडी पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी दोन व्यक्तींविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला उच्च न्यायालयाकडून दोन दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. परंतु दुसर्या आरोपीला अजुनही अटक करण्यात आली नाही, त्याची अटक टाळण्यासाठी तक्रारदारावर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हे सतत दबाव आणत होते.
त्यांच्याकडून लाच देण्याबाबत सतत दबाव वाढत असल्याने याबाबत तक्रारदार यांनी दि.८/१०/२०२३ रोजी रायगड एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून रायगड एसीबीचे पथकाने या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणीची पडताळणी केली असता खंडागळे व पाटील यांनी तक्रारदार यांना एक लाख रुपयांची मागणी केल्याचे सिद्ध झाले.
त्यामध्ये या तपास अधिकाऱ्यांनी दुसर्या आरोपीची अटक टाळण्यासाठी तसेच तपास कामात सहकार्य करण्यासाठी एक लाख रूपयांची लाच मागितल्याचे व्हॉईस रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट झाले होते.
मागणी केलेल्या लाचेची एक लाख रूपयांची लाच सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना पोलिस निरीक्षक सागर खंडागळे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. तर यातील पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील शासकीय कामकाजा निमित्त दौऱ्यावर असल्याने त्यास ताब्यात घेता आले नाही.
सदरहू कारवाई पोलीस निरीक्षक रणजित गलांडे,पोलिस उपनिरीक्षक विनोद जाधव, महेश पाटील, कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे, सचिन आटपाडकर यांच्या पथकाने
केली आहे.


0 टिप्पण्या